सेक्टर 10 ए वाशी येथील उद्यानास माजी राष्ट्रपती डॉ. ए.पी.जे. अब्दुल कलाम नामकरण संपन्न
नवी मुंबईतील अतिशय लोकप्रिय असणा-या मिनी सी शोअर भागाचे सौंदर्य वाढविणा-या केंद्र सरकारच्या अमृत योजनेअंतर्गत विकसित करण्यात आलेल्या उपवन स्वरुपातील उद्यानास भारताचे माजी राष्ट्रपती, थोर वैज्ञानिक डॉ. ए.पी.जे. अब्दुल कलाम उद्यान असे नामकरण करून एक चांगला आदर्श लोकांच्या नजरेसमोर राहील अशा शब्दात महापौर श्री. जयवंत सुतार यांनी आपले मनोगत व्यक्त केले. नवी मुंबई महानगरपालिकेच्या वतीने सेक्टर 10 ए वाशी येथील जुहू चौपाटी अर्थात मिनी सी शोअर भागात केंद्र सरकारच्या अमृत योजनेअंतर्गत विकसित करण्यात आलेल्या उद्यानास माजी राष्ट्रपती डॉ. ए.पी.जे. अब्दुल कलाम नामकरण समारंभ प्रसंगी ते आपले मनोगत व्यक्त करीत होते.
याप्रसंगी महापौर श्री. जयवंत सुतार यांच्या समवेत उपमहापौर श्रीम. मंदाकिनी म्हात्रे, स्थायी समिती सभापती श्री. नवीन गवते, स्थानिक नगरसेवक श्री. अविनाश लाड, नगरसेविका श्रीम. अनिता मानवतकर, उद्यान विभागाचे उप आयुक्त श्री. नितीन काळे, माजी नगरसेविका श्रीम. प्रणाली लाड तसेच नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते.
यावेळी बोलताना स्थानिक नगरसेवक श्री. अविनाश लाड यांनी अत्यंत पडीक स्वरुपात असलेल्या या जागेचा कायापालट झाला असल्याचा नागरिकांच्या वतीने आनंद व्यक्त करीत याठिकाणी पक्षांना आकर्षित करणारे वृक्ष लावल्याने विविध प्रकारचे पक्षी येथे येत आहेत. त्यांच्या करिता पाण्याचीही व्यवस्था उद्यान विभागामार्फत लवकरच केली जात असल्याचे त्यांनी सांगितले. नवी मुंबईच्या पर्यावरणशीलतेत भर घालणारा हा प्रकल्प असल्याने त्याला डॉ. ए.पी.जे. अब्दुल कलाम यांच्या सारख्या महनीय व्यक्तीचे नामकरण केले जात असल्याचा आनंद श्री. अविनाश लाड यांनी व्यक्त केला.
केंद्र सरकारच्या अमृत योजनेमध्ये हरित क्षेत्र विकास कार्यक्रमांतर्गत हे उद्यान विकसित करण्यात आले असून यामध्ये फळे येणारी देशी झाडे लावण्यात आली आहेत. त्यामुळे या भागात विविध प्रकारच्या पक्षांचा वावर वाढला असून नवी मुंबई महानगरपालिका क्षेत्राची जैव विविधता वृध्दींगत होण्यामध्ये लक्षणीय भर पडली आहे.
Published on : 26-02-2020 07:34:41,Posted by : Navi Mumbai ,Category : News and update