मनातील स्वच्छताविषयक संकल्पनांना 18 हजारहून अधिक विद्यार्थ्यांनी दिला चित्रांतून आकार
मुलांमध्ये असलेली चित्रकलेची आवड लक्षात घेऊन त्यांच्या मनातल्या स्वच्छतेविषयीच्या संकल्पना मांडण्यासाठी आयोजित करण्यात आलेल्या स्वच्छता विषयक चित्रकला स्पर्धेला 18 हजाराहून अधिक विद्यार्थ्यांनी सहभागी होत यशस्वी केले याबद्दल आनंद व्यक्त करीत विद्यार्थ्यांच्या माध्यमातून त्यांचे पालक, शेजारी, नातेवाईक यांच्यापर्यंत स्वच्छतेचा संदेश पोहचेल व नागरिकांच्या सकारात्मक प्रतिसादातून स्वच्छ सर्वेक्षण 2020 मध्ये नवी मुंबई नंबर वन ठरेल असा विश्वास नवी मुंबईचे महापौर श्री. जयवंत सुतार यांनी व्यक्त केला.
नवी मुंबई महानगरपालिकेच्या वतीने स्वच्छ सर्वेक्षण 2020 चित्रकला स्पर्धा प्रसंगी महापौर श्री. जयवंत सुतार यांच्यासह महापालिका आयुक्त श्री. अण्णासाहेब मिसाळ, सभागृह नेते श्री. रविंद्र इथापे, नगरसेविका श्रीम. कविता आगोंडे, शिक्षण विभागाचे उप आयुक्त श्री. नितीन काळे, घनकचरा व्यवस्थापन विभागाचे उप आयुक्त श्री. तुषार पवार, परिमंडळ 1 चे उप आयुक्त श्री. दादासाहेब चाबुकस्वार आणि इतर अधिका-यांनी वंडर्स पार्क नेरुळ आणि निसर्गोद्यान उद्यान कोपरखैरणे येथे उपस्थित राहून विद्यार्थ्यांना प्रोत्साहित केले. वाशीतील माँसाहेब मिनाताई ठाकरे उद्यानात नगरसेविका श्रीम. दयावती शेवाळे तसेच ऐरोली येथील झेन गार्डनमध्ये नगरसेवक श्री. एम.के. मढवी व श्री. करण मढवी आणि अतिरिक्त आयुक्त श्री. रविंद्र पाटील यांनी उपस्थित राहून विद्यार्थ्यांचा उत्साह वाढवला.
महापालिका आयुक्त श्री. अण्णासाहेब मिसाळ यांनी नवी मुंबई महानगरपालिका स्वच्छ सर्वेक्षण 2020 मध्ये सहभागी झाली असून स्वच्छतेचा संदेश प्रसारित करण्यासाठी विविध वयोगटातील व स्तरातील नागरिकांच्या सहभागातून निरनिराळे स्वच्छता विषयक उपक्रम हाती घेण्यात येत आहेत असे सांगितले. अशाच प्रकारचा एक अभिनव उपक्रम चित्रकला स्पर्धा असून यामध्ये महानगरपालिकेच्या शाळांसह खाजगी शाळा व कनिष्ठ महाविद्यालयांचे हजारो विद्यार्थी चारही ठिकाणी सहभागी झाले असून लोकसहभागातून अशाच प्रकारचे आणखी अनेक उपक्रम हाती घेण्यात येत आहेत अशी माहिती दिली. नवी मुंबईतील प्रत्येक नागरिक शहराविषयीच्या प्रेमाने व अभिमानाने या स्वच्छता कार्यात सहभागी होईल व नवी मुंबईला देशात नंबर वन करेल असा विश्वास आयुक्तांनी व्यक्त केला.
'स्वच्छ भारत मिशन' अंतर्गत 'स्वच्छ सर्वेक्षण 2020' ला सामोरे जात असताना विविध उपक्रम राबविले जात असून विद्यार्थ्यांच्या मनातील कल्पकतेला वाव देण्यासाठी नेरुळ येथील वंडर्स पार्क, कोपरखैरणे येथील निसर्गोद्यान, वाशी येथील माँसाहेब मिनाताई ठाकरे उद्यान, ऐरोली येथील झेन गार्डन (चिंचोली उद्यान) या 4 ठिकाणी स्वच्छ सर्वेक्षण 2020 चित्रकला स्पर्धेचे आयोजन करण्यात आले होते. यामध्ये महानगरपालिकेच्या व खाजगी शाळांतील 18 हजार 117 विद्यार्थ्यांनी सहभागी होत स्वच्छतेविषयीच्या आपल्या संकल्पना चित्ररुपाने रंगांतून साकारल्या. याप्रसंगी नवी मुंबई महानगरपालिका शाळा क्र. 15 येथील विद्यार्थ्यांनी स्वच्छता विषयावर पथनाट्य सादर केले.
