*नवी मुंबईत 1 लाख 14 हजारहून अधिक विद्यार्थी व नागरिकांनी घेतली स्वच्छतेची सामुहिक शपथ*
*‘निश्चय केला, नंबर पहिला’ हे ध्येयवाक्य नजरेसमोर ठेवून स्वच्छ सर्वेक्षण अंतर्गत 'इंडियन स्वच्छता लीग' मध्ये सहभागी होत नवी मुंबई महानगरपालिकेने 9 ठिकाणी आयोजीत केलेल्या सामुहिक शपथ उपक्रमात तसेच 5 ठिकाणच्या खारफुटी स्वच्छता मोहीमेत 1 लाख 14 हजारहून अधिक विद्यार्थी आणि नागरिकांनी विक्रमी संख्येने सहभागी होत एकात्मतेचे व स्वच्छतेविषयीच्या जागरूकतेचे दर्शन घडविले.*
मागील वर्षी सर्वाधिक युवक सहभागाबद्दल देशात प्रथम क्रमांकाचा बहुमान मिळविणारे शहर म्हणून मानांकन प्राप्त नवी मुंबई महानगरपालिकेने यावर्षीही हाच नावलौकिक कायम राखण्याचे ध्येय नजरेसमोर ठेवून नमुंमपा आयुक्त तथा प्रशासक श्री. राजेश नार्वेकर यांच्या मार्गदर्शनाखाली शहरात प्रत्येक विभागामध्ये कार्यक्रमांचे आयोजन केले होते.
‘इंडियन स्वच्छता लीग 2.0’ मध्ये नवी मुंबई महानगरपालिकेचा ‘नवी मुंबई इको नाईट्स’ हा संघ सुप्रसिध्द संगीतकार, गायक तथा स्वच्छ नवी मुंबई मिशनचे ब्रँड ॲम्बेसेडर पद्मश्री शंकर महादेवन यांच्या नेतृत्वाखाली सज्ज असून 12 सप्टेंबरपासून स्वच्छता ही सेवा अभियानांतर्गत विविध उपक्रमांचे यशस्वी आयोजन केले जात आहे.
*यामधील सर्वात महत्वाचा आणि भव्यतम असा उपक्रम 17 सप्टेंबर रोजी शहरात 8 विभागांमध्ये एकाचवेळी सकाळी 8 वा. आयोजित करण्यात आला. ज्यामध्ये उपस्थित शाळा व महाविद्यालयीन विदयार्थी, युवक, शिक्षक, महिला बचतगट व महिला मंडळे, विविध प्रकारच्या स्वयंसेवी संस्था, मंडळे, लोकप्रतिनिधी, प्रसारमाध्यमे, आबालवृध्द नागरिक अशा 1 लाख 14 हजारहून अधिक विक्रमी संख्येने उपस्थित रहात स्वच्छतेची शपथ ग्रहण केली.*
*यामध्ये बेलापूर विभागात राजीव गांधी क्रीडा संकुल, सेक्टर 3 ए, सीबीडी बेलापूर व इतर ठिकाणी 10500 हून अधिक नागरिक, नेरूळ विभागात ज्वेल ऑफ नवी मुंबई, सेक्टर 26 व इतर ठिकाणी 21800 हून अधिक नागरिक, वाशी विभागत मॉडर्न महाविद्यालय मैदान, सेक्टर 15 /16 व इतर ठिकाणी 13900 हून अधिक नागरिक, तुर्भे विभागत जयपुरिया स्कूल जवळ, सेक्टर 18, सानपाडा व इतर ठिकाणी 10700 हून अधिक नागरिक. कोपरखैरणे विभागात निसर्ग उद्यान, सेक्टर 14 व इतर ठिकाणी 12300 हून अधिक नागरिक, घणसोली विभागात सेंट्रल पार्क, सेक्टर 3, घणसोली व इतर ठिकाणी 6400 हून अधिक नागरिक तसेच राजर्षि छत्रपती शाहू महाराज विद्यालयाच्या प्रांगणात रबाळे येथे 5200 हून अधिक विद्यार्थी पालक नागरिक, ऐरोली विभागात आर आर पाटील मैदान, भारतरत्न डॉ बाबासाहेब आंबेडकर स्मारकाजवळ, सेक्टर 15 व इतर ठिकाणी 16500 हून अधिक नागरिक तसेच दिघा विभागात नागरी आरोग्य केंद्रासमोरील पटांगण व इतर ठिकाणी 4500 हून अधिक नागरिक अशा प्रकारे आठ वॉर्डांत नऊ मुख्य व इतर काही ठिकाणी एकत्र येत एकूण 1 लक्ष 14 हजारहून अधिक नागरिकांनी स्वच्छतेची सामुहिक शपथ ग्रहण केली.*
