*135 घरगुती गॅस वितरण करणा-या पोटँशिअल सुपरस्प्रेडर्सनी घेतला कोव्हीड लसीकरणाचा लाभ*
*विविध सेवा पुरविताना ज्यांचा नागरिकांशी मोठ्या प्रमाणावर संपर्क येतो अशा कोव्हीडच्या दृष्टीने जोखमीच्या पोटँशिअल सुपरस्प्रेडर्स व्यक्तींना कोव्हिडपासून संरक्षण लाभावे याकरिता महापालिका आयुक्त श्री. अभिजीत बांगर यांच्या निर्देशानुसार त्यांचे प्राधान्याने लसीकरण केले जात आहे. त्यामध्ये घरगुती गॅस सिलिंडर वितरण करणा-या 135 कर्मचा-यांचे आज नवी मुंबई महानगरपालिकेच्या वाशी, नेरूळ व ऐरोली रूग्णालयांत कोव्हीड लसीकरण करण्यात आले.*
*यामध्ये सार्वजनिक रूग्णालय, वाशी येथे 40, माँसाहेब मिनाताई ठाकरे रूग्णालय नेरूळ येथे 41 व राजमाता जिजाऊ रूग्णालय ऐरोली येथे 54 घरगुती गॅस सिलिंडर वितरण करणा-या कर्मचा-यांनी कोव्हीड लस घेतली.*
कोव्हीड लसींच्या उपलब्धतेनुसार दैनंदिन लसीकरणाचे नियोजन केले जात असून यामध्ये दररोजच्या कामकाजात नागरिकांशी मोठ्या प्रमाणात संपर्क येतो अशा कोव्हीडच्या दृष्टीने जोखमीच्या पॉटँशिअल सुपरस्प्रेडर्स व्यक्तींच्या लसीकरणाकडे लक्ष दिले जात असून त्यांच्याकरिता विशेष सत्रांचे आयोजन केले जात आहे.
25 जूनपासून पॉटँशिअल सुपरस्प्रेडर्स अशा विविध घटकांचे लसीकरण केले जात असून आजतागायत मेडिकल स्टोअर्समधील 390 कर्मचारी, रेस्टॉरंटमधील 1380 कर्मचारी, सलून / ब्युटी पार्लर मधील 631 कर्मचारी, पेट्रोल पंपावरील 268 कर्मचारी तसेच 2215 रिक्षा - टॅक्सी चालक, 1486 सोसायट्यांचे वॉचमन यांचे लसीकरण करण्यात आले आहे. त्यामध्ये आज घरगुती गॅस सिलिंडर वितरण करणा-या कर्मचा-यांचाही समावेश करण्यात आला असून यापुढील काळात टोल नाक्यांवरील कर्मचारी तसेच स्विगी, झोमॅटो, कुरिअर सेवा पुरविणारे कर्मचारी आणि अशा प्रकारच्या इतर घटकांचेही लसीकरण करण्यात येणार आहे.
संभाव्य तिस-या लाटेपूर्वी जास्तीत जास्त नागरिकांचे लसीकरण व्हावे याकरिता महानगरपालिका प्रयत्नशील आहे. त्या अनुषंगाने लसीच्या उपलब्धतेनुसार लसीकरणाचे दैनंदिन नियोजन केले जात आहे. त्यामध्ये ज्येष्ठ नागरिक तसेच 45 वर्षावरील नागरिकांप्रमाणेच सेवा पुरविताना मोठ्या प्रमाणात जनसंपर्क असणा-या कोव्हीडच्या दृष्टीने जोखमीच्या व्यक्तींकडे (Potential Superspreaders) विशेष लक्ष दिले जात आहे.
तरी नवी मुंबईकर नागरिकांनी लस घेतल्यानंतरही कोव्हीड सुरक्षा नियमांचे पालन करणे गरजेचे आहे हे लक्षात घेऊन दैनंदिन व्यवहारात मास्कचा वापर, चेह-याला स्पर्श न करणे, वारंवार हात धुवून स्वच्छ राखणे ही आपली सवय बनवावी असे आवाहन महापालिका आयुक्त श्री. अभिजीत बांगर यांच्या वतीने करण्यात येत आहे.*
Published on : 28-07-2021 16:13:01,Posted by : Navi Mumbai ,Category : News and update