‘स्वच्छ सर्वेक्षण 2020’ च्या अनुषंगाने विद्यार्थ्यांच्या मनातील स्वच्छता विषयक कल्पनांना व्यासपीठ मिळावे या उद्देशाने आयोजित चित्रकला स्पर्धेमध्ये विद्यार्थी तयारी करून सहभागी झाले होते. विद्यार्थ्यांच्या माध्यमातून त्यांचे कुटूंबही आपल्या पाल्याने कोणते चित्र काढावे या विचारात सहभागी होते. त्यामुळे संपूर्ण कुटुंबातच आपोआप स्वच्छते विषयीची जाणीव जागृती झाली. शाळांमधूनही विद्यार्थ्यांकडून चित्र काढण्याचा सराव करून घेण्यात आला होता. त्यामुळे या स्पर्धेत 4 ठिकाणी 18 हजाराहून अधिक विद्यार्थी उत्साहाने सहभागी झाले.
‘स्वच्छ सर्वेक्षण 2020’ च्या अनुषंगाने आयोजित या भव्यतम चित्रकला स्पर्धेला सकाळी 8 वा. प्रारंभ झाला. सेक्टर 19 ए नेरुळ येथील वंडर्स पार्क (5580 विद्यार्थी), से.17 वाशी येथील स्व. मिनाताई ठाकरे उद्यान (1534 विद्यार्थी), से.14 कोपरखैरणे येथील निसर्ग उद्यान (5872 विद्यार्थी) आणि ऐरोली सेक्टर 5 येथील झेन गार्डन चिंचोली उद्यान (5131 विद्यार्थी) अशा 4 ठिकाणी हिरवळीवर 18 हजार 117 विद्यार्थ्यांनी आपल्या स्वच्छता विषयक संकल्पनांना चित्रांतून मुर्त रूप दिले.
इयत्ता 5 वी ते 7 वी च्या पहिल्या गटातील विद्यार्थ्यांनी “माझी शाळा – सुंदर शाळा , “माझा परिसर -स्वच्छ परिसर”, “स्वच्छ् शहर – हरित शहर” अशा तीन विषयांवर तसेच इयत्ता 8 वी ते 10 वी या दुस-या गटातील विद्यार्थ्यांनी “माझा कचरा – माझी जबाबदारी”, “कच-याचे वर्गीकरण आणि पुनर्वापर” तसेच “स्वच्छ भारत अभियान माझा सहभाग” या तीन विषयांवर चित्रे काढली.
लवकरच या भव्य चित्रकला स्पर्धेचा पारितोषिक वितरण समारंभ आयोजित करण्यात येणार असून प्रत्येक गटामध्ये पहिल्या 5 क्रमांकांना रु,11 हजार, 9 हजार, 7 हजार, 5 हजार व 3 हजार याप्रमाणे पाच पारितोषिके तसेच 5 उत्तेजनार्थ चित्रकृतींना प्रत्येकी रु.1 हजार रक्कमेची पारितोषिके स्मृतिचिन्हांसह प्रदान केली जाणार आहेत.
नवी मुंबई शहराचे भविष्य असणा-या विद्यार्थ्यांच्या मनातील स्वच्छ, सुंदर, हरित व पर्यावरणशील नवी मुंबई शहराच्या संकल्पनांना चित्ररूपातून साकारणारा हा चित्रकला स्पर्धेचा भव्यतम उपक्रम 18 हजाराहून अधिक विद्यार्थ्यांनी उत्स्फुर्तपणे सहभागी होऊन आपल्या मनात असलेले शहर स्वच्छतेविषयीचे प्रेमच जणू प्रदर्शित केले आहे.
Published on : 04-01-2020 12:05:33,Posted by : Navi Mumbai ,Category : News and update