आंतरशालेय कला व सांस्कृतिक स्पर्धेला उत्साहात प्रारंभ

गुणवत्तापूर्ण शिक्षण देत असताना महानगरपालिका शाळांमधील विद्यार्थ्यांचा अंगभूत गुणांना उत्तेजन देण्याचा प्रयत्न विविध उपक्रमांच्या माध्यमातून करून देण्यात येत असून 1500 हून अधिक विद्यार्थ्यांनी सहभागी होत यशस्वी केलेला कलाविष्कार 2020 हा उपक्रम नवी मुंबईचे सांस्कृतिक भविष्य उज्वल असल्याचे दर्शन घडविणारा असल्याचे मत महापौर श्री. जयवंत सुतार यांनी व्यक्त केले व सहभागी कलावंतांना शुभेच्छा दिल्या.
नवी मुंबई महानगरपालिकेच्या शाळांमधील विद्यार्थ्यांच्या कला गुणांना वाव देण्यासाठी नवी मुंबई महानगरपालिका क्रीडा व सांस्कृतिक विभागाच्या वतीने आयोजित करण्यात आलेल्या नवी मुंबई महानगरपालिका आंतरशालेय कला व सांस्कृतिक स्पर्धा 2019-2020 (कलाविष्कार 2020) च्या शुभारंभप्रसंगी महापौर महोदय आपले मनोगत व्यक्त करीत होते. याप्रसंगी उपमहापौर श्रीम. मंदाकिनी म्हात्रे, सभागृह नेते श्री. रविंद्र इथापे, क्रीड व सांस्कृतिक कार्यक्रम समितीचे सभापती स्पर्धा निमंत्रक डॉ. जयाजी नाथ, नगरसेविका श्रीम. अनिता मानवतकर, क्रीडा अधिकारी श्रीम. अभिलाषा म्हात्रे, स्पर्धेच्या परिक्षक संगीत विशारद श्रीम. मानसी जोशी, नृत्य अलंकार डॉ. रुपाली देशपांडे, अभिनेत्री श्रीम. जानकी पाठक आणि इतर मान्यवर उपस्थित होते.
नवी मुंबई महानगरपालिकेच्या वतीने महापौर चषकांतर्गत आयोजित करण्यात येत असलेल्या 20 हून अधिक उपक्रमातील एक महत्वपूर्ण उपक्रम म्हणजे नवी मुंबई महापौर चषक गायन व नृत्य स्पर्धा. ही स्पर्धा दि.03 मार्च 2020 रोजी संपन्न होत असून कलाविष्कार 2020 मधील प्रथम पारितोषिक विजेत्या गायक व नृत्य कलावंतांना महापौर चषक स्पर्धेत थेट अंतिम फेरीत प्रवेश देण्यात येणार असल्याचे महापौर श्री. जयवंत सुतार यांनी घोषित करताच महानगरपालिका शाळांतील विद्यार्थी कलावंतांनी टाळ्यांचा गजर केला.
या आंतरशालेय सांस्कृतिक कला महोत्सवात नवी मुंबई महानगरपालिकेच्या 74 शाळांतील 1500 हून अधिक विद्यार्थ्यांनी सहभाग घेतला असून शालेय स्तरावर प्राथमिक फेरी व केंद्र स्तरावर उपांत्य फेरी घेण्यात येऊन त्यामधून अंतिम फेरीसाठी नृत्य, गायन व अभिनव सादरीकरण या तीन क्षेत्रांसाठी वैयक्तिक व सामुहिक स्पर्धकांची निवड करण्यात आली होती. या निवडक अंतिम फेरीतील स्पर्धकांचा कलाविष्कार पाहण्यासाठी पालक व रसिक नागरिकांची भावे नाट्यगृहात मोठ्या प्रमाणावर गर्दी होती.
Published on : 25-02-2020 13:02:28,Posted by : Navi Mumbai ,Category : News and update