नवी मुंबई महापौर चषक पॉवर लिफ्टींग स्पर्धेत राज्यभरातून 125 स्पर्धकांचा सहभाग

शरीराची निगा राखण्याप्रमाणेच ते बलशाली असावे याची क्रेझ तरूणांमध्ये असते. त्यामुळे शरीसौष्ठवाकडे विशेष लक्ष देणा-या तरूणाईचा पॉवरलिफ्टींग क्रीडा प्रकाराकडे असणारा ओढा लक्षात घेऊन महापौर चषकांतर्गत विविध क्रीडा प्रकारांच्या स्पर्धांमध्ये यावर्षी पॉवरलिफ्टींग खेळाचाही समावेश करण्यात आला असल्याचे सांगत नवी मुंबईचे महापौर श्री. जयवंत सुतार यांनी स्पर्धेत राज्यभरातून 125 नामांकीत पॉवरलिफ्टर सहभागी झाले व ही स्पर्धा यशस्वी केली त्याबद्दल आनंद व्यक्त केला. नवी मुंबई महानगरपालिकेच्या वतीने जुईपाडा समाजमंदिरामध्ये आयोजित नवी मुंबई महापौर चषक पॉवरलिफ्टींग स्पर्धेच्या पारितोषिक वितरण समारंभ प्रसंगी ते आपले मनोगत व्यक्त करीत होते.
याप्रसंगी महापौर श्री. जयवंत सुतार यांच्या समवेत उपमहापौर श्रीम. मंदाकिनी म्हात्रे, क्रीडा व सांस्कृतिक कार्यक्रम समितीचे सभापती डॉ. जयाजी नाथ, नगरसेविका श्रीम. तनुजा मढवी, क्रीडा अधिकारी श्री. रेवप्पा गुरव, महाराष्ट्र राज्य पॉवरलिफ्टींग फेडरेशनचे उपाध्यक्ष श्री. दिलीप करकाडे व खजिनदार श्रीम. सरला शेट्टी, नवी मुंबई पॉवरलिफ्टींग फेडरेशनचे उपाध्यक्ष श्री. विशाल सिंग आणि इतर मान्यवर उपस्थित होते.
या स्पर्धेत स्ट्राँग मॅन ऑफ नवी मुंबई महापौर चषक हा किताब 490.51 गुण संपादन करीत श्री. पलविंदर सिंग सैनी यांनी पटकाविला तसेच स्ट्राँग वुमन हा किताब 423.17 गुण मिळवत शितल शास्त्री या नवी मुंबईच्या वेटलिफ्टर्सनी पटकाविला. त्यांना अनुक्रमे 31 व 25 हजार रक्कमेची पारितोषिके स्मृतीचिन्हासह प्रदान करण्यात आली.
त्याचप्रमाणे 490.51 गुण संपादन करून पॉवरमॅन ऑफ नवी मुंबई महापौर चषक हा किताब पलविंदरसिंग सैनी (नवी मुंबई) यांनी पटकाविला तसेच 408.52 गुण संपादन करत पॉवर वूमन हा किताब प्रियदर्शनी जागुष्टे (रत्नागिरी) यांनी मिळविला.
खुल्या पुरुष गटामध्ये 59, 66, 74, 83, 93, 105 किलोपर्यंत आणि 120 किलोवरील अशा 7 वजनी गटांमधील पहिल्या तीन क्रमांकाच्या विजेत्यांना अनुक्रमे 5 हजार, 3 हजार, 2 हजार रक्कमेची पारितोषिके प्रशस्तीपत्रासह प्रदान करण्यात आली.
खुल्या महिला गटामध्ये 47, 52, 57, 63, 74, 84 किलोपर्यंत आणि 90 किलो वरील अशा 7 वजनी गटांमधील पहिल्या तीन क्रमांकाच्या विजेत्यांना अनुक्रमे 5 हजार, 3 हजार, 2 हजार रक्कमेची पारितोषिके प्रशस्तीपत्रासह प्रदान करण्यात आली.
नवी मुंबई महानगरपालिका क्षेत्रातील पॉवर लिफ्टर्सप्रमाणेच राज्यातील विविध जिल्ह्यांतून आलेल्या पॉवर लिफ्टर्सनी नवी मुंबई महानगरपालिकेच्या सुनियोजित स्पर्धा आयोजनाचे कौतुक केले.
Published on : 03-03-2020 12:48:00,Posted by : Navi Mumbai ,Category : News and update