स्वच्छता संदेश देत नवी मुंबई महापौर मॅरेथॉन व स्टर्लिंग युनायटेड रनमध्ये धावले 5500 नागरिक
नवी मुंबई महानगरपालिका आणि स्टर्लिंग इन्स्टिट्युट, नेरुळ यांच्या संयुक्त विद्यमाने ‘एक पाऊल नवी मुंबई शहर स्वच्छतेसाठी' हा संदेश देत विविध वयोगटातील 5500 हून अधिक नागरिकांनी उत्साहाने सहभागी होत 'नवी मुंबई महापौर मॅरेथॉन व स्टर्लिंग नवी मुंबई युनायटेड रन' यशस्वी केली. आयकॉनिक इमारत अशी ओळख असणा-या नवी मुंबई महानगरपालिकेच्या मुख्यालय इमारतीसमोरून सकाळी 6 वाजता नवी मुंबईचे महापौर श्री. जयवंत सुतार यांच्या शुभहस्ते, महापालिका आयुक्त श्री. अण्णासाहेब मिसाळ यांच्या उपस्थितीत 21 किमी हाफ मॅरेथॉनला प्रारंभ झाला आणि ऐरोली विधानसभा सदस्य आमदार श्री. गणेश नाईक यांच्या उपस्थितीत पारितोषिक वितरण समारंभ संपन्न झाला.
याप्रसंगी सभागृह नेते श्री. रविंद्र इथापे, क्रीडा व सांस्कृतिक कार्यक्रम समितीचे सभापती डॉ. जयाजी नाथ, स्वच्छ नवी मिशन तदर्थ समितीच्या सभापती श्रीम. नेत्रा शिर्के, नगरसेवक श्री. विशाल डोळस, स्टर्लिंग इन्स्टिट्यूच्या सचिव श्रीम. पूर्वा वळसे पाटील व विश्वस्त डॉ. अशोक पाटील, शहर अभियंता श्री. सुरेंद्र पाटील, मुख्य लेखा व वित्त अधिकारी श्री. धनराज गरड, मुख्य लेखा परीक्षक श्री. दयानंद निमकर, क्रीडा विभागाचे उपआयुक्त श्री. नितीन काळे, घनकचरा व्यवस्थापन विभागाचे उपआयुक्त श्री. तुषार पवार, परिमंडळ उपआयुक्त श्री. दादासाहेब चाबुकस्वार व डॉ. अमरिश पटनिगीरे, समाजविकास विभागाच्या उपआयुक्त क्रांती पाटील आणि इतर मान्यवर उपस्थित होते.
याप्रसंगी बोलताना आमदार श्री. गणेश नाईक यांनी उत्तम नागरी सुविधांप्रमाणेच माणूसपण घडविणा-या शिक्षण, आरोग्य, क्रीडा विषयक उपक्रमांतून शहराच्या विकासाला गती देण्याचे काम महानगरपालिकेच्या माध्यमातून केले जात असल्याबद्दल समाधान व्यक्त करीत स्वच्छता संदेशाच्या प्रसारासाठी इतक्या मोठ्या संख्येने एकत्र आलेल्या नागरिकांचे कौतुक केले तसेच स्वच्छतेत आपला देशात पहिला क्रमांक येण्यासाठी प्रत्येकाने कर्तव्य भावनेने सक्रीय सहभाग देवूया असे आवाहन केले.
महापौर श्री. जयवंत सुतार यांनी स्वच्छतेच्या एका ध्येयाने प्रेरीत होऊन इतक्या मोठ्या संख्येने आबालवृध्द नागरिक जेव्हा मॅरेथॉनमध्ये सहभागी होतात तेव्हा सकाळ चैतन्यदायी होते असे सांगत आपल्या सर्वांच्या सर्वोत्तम प्रतिसादातून व अभिप्रायातून नवी मुंबई देशात नंबर वन ठरेल व आपण नवी मुंबईचे नागरिक असल्याचे अधिक अभिमानाने सांगू असा विश्वास व्यक्त केला.
