नवी मुंबई महापौर चषक निमंत्रित राज्यस्तरीय खो-खो स्पर्धेला उत्साही प्रारंभ
नवी मुंबईच्या विकासाची गती सतत वाढती असून नागरी सुविधांप्रमाणेच लोककल्याणकारी योजना व उपक्रमांमध्येही नवी मुंबई महानगरपालिका आघाडीवर आहे याबद्दल समाधान व्यक्त करीत ऐरोली विधानसभा सदस्य आमदार श्री. गणेश नाईक यांनी भरघोस क्रीडा व सांस्कृतिक उपक्रमांच्या माध्यमातून गुणवंत खेळाडू व कलावंत निर्मितीमध्ये पुढाकार घेत असल्याबद्दल कौतुक केले. नवी मुंबई महानगरपालिकेच्या वतीने कोपरखैरणे येथील रा.फ.नाईक विद्यालयाच्या क्रीडांगणात 27 ते 29 फेब्रुवारी 2020 या कालावधीत आयोजित करण्यात आलेल्या नवी मुंबई महापौर चषक पाचव्या निमंत्रीत राज्यस्तरीय खो - खो स्पर्धेच्या शुभारंभाप्रसंगी ते आपले मनोगत व्यक्त करीत होते.
याप्रसंगी आमदार श्री. गणेश नाईक यांच्या समवेत महापौर श्री. जयवंत सुतार, क्रीडा व सांस्कृतिक कार्यक्रम समितीचे सभापती डॉ. जयाजी नाथ, नगरसेविका श्रीम. लता मढवी, महाराष्ट्र राज्य खो - खो असोसिएशनचे स्पर्धा निरीक्षक डॉ. पवन पाटील व सह सचिव श्रीम. गंधाली पालांडे, ठाणे जिल्हा खो - खो असोसिएशनचे स्पर्धा निरीक्षक श्री. राजन देवरुखकर, रा.फ.नाईक महाविद्यालयाचे प्राचार्य श्री. थळे, पंच प्रमुख श्री. विरेंद्र भुवड, तांत्रिक समिती प्रमुख श्री. सुरेंद्र विश्वकर्मा, क्रीडा अधिकारी श्री. रेवप्पा गुरव व श्रीम. अभिलाषा म्हात्रे, श्री. मयुर पालांडे आणि इतर मान्यवर उपस्थित होते.
या राज्यस्तरीय निमंत्रितांच्या खो-खो स्पर्धेमध्ये व्यावसायिक पुरुष गटात यजमान नवी मुंबई महानगरपालिकेच्या संघासह बृहन्मुंबई महानगरपालिका, पश्चिम रेल्वे, बँक ऑफ इंडिया, मुंबई पोलीस, साईकृष्ण इलेक्ट्रीक, महाराष्ट्र महावितरण कंपनी व मध्य रेल्वे असे आठ बलाढ्य संघ खेळणार आहेत.
अशाचप्रकारे व्यावसायिक महिला गटात रा.फ.नाईक विद्यालय, राजर्षी शाहू महाराज नमुंमपा विद्यालय, ज्ञानविकास विद्यालय, विहंग ॲकॅडमी, शिवभक्त विद्यामंदीर, ग्रिफीन जिमखाना, नमुंमपा शाळा क्र. 41 व फादर ॲग्नेल हे नामांकित संघ सहभागी आहेत.
याप्रसंगी नुकताच महाराष्ट्र शासनाच्या शिवछत्रपती पुरस्काराने सन्मानित झालेल्या कविता घाणेकर आणि हर्षद हातनकर या दोन राष्ट्रीय खो - खो पट्टूंचा विशेष सन्मान करण्यात आला. चौदा राष्ट्रीय स्पर्धांमध्ये प्रतिनिधीत्व केलेली खो-खो पट्टू प्रणाली मगर हिच्यासह सर्व खेळाडूंनी सामुहिक शपथ ग्रहण केली.
शुभारंभाच्या सामन्यात पुरुष गटात नवी मुंबई महानगरपालिका संघाने मुंबई पोलीस संघावर 12-11 अशी मात करत 1 गुण आणि 0.50 सेकंदाने विजय मिळविला. नवी मुंबई महानगरपालिका संघातील संकेत कदम याने 2.30 मिनिटे / 2.10 मिनिटे खेळ करीत 2 गडी बाद केले. आकाश तोरणे याने 2.40 मिनिटे खेळ करीत 1 गडी बाद केला. मुंबई पोलीस संघातील सुनिल मोरे याने 1.30 मिनिटे खेळ करीत 2 गडी बाद केले तसेच किरण सावंत यांनी 3 गडी बाद करीत उल्लेखनीय खेळ केला.
महिलांच्या गटात छत्रपती शाहू महाराज विद्यालय नमुंमपा शाळा आंबेडकर नगर राबाडे यांनी 1 डाव आणि 7 गुणांनी नमुंमपा शाळा क्र. 41 वर 11-4 अशी मात केली. राष्ट्रीय खेळाडू आश्विनी मोरे हिने 5.30 मिनिटे खेळ करीत 3 गडी बाद केले. तसेच कांचन हलगरे हिने 3.40 मिनिटे खेळ करीत 1 गडी बाद केला व आपल्या संघाच्या विजयात महत्वाची भूमिका बजावली. नमुंमपा शाळा क्र. 41 अडवली भुतावली संघातील संस्कृती पाटील हिने 2.10 मिनिटे खेळ करीत उल्लेखनीय कामगिरी केली.
3 दिवस चालणा-या या राज्यस्तरीय स्पर्धेत राष्ट्रीय स्तर गाजविणा-या अनेक नामांकित पुरुष व महिला खो-खो पट्टूंचा समावेश असून क्रीडा रसिकांनी त्यांचा खेळ पाहण्यासाठी मोठ्या संख्येने उपस्थित रहावे असे आवाहन क्रीडा व सांस्कृतिक कार्यक्रम समितीचे सभापती डॉ. जयाजी नाथ यांच्या वतीने करण्यात येत आहे.
Published on : 02-03-2020 05:44:37,Posted by : Navi Mumbai ,Category : News and update