क्रांतिज्योति सावित्रीबाई फुले जयंतीनिमित्त विविध कार्यक्रमांचे आयोजन
नवी मुंबई महानगरपालिका महिला व बालकल्याण समितीच्या वतीने प्रतिवर्षीप्रमाणे याही वर्षी दि. 3 जानेवारी 2020 रोजी क्रांतिज्योति सावित्रीबाई फुले जयंतीदिनाचे औचित्य साधून क्रांतीज्योति सावित्रीबाई फुले पुरस्कार वितरण आणि महिलांसाठी आयोजित करण्यात आलेल्या विविध स्पर्धांचा पारितोषिक वितरण समारंभ विष्णुदास भावे नाट्यगृह, वाशी येथे सकाळी 10.00 वा. संपन्न होत आहे.
समाजविकास विभागामार्फत महिला व बालकल्याण विषयक विविध उपक्रम राबविण्यात येत असून महानगरपालिका कार्यक्षेत्रातील महिला व मुलींकरीता निबंध, मेहेंदी, नृत्य, गायन, नाट्य, रांगोळी, पाककला, सॅलेड सजावट, टाकाऊपासून टिकाऊ वस्तू तयार करणे अशा विविध स्पर्धांचे आयोजन करण्यात आले आहे. या स्पर्धांना 462 महिलांचा उत्स्फुर्त सहभाग लाभला आहे.
त्यासोबतच महिला व बालकल्याण क्षेत्रामध्ये उत्कृष्ट काम करीत असलेल्या महिला मंडळ / सामाजिक संस्थेच्या उल्लेखनीय कामगिरीची विशेष नोंद घेत त्यांना प्रोत्साहन देण्यासाठी व त्यांच्या कामाची प्रेरणा इतर संस्था, मंडळांना मिळावी यादृष्टीने "क्रांतिज्योति सावित्रीबाई फुले पुरस्कार" प्रदान करण्यात येत आहे.
नवी मुंबईचे महापौर श्री. जयवंत सुतार यांच्या अध्यक्षतेखाली संपन्न होणा-या या कार्यक्रमाप्रसंगी ठाणे लोकसभा सदस्य खा. श्री. राजन विचारे, ऐरोली विधानसभा सदस्य आ. श्री. गणेश नाईक, बेलापूर विधानसभा सदस्य आ. श्रीम. मंदा म्हात्रे, विधानपरिषद सदस्य आ. श्री. रमेश पाटील, उपमहापौर श्रीम. मंदाकिनी म्हात्रे, महापालिका आयुक्त श्री. अण्णसाहेब मिसाळ, स्थायी समिती सभापती श्री. नवीन गवते, सभागृह नेते श्री. रविंद्र इथापे, विरोधी पक्ष नेते श्री. विजय चौगुले आणि इतर महापालिका पदाधिकारी, नगरसेवक - नगरसेविका आदी मान्यवर उपस्थित राहणार आहेत.
नवी मुंबई महानगरपालिका क्षेत्रातील महिला व बालकल्याण क्षेत्रात उल्लेखनीय काम करणा-या संस्थेचा गुणगौरव करण्यासाठी तसेच महिलांसाठी आयोजित विविध स्पर्धांच्या निमित्ताने त्यांना प्रोत्साहित करण्यासाठी महिला व नागरिकांनी मोठ्या संख्येने उपस्थित रहावे असे आवाहन महिला व बालकल्याण समितीच्या सभापती श्रीम. संगीता पाटील आणि समिती सदस्यांच्या वतीने करण्यात येत आहे.
Published on : 03-01-2020 11:52:07,Posted by : Navi Mumbai ,Category : News and update