*15 ते 31 मार्च या कालावधीत थकीत मालमत्ताकर धारकांना विशेष अभय योजनेद्वारे अंतिम सुवर्ण संधी*
मालमत्ताकर हा नवी मुंबई महानगरपालिकेच्या उत्पन्नाचा सर्वात मोठा स्त्रोत असल्याने व यामधून प्राप्त होणा-या महसूलातूनच विविध नागरी सुविधा कामे केली जात असल्याने नियमित कराच्या वसूलीप्रमाणेच महापालिका आयुक्त श्री. अभिजीत बांगर यांनी थकित मालमत्ताकराच्या वसूलीकडेही तितकेच बारकाईने लक्ष दिले आहे.
तथापि मागील दोन वर्षांपासून कोव्हीड प्रभावित काळातील लॉकडाऊन तसेच कोव्हीड लाटेच्या कमी-अधिक झालेल्या प्रभावामुळे अनेक जणांच्या उद्योग, व्यवसायावर तसेच नोकरीवरही मोठ्या प्रमाणात परिणाम झालेला आहे. विविध स्तरांतील नागरिकांना आर्थिक अडचणींना तोंड द्यावे लागत आहे. या सर्व बाबींचा साकल्याने विचार करून महापालिका आयुक्त श्री. अभिजीत बांगर यांनी 1 ऑक्टोबर 2021 पासून थकीत मालमत्ता कराच्या दंडात्मक रक्कमेवर 75 टक्के इतकी मोठ्या प्रमाणावर सूट देणारी अभय योजना लागू केली होती व त्यास मुदतवाढही दिली होती. 28 फेब्रुवारी 2022 रोजी या अभय योजनेच्या मुदतवाढीचा कालावधी संपुष्टात आलेला आहे.
सन 2021-22 चे आर्थिक वर्ष 31 मार्च 2022 रोजी संपुष्टात येत असून तत्पूर्वी अभय योजनेचा लाभ घेण्यापासून वंचित राहिलेल्या मालमत्ता कर थकबाकीधारकांकडून थकीत मालमत्ता कर भरण्याविषयी सकारात्मक भूमिका दर्शविण्यात आली आहे आणि आयुक्तांकडे अभय योजनेची मुदत वाढविण्याविषयी विनंती करण्यात आलेली आहे.
कोव्हीड परिस्थितीमुळे सध्याचा आर्थिक अडचणींचा काळ व नागरिकांमध्ये थकीत मालमत्ता कर भरण्याविषयी असलेली सकारात्मक भावना यो दोन्हींचा विचार करून महापालिका आयुक्त श्री. अभिजीत बांगर यांनी थकीत मालमत्ताकर धारकांना आणखी एक संधी देत दि. 15 मार्च 2022 ते दि. 31 मार्च 2022 या कालावधीकरिता 'विशेष मालमत्ता कर अभय योजना' जाहीर करीत अंतिम संधी दिलेली आहे.
यामध्ये थकबाकीदार नागरिक / व्यावसायिक यांनी आपल्या मालमत्ता कराची संपूर्ण थकित रक्कम अधिक दंडात्मक रक्कमेतील 25% दंडात्मक रक्कम भरल्यास त्यांना दंडात्मक रक्कमेवर 75% इतक्या मोठ्या प्रमाणात सवलतीचा लाभ मिळणार आहे.
तरी मालमत्ता कर थकबाकीदार नागरिकांनी नवी मुंबई शहराच्या विकासासाठी आपले योगदान देत विशेष अभय योजनेच्या अखेरच्या सुवर्णसंधीचा लाभ घ्यावा, यानंतर अभय योजनेस मुदतवाढ दिली जाणार नाही याची नोंद घ्यावी आणि लगेच नवी मुंबई महानगरपालिकेच्या www.nmmc.gov.in या वेबसाईटला भेट देऊन सवलतीच्या दंडात्मक रक्कमेसह थकीत मालमत्ता कर भरावा असे आवाहन महापालिका आयुक्त श्री. अभिजीत बांगर यांच्या वतीने करण्यात येत आहे.*
Published on : 13-03-2022 13:38:31,Posted by : Navi Mumbai ,Category : News and update