सेक्टर 10 ऐरोली येथे खाडीकिनाऱ्यालगतच्या विशेष स्वच्छता मोहीमेत व्यापक लोकसहभाग
'स्वच्छ भारत मिशन' अंतर्गत 'स्वच्छ सर्वेक्षण 2024' ला सामोरे जाताना नमुंमपा आयुक्त डाॅ. कैलास शिंदे यांच्या मार्गदर्शनाखाली विविध उपक्रमांचे आयोजन केले जात असून यामध्ये नागरिकांचा सहभाग करून घेण्यावर भर देण्यात येत आहे.
अशाच प्रकारची विशेष स्वच्छता मोहीम अतिरिक्त आयुक्त श्री. सुनील पवार, घनकचरा व्यवस्थापन विभागाचे उपायुक्त डॉ अजय गडदे, परिमंडळ 2 उपायुक्त डॉ. कैलास गायकवाड यांच्या नियंत्रणाखाली सेक्टर 10, ऐरोली येथील जैवविविधता केंद्राशेजारील खाडी किनाऱ्याच्या ठिकाणी राबविण्यात आली.
यामध्ये ऐरोली विभागाचे सहाय्यक आयुक्त श्री अशोक अहिरे, स्वच्छता अधिकारी श्री. राजेंद्र इंगळे यांचेसह स्वच्छता निरीक्षक, सफाई मित्र, पर्यवेक्षक, श्रीम. सुशीलादेवी देशमुख विद्यालयातील एनएसएसचे विद्यार्थी तसेच दिवा कोळीवाडा व परिसरातील रहिवाशी यांनी उत्साहाने सहभाग घेतला.
या मोहिमेमध्ये खाडी किनाऱ्यालगतचा 30 गोणी प्लास्टिक व तत्सम कचरा गोळा करण्यात आला.
यावेळी स्वच्छता अधिकारी श्री. राजेंद्र इंगळे यांनी उपस्थितांना पर्यावरणाचे महत्व पटवून दिले तसेच त्यांच्यामध्ये पर्यावरण विषयक जागरूकता करून प्लास्टिक प्रतिबंधाबाबत मार्गदर्शनही केले. याप्रसंगी प्लास्टिक वापर प्रतिबंधाबाबत शपथही घेण्यात आली.
Published on : 18-06-2024 14:14:51,Posted by : Navi Mumbai ,Category : News and update