शिरवणे सेक्टर 1 येथे ज्येष्ठ नागरिक विरंगुळा केंद्राचा शुभारंभ

महानगरपालिकेच्या वतीने सेवासुविधा पुरविताना समाजातील सर्व घटकांचा विचार केला जात असून शहराचा अनुभवी आधार असणा-या ज्येष्ठ्यांच्या मानसिक समाधानासाठी विरंगुळा केंद्रासारखी अभिनव संकल्पना राबविणारी नवी मुंबई ही देशातील पहिली महानगरपालिका असल्याचा अभिमान आणि समाधान असल्याचे सांगत नवी मुंबईचे महापौर श्री. जयवंत सुतार यांनी 1995 पासून कोणताही नवीन प्रकल्प, वेगळ्या प्रकारच्या सुविधा कामांची सुरूवात शिरवणे गांवापासून होत असल्याची परंपरा असून ग्रामीण भागातील पहिले ज्येष्ठ नागरिक विरंगुळा केंद्र शिरवणेमध्ये सुरू होत असल्याबद्दल स्थानिक नगरसेवक म्हणून आनंद वाटतो अशा शब्दात आपल्या भावना व्यक्त केल्या.
नवी मुंबई महानगरपालिकेच्या वतीने शिरवणे सेक्टर 1 येथे टिंबर मार्केट याठिकाणी महाराष्ट्रभूषण डॉ. नानासाहेब धर्माधिकारी कला संकुलात सुरू करण्यात आलेल्या ज्येष्ठ नागरिक विरंगुळा केंद्राच्या शुभारंभप्रसंगी ते आपले मनोगत व्यक्त करीत होते. याप्रसंगी महापौर श्री. जयवंत सुतार यांच्या समवेत प्रभाग समिती अध्यक्ष श्रीम. श्रध्दा गवस, समाजविकास विभागाच्या उपआयुक्त श्रीम. क्रांती पाटील, माजी नगरसेविका श्रीम. माधुरी सुतार, डॉ.राजेश पाटील, शिरवणे ज्येष्ठ नागरिक सामाजिक संस्थेचे अध्यक्ष श्री. पंढरीनाथ पाटील व इतर पदाधिकारी उपस्थित होते.
नवी मुंबई महानगरपालिकेच्या वतीने सुरू होणारे हे पंचविसावे ज्येष्ठ नागरिक विरंगुळा केंद्र असून याठिकाणी 50 खुर्च्या, 1 एक्झिक्युटिव्ह खुर्ची, टेबल, मोठे कपाट इत्यादी आवश्यक फर्निचर, वृत्तपत्रे, बुध्दीबळ, कॅरम असे बैठे खेळ, वजन मशीन, वाफ घेण्याचे मशीन, रक्तदाब तपासणी मशीन, दूरदर्शन संच, वॉटर कुलर असे साहित्य महानगरपालिकेच्या वतीने उपलब्ध करून दिले आहे. येथे वीजपुरवठा आणि पाणीपुरवठा महानगरपालिकेच्या वतीने विनामूल्य उपलब्ध करून दिला जात आहे. या ज्येष्ठ नागरिक विरंगुळा केंद्राच्या समोरील इमारतीमध्येच ग्रंथालयाचीही सुविधा असून त्यामधून वाचन संस्कृती जोपासली जात आहे. त्याचीही उपयोग हे ज्येष्ठ नागरिक मोठ्या प्रमाणावर करू शकतात.
Published on : 09-03-2020 05:50:18,Posted by : Navi Mumbai ,Category : News and update