शब्दांवाचून कळणारा स्वच्छता संदेशाचा प्रभावी मुकनाट्यातून प्रचार
अनेकदा शब्दांपेक्षा मुकाभिनयच जास्त प्रभावी असतो याचा प्रत्यय देणारी मुकनाट्ये नवी मुंबई महानगरपालिकेच्या माध्यमातून 'स्वच्छ सर्वेक्षण 2020' च्या अनुषंगाने शाळाशाळांतून सादर केली जाताहेत. स्वच्छतेचा संदेश प्रसारित करणा-या या मुकनाट्यांना विद्यार्थ्यांकडून मिळणारी प्रचंड दाद आणि त्यांच्या मनावर होणारा स्वच्छतेचा सखोल प्रभाव बघता मुकनाट्यांची ही अभिनव संकल्पना यशस्वी होताना दिसत आहे.
नवी मुंबईचे स्वच्छता गीत लिहिणा-या गीतकार श्रीम. धनश्री देसाई संकल्पित व लिखित तसेच छपाक चित्रपट फेम दिग्दर्शक, अभिनेत्री श्रीम. मोनिका शर्मा आणि श्री. राकेश शर्मा यांनी दिग्दर्शित केलेले हे 10 मिनिटांचे स्वच्छतेवर आधारित मुकनाट्य प्रकाश चव्हाण, अंकित चौरसिया, नईम खान, सुमन मौर्य, सूर्यकांत भंडारे, शीतल शर्मा, सनी दावडा, सुशील प्रसाद जोशी हे रंगनिर्वाण आणि भांड थिएटर समुहाचे कलावंत अत्यंत प्रभावीपणे सादर करीत असून उपस्थित विद्यार्थी शब्दांशिवाय अचूकरित्या आशय पोहचविणा-या या मुकनाट्याने प्रभावित होत असल्याचे आजवरच्या 24 शाळांतील विविध वयोगटाच्या हजारो विद्यार्थ्यांकडून अभिप्राय मिळत आहेत.
बरेचदा बोलून बोलून एखादी गोष्ट समजत नाही त्यावेळी मुकाभिनय बरेच काही बोलून जात असल्याचा प्रत्यय येतो. या नाट्यात संवाद नसल्याने त्यामध्ये काय सांगितले जाते याकडे आपसूक अधिक काळजीपूर्वक लक्ष दिले जाते. आणि एखाद्या गोष्टीकडे अत्यंत दक्षतेने पाहिले की त्यातील आशय अधिक खोलवर भिडतो आणि लक्षात राहतो. नेमकी हीच गोष्ट या मुकनाट्यामुळे होत असून विविध माध्यमांतून नागरिकांपर्यंत स्वच्छतेचा संदेश पोहचविण्याचा महानगरपालिकेचा प्रयत्न मुकनाट्याच्या या अभिनव माध्यमातून शब्दांशिवाय योग्य रितीने पोहचत असल्याचे प्रत्ययास येत आहे. आधी अस्वच्छता करणारी माणसे त्याचे आरोग्यावर होणारे परिणाम भोगतात आणि त्यानंतर सावध होत स्वत:च्या चुका सुधारून स्वच्छतेची कास धरतात अशा कथानकाचे व स्वच्छतेची सवय दैनंदिन वर्तणुकीतील बदलांतून कशी लावून घेता येईल अशा आशयाचे काहीसे मनोरंजक पध्दतीने सादर होणारे हे 10 मिनिटांचे मुकनाट्य पाहिल्यानंतर आम्हांला खूप चांगल्या रितीने समजले असे मत मुकनाट्य झाल्यानंतर त्यावर अभिप्राय देताना विविध शाळांतील विद्यार्थी व्यक्त करीत आहेत.
नवी मुंबई शहर स्वच्छतेमध्ये राज्याप्रमाणेच देशात अग्रभागी असावे हा दृढ निश्चय करून महानगरपालिका नागरिकांच्या सहयोगाने सकारात्मक वाटचाल करीत आहे. त्यामध्ये शहराचे भविष्य असणा-या विद्यार्थ्यांमार्फत या स्वच्छता संदेशाचे घराघरांत पालक, शेजारी, परिचित यांच्यापर्यंत चांगले प्रसारण होऊ शकते व लहापणापासूनच मुलांच्या मनावर होणारा स्वच्छतेचा संस्कार नवी मुंबईचा भविष्यकाळ कायम स्वच्छ व सुंदरतोची प्रेरणा देणारा ठरेल या विश्वासाने चित्रकला, निबंध, पथनाट्य, पपेट तसेच मुकनाट्य अशा विविध अभिनव माध्यमांचा वापर जनजागृतीसाठी करण्यात येत असून प्रत्येक नवी मुंबईकर नागरिकाने 'स्वच्छ सर्वेक्षण 2020' मध्ये आपले सक्रीय योगदान द्यावे असे आवाहन नवी मुंबईचे महापौर श्री. जयवंत सुतार आणि महापालिका आयुक्त श्री. अण्णासाहेब मिसाळ यांच्या वतीने करण्यात येत आहे.
Published on : 26-01-2020 09:28:02,Posted by : Navi Mumbai ,Category : News and update