याप्रसंगी बोलताना महापालिका आयुक्त श्री. अण्णासाहेब मिसाळ यांनी आजवरच्या स्वच्छतेच्या मानांकनात नवी मुंबईकर नागरिकांच्या सहभागाचा सर्वात मोठा वाटा होता व यापुढील काळात तो अधिक मोठ्या प्रमाणात मिळेल आणि आपण देशात नंबर वन बनण्याचे ध्येय साध्य करू असा विश्वास व्यक्त केला. कचरामुक्त शहराचे फाईव्ह स्टार रेटींग लाभलेले नवी मुंबई हे राज्यातील एकमेव शहर असल्याचे सांगत सेव्हन स्टार रेटींगकडे झेपावत असताना नागरिकांनी आपले योगदान वाढवावे असे आवाहन आयुक्तांनी केले.
सध्याच्या धावपळीच्या शहरी जीवनमानात शारीरिक फिटनेसकडे लक्ष देण्याची गरज असल्याचे मत व्यक्त करीत स्टर्लिंग इन्स्टिट्युटच्या सचिव श्रीम. पूर्वा वळसे पाटील यांनी या 21 किमी हाफ मॅरेथॉनमध्ये अनेक ज्येष्ठ नागरिक धावले ही सर्वांनीच अनुकरण करण्यासारखी गोष्ट असल्याचे सांगितले व त्यापासून इतरांनी आरोग्यदायी प्रेरणा घ्यावी असे मत व्यक्त केले.
ही मॅरेथॉन स्पर्धा हाफ मॅरेथॉन 21 कि.मी., 10 कि.मी., 5 कि.मी. फन रन, नवी मुंबईमधील शालेय 17 वर्षाआतील मुला - मुलींकरीता स्वतंत्र 3 कि.मी. व 14 वर्षाआतील मुला - मुलींकरीता स्वतंत्र 2 कि.मी. अशा विविध गटांत संपन्न झाली. 21 कि.मी. (हाफ मॅरेथॉन) आणि 10 कि.मी. अंतराच्या पुरूष, महिला गटाच्या स्पर्धेत अत्याधुनिक टायमींग चीपचा वापर करण्यात आला होता तसेच यामध्ये नवी मुंबईसह बाहेरच्या शहरांतील नागरिकही सहभागी झाले होते.
खुल्या पुरूष गटात (18 ते 35 वयोगट) 21 किमीचे अंतर 1 तास 10 मि. 52 सेकंदात पूर्ण करून विष्णू राठोरे हा हाफ मॅरेथॉ़नचा विजेता ठरला तसेच खुल्या महिला गटात (18 ते 35 वयोगट) 1 तास 34 मि. 35 सेकंदात 21 किमी अंतर पूर्ण करून साईगीता नायर महिला हाफ मॅरेथॉनची विजेती ठरली. पुरूष गटात अनिल पवार व कमल कुमार त्याचप्रमाणे महिला गटात मंजू गावडे व चैत्राली देवळेकर अनुक्रमे व्दितीय व तृतीय क्रमांकाचे मानकरी ठरले. सर्व विजेत्यांना मेडल्ससह अनुक्रमे 21, 15, 10 हजार रक्कमेची रोख पारितोषिके व प्रशस्तिपत्रे प्रदान करण्यात आली.
21 किमीच्या हाफ मॅरेथॉनच्या 36 ते 49 वयोगटामध्ये पुरूष गटात अनुक्रमे लिंगण्णा मंचीकट्टी, नाथा गिरणेकर, रितेश ठाकूर हे तसेच महिला गटात अनुक्रमे शोभा देसाई, वैशाली गर्ग, जयश्री प्रसाद या प्रथम तीन क्रमांकाच्या मानकरी ठरल्या. त्याचप्रमाणे 50 वर्षावरील वयोगटामध्ये पुरूष गटात उदय बोभाटे, केशव मोते, हरिनारायण रथ तसेच महिला गटात आरती गायकवाड, ॲड. स्फुर्ती कोठारे, निलीमा काळे हे अनुक्रमे तीन क्रमांकाचे विजेते झाले.
10 किमी अंतराच्या स्पर्धेमध्ये 15 ते 35 वयोगटातील पुरूष गटात अनुक्रमे संजय झाकणे, आकाश बिंद, उदयसिंग पडवी हे तसेच महिला गटात अनुक्रमे श्रीदेवी मेहत्रे, सोनिया मोकल, प्रमिला पाटील या तीन क्रमांकाच्या मानकरी ठरल्या. 36 ते 49 वयोगटाच्या पुरूष गटात कल्पेश पाटील, मनीलाल गावित, दिपक कनाल हे आणि महिला गटात डॉ. इंदू टंडन, बर्नांडीन कलवछावला, लक्ष्मी झा या अनुक्रमे तीन क्रमांकाच्या विजेत्या ठरल्या. त्याचप्रमाणे 50 वर्षावरील वयोगटामध्ये पुरूष गटात संजय शिळदनकर, महेश अवस्थी, राजेंद्र गुरव तसेच महिला गटात क्रांती साळवी, शोभा पाटील, सुभाषिणी श्रीकुमार या अनुक्रमे तीन क्रमांकाच्या पारितोषिक विजेत्या झाल्या.
