*12 ते 14 वयोगटातील मुलांच्या कोव्हीड लस संरक्षणासाठी 221 शाळांमध्ये लसीकरण नियोजन*
कोव्हीड लसीकरणाच्या प्रत्येक टप्प्यावर नवी मुंबई महानगरपालिकेने सुयोग्य नियोजन केल्याने 18 वर्षावरील नागरिकांच्या पहिल्या व दुस-या डोसचे 100 टक्के लसीकरण पूर्ण करणारी नवी मुंबई ही राज्यातील अग्रणी महानगरपालिका ठरली. 15 ते 18 वयोगटातील मुलांच्या लसीकरणातही पहिल्या डोसचे 100 टक्के लसीकरण नवी मुंबईनेच सर्वप्रथम पूर्ण केले असून आता दुस-या डोसचेही 80 टक्के लसीकरण पूर्ण झाले आहे.
या अनुषंगाने 16 मार्च पासून 12 ते 14 वयोगटातील मुलांच्या लसीकरणालाही सुरुवात झालेली असून त्यामध्येही जलद लसीकरण करण्याचे संपूर्ण नियोजन करण्यात आले आहे. महापालिका आयुक्त श्री. अभिजीत बांगर यांनी या वयोगटाचे लसीकरण सुरु होण्यापूर्वीच विशेष बैठक घेत आरोग्य विभागाला निर्देश दिले असून त्यानुसार पहिले 4 दिवस महानगरपालिकेच्या 3 रुग्णालयांमध्ये 12 ते 14 वयोगटासाठीची लसीकरण सत्रे आयोजित करण्यात आली होती. त्यामध्ये 276 मुलांचे लसीकरण करण्यात आले.
लसीकरणाला वेग देण्याच्या दृष्टीने महानगरपालिकेने नियोजन करीत 12 ते 14 वयोगटासाठीच्या लसीकरण केंद्रांमध्ये वाढ करीत 221 शाळांमध्ये लसीकरणाचे नियोजन केले आहे. 31 मार्चपर्यंत 12 ते 14 वयोगटासाठीचे शासनामार्फत दिले गेलेले 47459 मुलांच्या लसीकरणाचे उद्दिष्ट पूर्ण करण्याच्या दृष्टीने सूक्ष्म नियोजन करण्यात आले असून त्याकरिता 23 नागरी आरोग्य केंद्र क्षेत्रातील 221 शाळांमध्ये लसीकरण सत्रे आयोजित केली जात आहेत.
शाळांतील लसीकरणाच्या पहिल्याच दिवशी 21 मार्च रोजी 17 शाळांमध्ये 12 ते 14 वयोगटातील लसीकरण करण्यात आले. या एका दिवशी 1615 मुलांचे लसीकरण करण्यात आले असून आज 22 मार्च रोजी 57 शाळांमध्ये लसीकरण सत्रे आयोजित करण्यात आलेली आहेत.
12 ते 14 वयोगटातील मुलांच्या लसीकरणासाठी 1 जानेवारी 2008 ते 15 मार्च 2010 या कालावधीत जन्मलेली मुले पात्र असून लसीकरणासाठी आधारकार्ड तसेच त्यांच्या जन्म तारखेची नोंद असलेले शाळेचे आयकार्ड अथवा तत्सम कागदपत्र गरजेची आहेत.
तरी 12 ते 14 वयोगटातील प्रत्येक मुलाने कोव्हीड लस घेऊन लस संरक्षित व्हावे तसेच आपल्या पाल्याला लस देण्याबाबत पालकांनीही काळजी घ्यावी असे आवाहन महापालिका आयुक्त श्री. अभिजीत बांगर यांनी केले आहे.
Published on : 22-03-2022 11:40:45,Posted by : Navi Mumbai ,Category : News and update