सारसोळे संघ ग्रामीण व नेरुळ फ्रेन्डस् संघ नवी मुंबई महापौर चषक फोर्टी प्लस क्रिकेट स्पर्धेचा मानकरी

नवी मुंबई महानगरपालिकेने नेहमीच गुणवंतांना उत्तेजन देण्याची भूमिका जपली असून 40 प्लस क्रिकेटच्या माध्यमातून खेळासोबतच आरोग्य रक्षणाचा संदेश प्रसारित करणा-या क्रिकेटपट्टूंना व्यासपीठ मिळवून देण्याचा प्रयत्न असल्याचे मत व्यक्त करीत नवी मुंबईचे महापौर श्री. जयवंत सुतार यांनी या स्पर्धेतून एकात्मतेची जपणूक होते तसेच खिलाडूवृत्ती जोपासली जाते अशा शब्दात कौतुक केले. नवी मुंबईतून 40 प्लस क्रिकेटची संकल्पना आता राज्यात लोकप्रिय होत असल्याचा अभिमान व्यक्त करीत महापौरांनी यापुढील काळात प्रकाश झोतातील स्पर्धा आयोजित करण्याचा मनोदय व्यक्त केला.
नवी मुंबई महानगरपालिकेच्या वतीने सेक्टर 15, घणसोली येथील फोर्टी प्लस मैदानात 21 ते 23 फेब्रुवारी 2020 या कालावधीत आयोजित करण्यात आलेल्या 'नवी मुंबई महापौर चषक फोर्टी प्लस स्पर्धा' पारितोषिक वितरण समारंभाप्रसंगी ते आपले मनोगत व्यक्त करीत होते. याप्रसंगी माजी खासदार डॉ. संजीव नाईक, क्रीडा व सांस्कृतिक कार्यक्रम समितीचे सभापती डॉ. जयाजी नाथ, नगरसेवक श्री. सुनिल पाटील व श्री. घनश्याम मढवी, नवी मुंबई फोर्टी प्लस क्रिकेट असोसिएशनचे संस्थापक, अध्यक्ष मास्टर प्रदीप पाटील, सचिव श्री. लिलाधर पाटील, खजिनदार श्री. नरेश गौरी, कार्यकारणी सदस्य श्री. विकास मोकल, क्रीडा अधिकारी श्री. रेवप्पा गुरव व श्रीम. अभिलाषा म्हात्रे आणि इतर मान्यवर उपस्थित होते.
याप्रसंगी बोलताना माजी खासदार डॉ. संजीव नाईक यांनी 40 प्लस क्रिकेटमुळे खेळाचा सराव होतो, शारीरिक तंदुरुस्ती राखली जाते व अंगभूत क्षमतेचा विकास होतो असे सांगत सर्व खेळाडूंना शुभेच्छा दिल्या. भविष्यात महानगरपालिकेच्या माध्यमातून सिझन बॉल क्रिकेटचे प्रशिक्षण देऊन गुणवंत क्रिकेटपट्टू घडवावेत अशी सूचना त्यांनी केली.
21 ते 23 फेब्रुवारी या कालावधीत आयोजित करण्यात आलेल्या नवी मुंबई महापौर चषक 40 प्लस क्रिकेट स्पर्धेमध्ये ग्रामीण भागातील 32 व शहरी भागातील 19 संघांनी उत्साही सहभाग घेतला. सारसोळे गांव 40 प्लस संघ करावे 40 प्लस संघावर 7 विकेट्स राखून विजय मिळवित ग्रामीण क्षेत्र महापौर चषकाचा मानकरी ठरला. तसेच नेरुळ फ्रेन्डस् 40 प्लस संघाने युनायटेड स्पोर्टस 40 प्लस संघ ऐरोली यांच्यावर 8 विकेट्सने विजय संपादन करीत शहरी क्षेत्र महापौर चषक पटकाविला. ग्रामीण भागात दिवागांव आणि दारावे 40 प्लस संघ त्याचप्रमाणे शहरी क्षेत्रात खारीगांव व सत्यमेव ऐरोली हे 40 प्लस संघ तृतीय क्रमांकाचे मानकरी ठरले.
मालिकावीर पुरस्कार ग्रामीण भागात सारसोळे 40 प्लस संघाचे दत्ता मेहेर आणि शहरी क्षेत्रात नेरुळ फ्रेन्डस् 40 प्लस संघाचे जीतू परदेशी यांना प्रदान करण्यात आला.
दारावे संघाचे संजीव पाटील हे ग्रामीण क्षेत्रातील व खारीगांव संघाचे जयेश सावंत हे शहरी क्षेत्रातील सर्वोत्कृष्ट फलंदाज ठरले. करावे संघातील उदय तांडेल यांनी ग्रामीण भागात व युनायटेड स्पोर्टस संघातील पुंडलीक हरीयन यांनी शहरी भागात सर्वोत्कृष्ट गोलंदाज पुरस्कार पटकाविला. उत्कृष्ट क्षेत्ररक्षक म्हणून दिवा संघातील प्रकाश केणी आणि सत्यमेव ऐरोली संघातील आनंद बिस्ट यांना गौरविण्यात आले.
तीन दिवस अत्यंत उत्साहात नवी मुंबई महापौर चषकांतर्गत 40 प्लस क्रिकेट स्पर्धा 51 संघांच्या सहभागाने यशस्वी झाल्या त्याबद्दल क्रीडा व सांस्कृतिक कार्यक्रम समितीचे सभापती डॉ. जयाजी नाथ यांनी सहभागी संघांचे व उपस्थितांचे आभार मानले.
Published on : 24-02-2020 14:41:07,Posted by : Navi Mumbai ,Category : News and update