5 किमी अंतराच्या स्पर्धेत नाजुक महाले, विजय मुर्गा, करण माळी यांनी त्याचप्रमाणे मुलींच्या गटात रूतुजा सकपाळ, परिणा खिलारी, संपदा खामकर यांनी अनुक्रमे तीन क्रमांक पटकाविले.
3 किमी अंतराच्या स्पर्धेत मुलांच्या गटात मृणाल सरोदे, विशाल यादव, सिध्देश काटे, आशिष परिहार, पिंटू मदने यांनी तसेच मुलींच्या गटात कल्याणी कंक, प्रतिक्षा कुलये, काजल शेख, मीना कांबळे, सिध्दी वेजरे यांनी अनुक्रमे 5 क्रमांकाची पारितेषिके मेडलसह स्विकारली.
2 किमी अंतराच्या मुलांच्या गटात वैभव मोरे, शिवशंकर पाल व ऋषिकेश चोरगे तसेच मुलींच्या गटात रोशनी जुनघरे, श्रावणी गुरव, दिव्या गायकवाड यांनी अनुक्रमे तीन पारितोषिके पटकाविली.
आंबेडकर नगर रबाळे येथील नवी मुंबई महानगरपालिकेच्या छत्रपती शाहू महाराज विद्यालयातील वैभव मेोरे, काजल शेख, मीना कांबळे, पिंटू मदने या विद्यार्थ्यांनी विविध गटांत पारितोषिके पटकावत महानगरपालिका शाळांची नाममुद्रा उमटविली. नवी मुंबई पोलीस आयुक्तालयाच्या पोलीस बँडनेही याप्रसंगी बँडवादन केले.
पायामध्ये दिव्यंगत्व असूनही आपल्या शारीरिक कमतरतेवर मात करीत 10 किमीची रन जिद्दीने यशस्वीरित्या पूर्ण करणा-या श्रीम. जयश्री शिंदे यांचा यावेळी विशेष सत्कार करण्यात आला.
5 किमीची रन महापालिका आयुक्त श्री. अण्णासाहेब मिसाळ यांनी नागरिकांसह उत्स्फुर्तपणे सहभागी होत पूर्ण केली. ही रन पूर्ण करणा-या श्री. सुरेंद्र पाटील, श्री. नितीन काळे, श्री. धनराज गरड, श्री. दयानंद निमकर, श्री. तुषार पवार, श्री. दादासाहेब चाबुकस्वार, श्री. शंकर पवार, श्री. अरविंद शिंदे, श्री. संजय देसाई, श्री. सुभाष सोनावणे, श्री. प्रवीण गाढे, श्री. प्रल्हाद खोसे, श्री. राजेश पवार या अधिका-यांना यावेळी सन्मानीत करण्यात आले. त्याचप्रमाणे या मॅरेथॉनचे यशस्वी आयोजन करणारे क्रीडा विभागाचे उपआयुक्त श्री. नितीन काळे, घनकचरा व्यवस्थापन विभाग उपायुक्त श्री. तुषार पवार, क्रीडा अधिकारी श्री. रेवप्पा गुरव, स्टर्लिंग इन्स्टिट्युटचे मुख्याधिकारी श्री. अमरजीत खराडे, स्मार्ट कन्सेप्टचे श्री. गौरव व मुग्धा कथोरिया यांचाही उत्तम आयोजनाबद्दल विशेष सन्मान करण्यात आला.
5500 हून अधिक नागरिकांनी शहर स्वच्छतेसाठी एकात्म भावनेने सहभागी होत 'नवी मुंबई महापौर मॅरेथॉन व स्टर्लिंग नवी मुंबई युनायटेड रन' यशस्वी केली आणि स्वच्छ, सुंदर नवी मुंबईचा संदेश प्रसारित केला.
Published on : 05-01-2020 09:51:17,Posted by : Navi Mumbai ,Category : News and update