*महापालिका आयुक्त श्री. राजेश नार्वेकर यांनी नेरूळ येथील ज्वेल ऑफ नवी मुंबई या उपक्रमस्थळी उपस्थित राहून उपस्थितांचा उत्साह वाढविला. याठिकाणी आयुक्तांसमवेत सर्व उपस्थितांनी स्वच्छता शपथ सामुहिकरित्या घेतली. यावेळी माध्यम प्रतिनिधींशी संवाद साधताना आयुक्त श्री. राजेश नार्वेकर यांनी नवी मुंबईकरांचा उत्साह बघून भारावून गेलो असल्याची भावना व्यक्त केली. नवी मुंबईकर विद्यार्थी, युवक, नागरिक, लोकप्रतिनिधी यांची स्वच्छतेविषयीची ही जागरूकता व शहराविषयीचे प्रेमच नवी मुंबईला कायम नंबर वनवर ठेवेल असा विश्वास आयुक्तांनी व्यक्त केला.*
शहरात विविध विभागांमध्ये 9 ठिकाणी या उपक्रमाचे आयोजन करण्यात आले होते, याशिवाय काही स्वयंसेवी संस्थांनी आपापल्या भागात स्वच्छता मोहीमा राबवून त्याठिकाणीही स्वच्छतेची सामुहिक शपथ ग्रहण केली. याप्रसंगी लोकप्रतिनिधींनीही आपापल्या विभागातील उपक्रमांच्या ठिकाणी उपस्थिती दर्शविली.
*यावेळी पद्मश्री शंकर महादेवन यांनी पाठविलेली व्हिडिओ चित्रफित प्रदर्शित करण्यात आली. ज्यामध्ये त्यांनी मी कार्यक्रमानिमित्त अमेरिकेत असूनही मनाने आपल्यासोबत आहे असे सांगत आपले नवी मुंबई शहर स्वच्छतेत नंबर वन राहण्यासाठी आपण सारेजण कटिबध्द राहूया आणि हा उत्साह कायम राखूया असे आवाहन नवी मुंबई नागरिकांना केले.*
यावेळी *5 ठिकाणी खाडीकिनारी स्वच्छता मोहीम राबविण्यात आली.* तेथेही उपस्थितांनी स्वच्छता शपथ घेतली. आयुक्त श्री. राजेश नार्वेकर यांच्यासमवेत अतिरिक्त आयुक्त श्रीम. सुजाता ढोले व घनकचरा व्यवस्थापन विभागाचे उपआयुक्त डॉ. बाबासाहेब राजळे यांनी त्याठिकाणी उपस्थित राहून खारफुटी स्वच्छतेत सहभागी झालेल्या जागरूक नागरिकांना प्रोत्साहित केले. यामध्ये 10 हजार 500 हून अधिक नागरिक स्वयंस्फु्र्तीने सहभागी झाले होते. त्यातही युवकांची व विशेषत्वाने युवतींची संख्या लक्षणीय होती.
अशाच प्रकारे लेट्स सेलिब्रेट फिटनेस या संस्थेच्या माध्यमातून रिचा समित यांच्या पुढाकाराने *वाशी विभागात 235 तृतीयपंथी नागरिकांनी एकत्र येत स्वच्छतेविषयी अभिनव पध्दतीने जनजागृती* केली.
*स्वच्छ व सुंदर शहर अशी ओळख असणा-या नवी मुंबईकर विद्यार्थी, नागरिकांची स्वच्छतेविषयी असलेली जागरूकता आणि शहराविषयी असणारे प्रेम यांचे दर्शन घडविणारा हा भव्यतम उपक्रम नवी मुंबईला स्वच्छतेच्या धाग्याने जोडणारा व शहरात स्वच्छतेची चळवळ निर्माण करणारा ठरला.
Published on : 25-09-2023 15:24:18,Posted by : Navi Mumbai ,Category : News and update