समाधानकारक राहणीमानाचा फिडबॅक देण्याचे महापालिका आयुक्त श्री.अण्णासाहेब मिसाळ यांचे आवाहन
विविध नागरी सेवा सुविधांची पूर्तता करताना गुणात्मकता जपली जात असून नवी मुंबई महानगरपालिकेचे अनेक अत्याधुनिक प्रकल्प, उपक्रम विविध पुरस्कारांनी आंतरराष्ट्रीय, राष्ट्रीय पातळीवर नेहमीच नावाजले जातात. येथील सुविधांचा दर्जा आणि उपलब्धतेतील सहजतेमुळे नागरिकांचे जीवनमान सतत उंचावले जात आहे. याविषयी येथील नागरिक नेहमीच विविध स्तरांवर समाधान व्यक्त करताना दिसतात तसेच नवी मुंबईकर नागरिक असल्याचा अभिमानही व्यक्त करतात.
हा अभिमान प्रतिक्रिया स्वरूपात प्रत्यक्ष व्यक्त करण्याची संधी केंद्रीय गृहनिर्माण व शहरी विकास मंत्रालयाच्या वतीने हाती घेण्यात आलेल्या “राहणीमान सुलभता निर्देशांक 2019 (Ease of Living Index 2019)” प्रकल्पाव्दारे नागरिकांना उपलब्ध झाली असल्याची माहिती देत महापालिका आयुक्त श्री. अण्णासाहेब मिसाळ यांनी आत्तापर्यंत 13 हजारहून अधिक नागरिकांनी आपला अभिप्राय नोंदविल्याची माहिती महापालिका मुख्यालयातील पत्रकार परिषदेमध्ये दिली.
29 फेब्रुवारीपर्यंत नागरिक https:/eol2019.org/cirizenfeedback या लिंकवर जाऊन आपला नवी मुंबई शहराविषयीचा अभिप्राय (Citizen Feedback) 24 प्रश्नांची उत्तरे देत नोंदवू शकतात. यामधून नवी मुंबई शहराच्या गुणांकन वाढीत नागरिकांचे प्रत्यक्ष योगदान लाभणार आहे. पाणी, वीज, स्वच्छता व घनकचरा व्यवस्थापन, निवास सुविधा, सुरक्षा, पर्यावरण, मनोरंजन, शिक्षण, वाहतूक, राहणीमान स्तर, हरित जागांची उपलब्धता अशा विविध निकषांवर आधारित हे सर्वेक्षण केले जाणार असून त्यामध्ये, जीवनमान गुणवत्ता (V Quality of Life), आर्थिक क्षमता (Economic Ability), सेवांमधील सातत्य (Sustainability)' या आधारे गुणांकन करण्यात येत आहे. या परीक्षणात नागरिक प्रतिसादाला महत्व आहे.
नवी मुंबईच्या आजवरच्या यशस्वी वाटचालीत नवी मुंबईकर नागरिकांच्या सक्रीय सहभागाचा महत्वाचा वाटा राहिला असून आपले शहर अग्रणी असावे याकरीता नवी मुंबईकर नागरिक नेहमीच जागरूक रहात असल्याचे सांगत महापालिका आयुक्त श्री. अण्णासाहेब मिसाळ यांनी आपल्या शहराविषयीच्या अभिमानास्पद भावना नवी मुंबईकर नागरिकांनी सिटीझन फिडबॅक स्वरुपात द्याव्यात असे आवाहन प्रसारमाध्यमांमार्फत केले आहे.
Published on : 19-02-2020 11:37:59,Posted by : Navi Mumbai ,Category : News and update