महर्षी दयानंद महाविद्यालयाची एकांकिका "ब्रह्मास्त्र" नवी मुंबई महापौर राज्यस्तरीय करंडकाची मानकरी

विविध कला, क्रीडा उपक्रम राबवून सांस्कृतिक वारसा जपण्याचे काम नवी मुंबई महानगरपालिका करीत असून यामधून गुणवंत कलाकार व खेळाडू निर्माण होतील आणि नवी मुंबईचा नावलौकीक उंचावतील असा विश्वास व्यक्त करीत नवी मुंबईचे महापौर श्री. जयवंत सुतार यांनी या एकांकिका स्पर्धेमुळे कलावंतांसोबतच जाणकार रसिकही निर्माण होत असल्याबद्दल आनंद व्यक्त केला. नवी मुंबई महानगरपालिका क्रीडा व सांस्कृतिक विभागाच्या वतीने 10 ते 12 फेब्रुवारी 2020 या कालावधीत वाशीतील विष्णुदास भावे नाट्यगृहात संपन्न झालेल्या “नवी मुंबई महापौर करंडक राज्यस्तरीय एकांकिका स्पर्धा 2019-2020” पारितोषिक वितरण समारंभप्रसंगी ते आपले मनोगत व्यक्त करीत होते.
याप्रसंगी महापौर श्री. जयवंत सुतार यांच्या समवेत उप महापौर श्रीम. मंदाकिनी म्हात्रे, सभागृह नेते श्री. रविंद्र इथापे, सुप्रसिध्द अभिनेते श्री. अरूण नलावडे, क्रीडा व सांस्कृतिक कार्यक्रम समितीचे सभापती डॉ. जयाजी नाथ, राज्यस्तरीय एकांकिका स्पर्धेचे परिक्षक सुप्रसिध्द दिग्दर्शक श्री. पुरुषोत्तम बेर्डे, नामांकित अभिनेत्री श्रीम. पल्लवी पाटील, नगरसेविका श्रीम. संगीता बो-हाडे, क्रीडा व सांस्कृतिक विभागाचे उप आयुक्त श्री. नितिन काळे, क्रीडा अधिकारी श्री. रेवप्पा गुरव व श्रीम. अभिलाषा म्हात्रे आणि इतर मान्यवर उपस्थित होते.
याप्रसंगी सुप्रसिध्द अभिनेते, दिग्दशर्क श्री. अरुण नलावडे यांनी नवी मुंबई महानगरपालिकेच्या अभिनव उपक्रमांचे कौतुक करीत कलाकार घडविण्यासाठी महानगरपालिका जे प्रयत्न करीत आहे त्याबद्दल प्रशंसा केली. कलावंताने नेहमी शिकण्याची भूमिका जपली पाहिजे असे सांगत त्यांनी पारितोषिक आपल्याला का मिळाले नाही याचा जाब विचारण्यापेक्षा, दुस-याला का मिळाले याचा अभ्यास करण्याची व आपल्यातील कमतरतेचा मागोवा घेण्याची गरज असल्याचे मत व्यक्त केले. यामधून निकोप आणि निरोगी वातावरण निर्माण होईल असे सांगत श्री. अरुण नलावडे यांनी दुस-याच्या चांगल्या गोष्टींसाठी आपली कौतुकाची टाळी वाजली पाहिजे असे सांगितले. महानगरपालिका एवढ्या मोठ्या प्रमाणात स्पर्धा आयोजित करते, आवश्यक सुविधा भरभरून पुरविते अशा वेळी त्याचा लाभ घेऊन आयोजकांनाही उत्साह वाटेल अशाप्रकारे आपली उपस्थिती असली पाहिजे असेही ते म्हणाले.
स्पर्धेतील एकांकिकाबद्दल आपले मत व्यक्त करताना सुप्रसिध्द लेखक, दिग्दर्शक श्री. पुरुषोत्तम बेर्डे यांनी अशाप्रकारच्या सांस्कृतिक स्पर्धा आयोजन करून नवी मुंबई महानगरपालिका शारीरिक आरोग्यासोबतच मानसिक आरोग्याचीही काळजी घेत असल्याबद्दल गौरोवोद्गार काढले. स्पर्धेत सादर झालेल्या 21 एकांकिकांमध्ये विषयांचे वैविध्य होते असे सांगतानाच फॉर्म्युलेबाज एकांकिकांपेक्षा विषयाचे सर्वांगीण आकलन असलेल्या एकांकिका सादर झाल्याबद्दल त्यांनी रंगकर्मींचे कौतुक केले. बक्षिसे मिळत असतात, आपण प्रत्येक सादरीकरणातून शिकत राहणे महत्वाचे असल्याचे सांगत त्यांनी नवी मुंबई महानगरपालिका भरघोस बक्षिस रक्कम देत असल्याने यामधून नकळतपणे केवळ नवी मुंबईतच नाही तर राज्यात नाट्यसंस्था व नाट्यचळवळ उभी करण्याचे मोठे काम होत असल्याचे त्यांनी स्पष्ट केले.
