सुदृढ आरोग्यासाठी 10 व 17 ऑक्टोबर रोजी नमुंमपा क्षेत्रात राष्ट्रीय जंतनाशक दिन मोहीम
सुदृढ आरोग्यासाठी जंतनाशक गोळी ही संजीवनी असून ‘राष्ट्रीय जंतनाशक दिन मोहीम' वर्षातून दोनवेळा राबविण्यात येते. ही ' मोहीम यावर्षी राज्य शासनाच्या मार्गदर्शक सूचनांनुसार दि. १० ऑक्टोबर व मॉप अप दिन १७ ऑक्टोबर २०२२ रोजी नवी मुंबई महानगरपालिका कार्यक्षेत्रात राबविण्यात येणार आहे. यामध्ये १ ते १९ वर्षे वयोगटातील मुला-मुलींना वयोगटानुसार निश्चित केल्याप्रमाणे जंतनाशक गोळी देण्यात येणार आहे. ज्या शाळा सुरु आहेत त्या शाळांमध्ये हजर असणाऱ्या मुला-मुलींना शिक्षकांव्दारे तसेच अंगणवाडीमध्ये जाणाऱ्या मुला-मुलींना अंगणवाडी शिक्षकांव्दारे जंतनाशक गोळी देण्यात येईल.
जागतिक आरोग्य संघटनेच्या मार्गदर्शनानुसार मातीतून प्रसार होणाऱ्या कृमींचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी दोन जंतनाशक मोहिमेमधील अंतर ६ महिन्यापेक्षा जास्त नसावे म्हणून मोहिमेची प्रथम फेरी माहे २५ एप्रिल २०२२ ते २ मे २०२२ दरम्यान राबविण्यात आली व व्दितीय फेरी माहे ऑक्टोबर २०२२ मध्ये आयोजित करण्यात येत आहे.
१ ते १९ वयोगटातील बालकांमध्ये आढळणाऱ्या आतड्यांचा कृमीदोष हा मातीतून प्रसारित होणाऱ्या जंतापासून परिसर स्वच्छतेचा अभाव असल्यामुळे होतो. कृमीदोष हा रक्तक्षय आणि कुपोषणाचे कारण असून त्यामुळे बालकांची शारीरिक व बौद्धिक वाढ खुंटते. याकरिता राष्ट्रीय जंतनाशक दिनाचे औचित्य साधून १ ते १९ वर्ष वयोगटातील सर्व मुला – मुलींना शाळा व अंगणवाडी केंद्र स्तरावर जंतनाशक गोळी देऊन त्यांचे आरोग्यरक्षण, उत्तम पोषण स्थिती, शिक्षण व जीवनाचा दर्जा उंचावण्याचे उदि्दष्ट ठेवण्यात आले आहे.
जंताचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी जंतनाशक गोळी घेण्याबरोबरच हात स्वच्छ धुणे, शौचालयाचा वापर करणे, भाज्या व फळे स्वच्छ धुवून खाणे, नखे नियामित कापणे व स्वच्छ ठेवणे, बाहेर जाताना बूट अथवा चपलांचा वापर करणे ही खबरदारी घेणेही आवश्यक आहे. ही मोहीम नागरी प्राथमिक आरोग्य केंद्रामार्फत राबविण्यात येणार आहे.
यामध्ये एक ते दोन वर्ष वयोगटातील बालकास जंतनाशकाची (Tab.Albendazole) अर्धी गोळी (२०० मिलिग्रॅम) पाण्यात विरघळवून देण्यात येईल. दोन ते तीन वर्ष वयोगटातील मुला-मुलींसाठी एक पूर्ण गोळी (४०० मिलिग्रॅम) पाण्यात विरघळवून देण्यात येईल. तसेच तीन ते एकोणीस वर्ष वयोगटातील मुला-मुलींसाठी एक पूर्ण गोळी (४०० मिलिग्रॅम) चावून खाण्यासाठी स्वच्छ पाण्याबरोबर देण्यात येणार आहे. गोळी खाल्यामुळे कोणतेही दुष्परिणाम होत नाहीत.
तथापि बालकाच्या शरीरामध्ये जंताचा प्रादुर्भाव असल्यास किरकोळ पोटदुखी, जळजळ अथवा क्वचित प्रसंगी मुलांना उलटी होऊ शकते. हे दुष्परिणाम किरकोळ स्वरूपाचे असल्याने पालकांनी घाबरून जाऊ नये.
सदर मोहिमेकरीता नवी मुंबई महानगरपालिकेचे १,७९,१९४ मुलांचे उद्दिष्ट असून यादृष्टीने संपूर्ण नियोजन करण्यात आले आहे. या अनुषंगाने आरोग्य विभाग, शिक्षण विभाग व एकात्मिक बाल विकास विभाग यांच्या एकत्रित बैठका घेऊन सर्व संबंधितांचे (ANM, आशा, अंगणवाडी शिक्षिका, शाळेचे समन्वयक इ.) व सर्व अधिकारी, कर्मचाऱ्यांचे प्रशिक्षण घेण्यात आले आहे. तसेच अभियानाची जनजागृती करण्यासाठी ठिकठिकाणी बॅनर्स लावण्यात आले आहेत.
तरी पालकांनी आपल्या १ ते १९ वर्षापर्यंतच्या सर्व मुलांना दि. १० ऑक्टोबर २०२२ व मॉप अप दिन दि. १७ ऑक्टोबर २०२२ रोजी जंतनाशक गोळी देऊन कृमीदोषामुळे होणाऱ्या रक्तक्षय व कुपोषणापासून प्रतिबंध करावा आणि त्यांचे आरोग्य उत्तम राहील व पोषण स्थिती आणि शिक्षणाचा दर्जा उंचावेल यादृष्टीने महापालिका आयुक्त श्री.राजेश नार्वेकर यांच्या वतीने करण्यात येत आहे.
Published on : 07-10-2022 14:34:57,Posted by : Navi Mumbai ,Category : News and update