सी होम्स सोसायटी, सीवूड येथील आग आटोक्यात आणण्यासाठी नमुंमपा अग्निशमन दलाचे शर्थीचे प्रयत्न
नवी मुंबईत सेक्टर 36, सी वूड्स नेरूळ येथील सी होम्स को. ऑप. हौ. सोसा. या 21 मजली इमारतीमध्ये शनिवार दि. 8 फेब्रुवारी 2020 रोजी सकाळी 6 ते 6.30 च्या सुमारास विसाव्या मजल्यावरील एका सदनिकेच्या किचनमध्ये आग लागली होती व त्यानंतर ती 21 व्या मजल्यापर्यंत पसरली. या घटनेची माहिती मिळताच नवी मुंबई महानगरपालिकेचे अग्निशमन दल तातडीने 6 वा. 31 मि. ला घटनास्थळी दाखल झाले आणि तातडीने बचावकार्यास प्रारंभ करण्यात आला.
घटनेचे गांभीर्य लक्षात घेऊन अग्निशमन पथकाने प्रथमत: संपूर्ण इमारतीमधील रहिवाशांना सुरक्षितरित्या बाहेर काढले. आग आटोक्यात आणण्यासाठी महानगरपालिकेच्या अग्निशमन विभागाच्या जवानांनी शर्थीचे प्रयत्न करीत 8 बंब आणि ब्रान्टो स्काय लिफ्ट या अत्याधुनिक वाहनाच्या सहाय्याने आग आटोक्यात आणली. ही आग आटोक्यात आणण्यासाठी साधारणत: पाच तासाचा कालावधी लागला. आगीमध्ये कोणत्याही प्रकारची जिवीतहानी झाली नसून ही आग आटोक्यात आणत असताना अग्निशमन दलाचे 7 जवान मात्र जखमी झाले आहेत. सदर जवानांनी तात्काळ नमुंमपा रूग्णालयात दाखल करण्यात आले असून त्यांची प्रकृती स्थिर आहे. सदर निवासी इमारतीचा 20 व 21 वा मजला पूर्णपणे जळालेला आहे. या घटनेची तपासणी केली असता, सदर सोसायटीने सन 2018 पासून फायर ऑडिट केले नसल्याचे निदर्शनास आले आहे.
Published on : 10-02-2020 12:10:40,Posted by : Navi Mumbai ,Category : News and update