जागतिक कर्करोग दिनानिमित्त विशेष कार्यक्रमातून कर्करोगविषयक जनजागृती

कर्करोगाची वाढती समस्या लक्षात घेऊन नवी मुंबई महानगरपालिका याविषयी जनजागृती व प्रत्यक्ष कार्यवाही करीत असून समाज विकास विभाग व आरोग्य विभाग यांच्या संयुक्त विद्यमाने, इंडियन कॅन्सर सोसायटी मुंबई यांच्या माध्यमातून महापालिका क्षेत्रातील 111 प्रभागांमध्ये महिलांसाठी विशेष कर्करोग तपासणी शिबिर राबविण्यात येत आहे व त्याला उत्तम प्रतिसाद मिळत आहे.
या अनुषंगाने जागतिक कर्करोग दिनाचे औचित्य साधून नवी मुंबई महानगरपालिका अधिकारी, कर्मचारी वृंदासाठी महापालिका मुख्यालयातील ज्ञानकेंद्रात विशेष कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते. याप्रसंगी टाटा मेमोरियल सेंटरचे ॲक्ट्रॅक उप संचालक डॉ. नवीन खत्री यांनी स्वत:च्या आरोग्याकडे दुर्लक्ष करू नये व नियमित तपासणी करून घ्यावी असा सल्ला दिला. भारतात पुरुषांमध्ये मौखीक कर्करोगाचे प्रमाण सर्वाधिक असून महिलांमध्ये स्तन कर्करोगाचे प्रमाण अधिक असल्याची माहिती देत त्यादृष्टीने जागरुकता राखण्याची तसेच स्वयंतपासणी व वैद्यकीय तपासणी करून घेण्याची गरज त्यांनी व्यक्त केली. कर्करोग निदान झाल्यानंतर पूर्ण उपचार घेणे गरजेचे असल्याचेही त्यांनी स्पष्ट केले.
यावेळी कर्करोगावर जिद्दीने मात करणा-या श्रीम. अलका देवेंद्र भुजबळ यांच्या कर्करोग झाल्यापासून बरे होईपर्यंतच्या काळाचा आढावा घेणारा माहितीपट 'कॉमा' प्रदर्शित करण्यात आला. या काळाविषयी अनुभवकथन करताना श्रीम. अलका भुजबळ यांनी कुटुंबातील इतरांची, समाजाची काळजी घेण्याची महिलांची सर्वसाधारण मानसिकता असते, त्यामध्ये त्या स्वत:च्या आरोग्याकडे दुर्लक्ष करतात. त्यामुळे केवळ त्या महिलेचीच नाही तर संपूर्ण कुटुंबाचीच हानी होते. म्हणूनच महिलांनी स्वत:ची काळजी घेण्याची गरज त्यांनी विषद केली. आरोग्याविषयी खूप जागरूक असताना कर्करोग निदान झाल्यावर हादरून गेले असे सांगतानाच आजाराकडे सकारात्मकतेने बघितले, यात कुटुंबियांची खूप साथ लाभली हे त्यांनी आवर्जून सांगितले. कर्करोग रूग्णाला समाजाने धीर देणे गरजेचे असल्याचे सांगत समाजाचा दृष्टीकोन बदलण्याची गरज त्यांनी व्यक्त केली व नवी मुंबई महानगरपालिका कर्करोगविषयक राबवित असलेल्या उपक्रमाचे कौतुक केले.
अतिरिक्त आयुक्त श्री. महावीर पेंढारी यांनी नियमित आरोग्य तपासणीचे महत्व विषद करतानाच स्वअनुभव कथन केले.
समाजविकास विकास विभागाच्या उपआयुक्त श्रीम. क्रांती पाटील यांनी नवी मुंबई महानगरपालिकेच्या वतीने कर्करोग विषयक जाणीव जागृती व प्रत्यक्ष तपासणी करिता राबविल्या जात असलेल्या उपक्रमांची माहिती दिली व उपक्रमांना चांगला प्रतिसाद मिळत असल्याबद्दल समाधान व्यक्त केले.
याप्रसंगी महापालिका सचिव श्रीम. चित्रा बाविस्कर, शासनाच्या माहिती व जनसंपर्क महासंचालनालयाचे निवृत्त संचालक श्री. देवेंद्र भुजबळ, वैद्यकीय अधिकारी डॉ. उज्वला ओतुरकर, कार्यकारी अभियंता श्रीम. शुभांगी दोडे आदी मान्यवर उपस्थित होते. महापालिका मुख्यालयातील ज्ञानकेंद्रात संपन्न झालेल्या या कर्करोगविषयक विशेष कार्यक्रमाप्रसंगी महिला कर्मचारी मोठ्या संख्येने उपस्थित होत्या.
Published on : 06-02-2020 11:21:01,Posted by : Navi Mumbai ,Category : News and update