आयुक्त श्री. अण्णासाहेब मिसाळ यांची शहर सुशोभिकरण कामांची पाहणी
स्वच्छ सर्वेक्षण 2020 ला सामोरे जाताना नवी मुंबई महानगरपालिका क्षेत्राचे रूप पालटलेले दिसत असून नवी मुंबईकर नागरिकांप्रमाणेच शहराला भेट देणारे प्रवासी देखील याबद्दल प्रशंसा करताना दिसतात. ठिकठिकाणी स्वच्छता संदेशांसह विविध संकल्पनांच्या चित्रांनी सजलेल्या भिंती सेल्फी पॉईंट असल्यासारख्या नागरिकांच्या विशेषत्वाने तरूणाईच्या आकर्षणाचे केंद्र ठरत आहेत. मुख्य चौकांमध्ये, कॉर्नरला शिल्पे, म्युरल्स, रोषणाईसह कारंजी अशा विविध गोष्टींमुळे शहराच्या आकर्षकतेत लक्षणीय भर पडलेली दिसून येत आहे. आत्तापर्यंत दुर्लक्षित असलेल्या काही जागांचे रूप बदलल्याने नवी मुंबई अधिक सुंदर दिसू लागल्याचे अभिप्राय विविध स्तरांतून मिळू लागले आहेत.
या पार्श्वभूमीवर नवी मुंबई महानगरपालिकेचे आयुक्त श्री. अण्णासाहेब मिसाळ यांनी शहर सुशोभिकरणाच्या अनुषंगाने काही भागांना भेट देऊन स्वच्छता व सुशोभिकरण कामांची पाहणी केली आणि मौलिक सूचना केल्या. यावेळी त्यांच्या समवेत शहर अभियंता श्री. सुरेंद्र पाटील, उद्यान विभागाचे उपआयुक्त श्री. नितीन काळे, परिमंडळ 1 चे उपआयुक्त श्री. दादासाहेब चाबुकस्वार व सहा. आयुक्त श्री. चंद्रकांत तायडे उपस्थित होते.
शहराचे रूप पालटलेले दिसत आहे ही उत्तम गोष्ट असल्याबद्दल प्रशंसा करतानाच आयुक्तांनी सुशोभिकरणाची ही स्थिती कायम राखण्याची आपली जबाबदारी आता वाढली असल्याचे स्पष्ट केले. सायन पनेवल महामार्ग, आम्र मार्ग याठिकाणच्या हिरवळीची व वृक्षरोपांची निगा राखण्याचे त्यांनी सूचित केले. एलपी जंक्शनजवळील त्रिकोणी जागेचा अत्यंत आकर्षक कायापालट केल्याबद्दल त्यांनी समाधान व्यक्त केले. सेक्टर 3,9,11 नेरूळ येथील वाणिज्य भागातील वर्दळ लक्षात घेऊन त्याठिकाणी तसेच महापालिका क्षेत्रातील सर्वच गर्दीच्या ठिकाणी नियमित स्वच्छता राहण्याकडे अधिक लक्ष देण्याचे आयुक्तांनी निर्देशित केले. इंदिरानगर एमआयडीसी भागातील मुख्य रस्त्यांतील दुभाजकांचे सुशोभिकरण तसेच सेक्टर 50 नेरूळ येथील सर्कलजवळील सुशोभिकरण याविषयी आयुक्तांनी मौल्यवान सूचना केल्या.
'स्वच्छ सर्वेक्षण 2020' च्या अनुषंगाने नवी मुंबई शहराचे बदलणारे रूप नागरिकांना आवडत असल्याचे अभिप्राय विविध माध्यमांतून प्राप्त होत असून नागरिकांनीही आपल्यामुळे शहर अस्वच्छ होणार नाही याची काळजी घ्यावी तसेच शहर अस्वच्छ करणा-या इतरांचेही प्रबोधन करावे असे आवाहन महापालिका आयुक्त श्री. अण्णासाहेब मिसाळ यांनी केले आहे.
Published on : 20-01-2020 15:09:34,Posted by : Navi Mumbai ,Category : News and update