क्रीडा व सांस्कृतिक कार्यक्रम समितीचे सभापती डॉ. जयाजी नाथ यांनी राज्याच्या विविध भागातून आलेल्या नाट्यकर्मींचे नवी मुंबई शहरात स्वागत करीत या एकांकिका स्पर्धेतून नवी मुंबईतील सांस्कृतिक चळवळीला गती मिळेल असा विश्वास व्यक्त केला.
महर्षी दयानंद कॉलेज परेल मुंबई यांनी सादर केलेली "ब्रह्मास्त्र" ही एकांकिका नवी मुंबई महापौर राज्यस्तरीय करंडक आणि रु.50 हजार पारितोषिक रक्कमेची मानकरी ठरली. कल्याणच्या दिशा थिएटरर्सची "अ बास्टर्ड पॅट्रिएट" ही एकांकिका रु. 30 हजार व सन्मानचिन्ह तसेच ऐरोली नवी मुंबई येथील अंजनी प्रतिष्ठानने सादर केलेली "सु-या" हि एकांकिका रु.15 हजार व सन्मानचिन्ह पारितोषिकाची मानकरी ठरली. रु.5 हजार व सन्मानचिन्ह रक्कमेची दोन उत्तेजनार्थ पारितोषिके अनुक्रमे गायन समाज देवल क्लब कोल्हापूर यांच्या "इट हॅपन्स" आणि गंधर्व गुरुकुल टिटवाळा यांच्या "स्टार" या एकांकिकांना प्रदान करण्यात आली.
नवी मुंबई महानगरपालिका क्षेत्रातील सर्वोत्कृष्ट एकांकिकेचे विशेष पारितोषिक शिवरणभूमी प्रशांत प्रतिष्ठान सेवा संस्था, नवी मुंबई यांच्या "भू-भू" या एकांकिकेला रु.11 हजार आणि सन्मानचिन्ह स्वरुपात प्रदान करण्यात आले. वैयक्तिक पारितोषिकांमध्ये सर्वोत्कृष्ट दिग्दर्शनाचे पारितोषिक रोहित मोहिते व रोहित कोतेकर (ब्रह्मास्त्र), सर्वोत्कृष्ट अभिनेत्याचे पारितोषिक रोहन सुर्वे (ब्रह्मास्त्र), सर्वोत्कृष्ट अभिनेत्रीचे पारितोषिक निकिता घाग (भोकरवाडीचा शड्डू), सर्वोत्कृष्ट लेखनाचे पारितोषिक सुदर्शन खोत (इट हॅपन्स), सर्वोत्कृष्ट नेपथ्याचे पारितोषिक तनया कामते व सागर पेंढारी (अ बास्टर्ड पॅट्रिएट), सर्वोत्कृष्ट प्रकाश योजनेचे पारितोषिक शाम चव्हाण (अ बास्टर्ड पॅट्रिएट), सर्वोत्कृष्ट पार्श्वसंगीताचे पारितोषिक शुभम ढेकळे, तन्मय चव्हाण, गुरुप्रसाद गंगा (ब्रह्मास्त्र), रंगभूषा व वेशभूषेचे पारितोषिक जॉय भांबळ व शारदा कांबेळे (काळोखाचा रंग कोणता) यांना रु.2 हजार व सन्मानचिन्ह स्वरुपात प्रदान करण्यात आले. या सर्व प्रथम क्रमांकाच्या वैयक्तिक पारितोषिकांप्रमाणेच व्दितीय व तृतीय क्रमांकाची पारितोषिकेही अनुक्रमे रु.1 हजार 500 व रु.1 हजार रक्कम व सन्मानचिन्हासह प्रदान करण्यात आली.
दि. 10 ते 12 फेब्रुवारी या कालावधीत संपन्न झालेल्या नवी मुंबई महापौर करंडक राज्यस्तरीय एकांकिका स्पर्धेत पहिला वर्ष असूनही नवी मुंबईसह ठाणे जिल्हा, रायगड, पालघर, मुंबई, पुणे, नाशिक, औरंगाबाद, कोल्हापूर, नागपूर या राज्याच्या कानाकोप-यातून 21 दर्जेदार एकांकिका सादर झाल्या.
Published on : 13-02-2020 11:35:31,Posted by : Navi Mumbai ,Category : News and update