करावे गावात ज्येष्ठ नागरिक विरंगुळा केंद्र उद्घाटन व श्री बामणदेव भुयारी मार्ग नामकरण संपन्न

नवी मुंबईतील नागरिकांना पुरविण्यात येणा-या सेवा सुविधा दर्जेदार असाव्यात याकडे कटाक्षाने लक्ष देतानाच समाजातील सर्व लहान थोर घटकांना आवश्यक सेवा मिळाव्यात ही भूमिका सुरुवातीपासून जपली असून जेष्ठ नागरिकांसाठी करावे येथील भव्य तलावाच्या काठाशी निसर्गरम्य परिसरात बांधण्यात आलेले हे विरंगुळा केंद्र ज्येष्ठांना आनंद देईल अशा शब्दात मनोगत व्यकत करीत ऐरोली विधानसभा सदस्य आमदार श्री. गणेश नाईक यांनी आगामी काळात नवी मुंबईच्या प्रगतीची यशस्वी वाटचाल अशीच कायम राहिल असा विश्वास व्यक्त केला. नवी मुंबई महानगरपालिकेच्या वतीने प्रभाग क्रमांक 110 करावे गांव येथील तलावानजिक बांधण्यात आलेल्या ज्येष्ठ नागरिक विरंगुळा केंद्र उद्घाटन समारंभ आणि पामबीच मार्ग ओलांडण्यासाठी बनविण्यात आलेल्या भुयारी मार्गास श्री बामणदेव भुयारी मार्ग अशा नामकरण समारंभ प्रसंगी ते आपले मनोगत व्यक्त करीत होते.
याप्रसंगी महापौर श्री. जयवंत सुतार, स्थानिक नगरसेवक श्री. विनोद म्हात्रे, परिवहन समितीचे माजी सभापती श्री. विनायक म्हात्रे, माजी नगरसेवक श्री. सुधाकर म्हात्रे व श्रीम. रेखा म्हात्रे, माजी शिक्षणमंडळ सदस्य श्री. रविंद्र नाईक, कार्यकारी अभियंता श्री. अजय संखे व श्री. सुभाष सोनावणे आणि इतर मान्यवर उपस्थित होते.
यावेळी बोलताना महापौर श्री. जयवंत सुतार यांनी महानगरपालिकेने नागरी सेवा पुरविताना आगामी 30 ते 40 वर्षांचा दूरगामी विचार केला असून त्यामुळे नवी मुंबई हे देशातील अग्रणी शहर मानले जाते असे सांगितले. पाणी पुरवठा, घनकचरा व्यवस्थापन, सांडपाणी व्यवस्थापन, शिक्षण, आरोग्य, उद्यान, मैदाने अशा विविध क्षेत्रात नवी मुंबई नेहमी आघाडीवर असून यामध्ये नागरिकांचा महत्वाचा सहभाग राहिला आहे. करावे गावातील नागरिकांसाठी आवश्यक सुविधा पुर्ततेकरीता नगरसेवक श्री. विनोद म्हात्रे नेहमी आग्रही असतात असेही ते म्हणाले.
करावे गांव व परिसरातील ज्येष्ठ नागरिकांसाठी भेटीगाठींचे, सुसंवादाचे एक चांगले ठिकाण या ज्येष्ठ नागरिक विरंगुळा केंद्राच्या माध्यमातून उपलब्ध होत असल्याबद्दल नगरसेवक श्री. विनोद म्हात्रे यांनी नागरिकांच्या वतीने आनंद व्यक्त केला.
गणेश तलावाजवळील उद्यानात 488 चौ.फूट क्षेत्रफळाचे चोहोबाजूनी खेळती हवा राहील अशा स्वरुपात बांधण्यात आलेले हे ज्येष्ठ नागरिक विरंगुळा केंद्र लक्षवेधी आहे. त्याचप्रमाणे पामबीच मार्ग ओलांडून करावे गावातून पलिकडे खाडी किनारी जावे लागत असल्याने काही नागरिकांचा दुर्देवी मृत्यू झाला होता. त्यामुळे नागरिकांची होणारी गैरसोय टाळण्यासाठी पामबीच मार्गावर भुयारी मार्ग बांधण्यात आला आहे. त्यास श्री बामणदेव भुयारी मार्ग असा नामकरण समारंभ स्थानिक नगरसेवक श्री. विनोद म्हात्रे यांनी सूचित केल्याप्रमाणे मा. सर्वसाधारण सभेच्या मंजूरीनंतर यावेळी संपन्न झाला.
Published on : 13-02-2020 11:29:11,Posted by : Navi Mumbai ,Category : News and update