*14 जुलैला विष्णुदास भावे नाट्यगृहात एकल प्लास्टिक वापर प्रतिबंधात्मक जनजागृतीपर कार्यशाळा*
केंद्र सरकारच्या पर्यावरण, वने व हवामान बदल मंत्रालयाने दि.12 ऑगस्ट 2021 रोजी जारी केलेल्या अधिसूचना क्र. G.S.R.571(E) नुसार 1 जुलै 2022 पासून एकल वापर प्लास्टिकचे उत्पादन, आयात, साठवण, वितरण, विक्री आणि वापरावर बंदी घालण्यात आलेली आहे.
सुधारित प्लास्टिक कचरा व्यवस्थापन नियम 2016, नियम 4 (2) अन्वये 1 जुलै 2022 पासून पॉलिस्टीरीन आणि विस्तारित पॉलिस्टीरीनसह निम्नदर्शित सिंगल यूज प्लास्टिकचे उत्पादन, आयात, साठवण, वितरण विक्री आणि वापरावर बंदी असणार आहे.
अ) प्लास्टिकच्या कांड्यासह कानकोरणी, फुग्यांसाठी प्लास्टिकच्या कांडया, प्लास्टिकचे झेंडे, कॅंडी, कांडया, आईस्क्रीम काडया.
ब) सजावटीसाठी प्लास्टिक व पॉलिस्टीरीन (थर्माकोल)
क) प्लेट्स, कप, ग्लासेस, काटे, चमचे, चाकू यासारखी कटलरी, पिण्यासाठी स्ट्रॉ, ट्रे, ढवळण्या (स्टिरर्स), मिठाईचे बॉक्स, आमंत्रण कार्ड, सिगारेटच्या पाकीटांभोवती प्लास्टिक फिल्म गुंडाळणे किंवा पॅक करणे, प्लास्टिकचे पीव्हीसी बॅनर (100 मायक्रॉनपेक्षा कमी)
या प्रमाणेच महाराष्ट्र प्लास्टिक व थर्माकोल अधिसूचना 2018 अंतर्गत खालील अतिरिक्त एकल वापर प्लास्टीकचा वापर करणे मार्च 2018 पासून प्रतिबंधित आहे. यामध्ये -
1) सर्व प्रकारच्या प्लास्टिकच्या पिशव्या (कॅरी बॅग्स) - हॅन्डल असलेल्या व नसलेल्या, कंपोस्टेबल प्लास्टिक (कचरा व नर्सरीसाठीच्या पिशव्या सोडून )
2) सर्व प्रकारच्या नॉन - ओव्हन बॅग्स (पॉलिप्रोपिलीन पासून बनविलेले)
3) एकल वापर प्लास्टिकचे उत्पादन - डिश, बाऊल, कंटेनर (डबे) (हॉटेलमध्ये अन्नपदार्थ पॅकेजींगकरिता)
याबाबत महाराष्ट्र शासनाच्या पर्यावरण व वातावरणीय विभाग यांच्या वतीने महाराष्ट्र प्रदूषण नियंत्रण मंडळ यांच्यामार्फत जाहीर सूचना प्रसिध्द करण्यात आली असून त्याव्दारे सर्व उत्पादक, साठवणूकदार, वितरणकर्ता, दुकानदार, ई कॉमर्स कंपन्या, रस्त्यावर विक्री करणारे व्यावसायिक, आस्थापना (मॉल, मुख्य बाजार विक्री केंद्र / सिनेमा केंद्र / पर्यटन ठिकाणे / शाळा / महाविद्यालये / कार्यालयीन इमारती / रुग्णालय व खाजगी संस्था) तसेच सामान्य नागरिकांना प्लास्टिक प्रतिबंधात्मक नियमांचे काटेकोरपणे पालन करण्याचे सूचित करण्यात आले आहे.
या अधिसूचनेचे उल्लंघन करणा-यांवर त्यांचा माल जप्त करणे, पर्यावरणीय नुकसान भरपाई आकारणे, उद्योग व व्यावसायिक आस्थापना यांचे कामकाज बंद करणे त्याचप्रमाणे पहिल्यांदा गुन्हा केल्यास रु.5000/- इतकी दंडात्मक रक्कम वसूल करण्यात येईल. त्याचप्रमाणे दुस-यांदा गुन्हा केल्यास रु.10000/- व तिस-या गुन्हायस रु.25000/- दंडात्मक रक्कम व 3 महिन्यांचा कारावास अशा प्रकारे कारवाई करण्यात येईल.
एकल वापराच्या प्लास्टिक वस्तूंचे उत्पादन, व्यापार, साठा, वितरण, विक्री आणि वापरावर बंदी याबाबत नागरिकांना माहिती व्हावी याकरिता महाराष्ट्र प्रदूषण नियंत्रण महामंडळ व नवी मुंबई महानगरपालिका यांच्या संयुक्त विद्यमाने 14 जुलै 2022 रोजी, सकाळी 11.30 वा. वाशी येथील विष्णुदास भावे नाट्यगृहात एकल प्लास्टिक वापर प्रतिबंधाबाबत जनजागृतीपर कार्यशाळेचे आयोजन करण्यात आलेले आहे. याप्रसंगी पर्यावरण प्रेमी जागरुक नागरिक, व्यापारी, व्यावसायिक, दुकानदार, प्लास्टिक निर्माते, शाळा, महाविद्यालये, महिला बचत गट तसेच सामाजिक व निमशासकीय संस्था यांच्या प्रतिनिधींनी मोठ्या संख्येने उपस्थित रहावे असे आवाहन नवी मुंबई महानगरपालिकेच्या वतीने कऱण्यात येत आहे.
Published on : 11-07-2022 12:03:32,Posted by : Navi Mumbai ,Category : News and update