नवी मुंबई महानगरपालिका सार्वत्रिक निवडणूक 2020 मतदार यादीचा कार्यक्रम जाहीर
मा. राज्य निवडणूक आयोग, महाराष्ट्र यांच्याकडील दि. 24 फेब्रुवारी 2020 रोजीच्या पत्रान्वये नवी मुंबई महानगरपालिका सार्वत्रिक निवडणूक 2020 मतदार यादीचा कार्यक्रम जाहिर करण्यात आला आहे.
त्यानुसार दि. 31 जानेवारी 2020 हा मतदार यादी ग्राह्य धरण्याचा दिनांक असून प्रभाग निहाय प्रारुप मतदार यादी दिनांक 09 मार्च 2020 रोजी प्रसिध्द करण्यात येणार आहे. प्रारुप मतदार यादीवर हरकती व सूचना दाखल करण्यासाठी दि. 09 मार्च 2020 ते 16 मार्च 2020 हा कालावधी जाहीर करण्यात आला असून या हरकती व सूचना विहित नमुन्यात नवी मुंबई महानगरपालिका मुख्यालय निवडणूक विभाग आणि संबंधित विभाग कार्यालय याठिकाणी दाखल करता येतील. प्रभाग निहाय प्रारुप मतदार यादी महानगरपालिका मुख्यालय आणि संबंधित प्रभागाच्या विभाग कार्यालयातील सूचना फलकावर तसेच नवी मुंबई महानगरपालिकेच्या www.nmmc.gov.in या संकेतस्थळावर प्रसिध्द करण्यात येणार आहे.
दि. 23 मार्च 2020 रोजी प्रभाग निहाय अंतिम मतदार यादी प्रसिध्द करण्यात येणार आहे. तसेच दि.24 मार्च 2020 रोजी मतदान केंद्रांची यादी प्रसिध्द केली जाणार आहे.
अंतिम प्रभाग निहाय व मतदान केंद्रनिहाय मतदार याद्या अधिप्रमाणित करून दि. 26 मार्च 2020 रोजी प्रसिध्द करण्यात येणार आहेत.
नवी मुंबई महानगरपालिकेची अंतिम प्रभाग रचनेची अधिसूचना व नकाशे नवी मुंबई महानगरपालिकेच्या www.nmmc.gov.in या संकेतस्थळावर नागरिकांच्या माहितीसाठी उपलब्ध करून देण्यात आलेले आहेत.
तरी जाहीर करण्यात आलेल्या मतदार यादी कार्यक्रमाची नोंद संबंधितांनी घ्यावी असे आवाहन महापालिका आयुक्त श्री. अण्णासाहेब मिसाळ यांच्या वतीने करण्यात येत आहे.
Published on : 25-02-2020 14:53:53,Posted by : Navi Mumbai ,Category : News and update