नागरिकांना घाबरून न जाता सावध राहून काळजी घेण्याचे आवाहन
सद्यस्थितीत चीनमध्ये व इतर 14 देशांमध्ये कोरोना विषाणूमुळे होणा-या आजाराचे रुग्ण आढळले आहेत. या पार्श्वभूमीवर या आजाराचा प्रवेश भारतात होऊ नये यासाठी आंतरराष्ट्रीय विमानतळावर बाधीत देशातून येणाऱ्या प्रवाशांचे काटेकोर स्क्रीनींग करण्यात येत आहे, तसेच या प्रवाशांचा 14 ते 28 दिवसांकरिता पाठपुरावा करण्यात येऊन या आजाराची लक्षणे आढळलेल्या प्रवाशांचे विलगीकरण आणि प्रयोगशाळा तपासणी अशा विविध उपाययोजना सुरु आहेत.
कोरोना विषाणूच्या इतर देशांतील प्रसारामुळे नागरिकांमध्ये भितीची भावना निर्माण झालेली आहे. नवी मुंबई महानगरपालिका कार्यक्षेत्रात Covid -19 व्हायरसच्या अनुषंगाने प्रतिबंधात्मक व खबरदारीच्या आवश्यक त्या उपाययोजना करण्याच्या दृष्टीकोनातून महापालिका आयुक्त श्री. अण्णासाहेब मिसाळ यांनी होळी व रंगोत्सवाच्या निमित्ताने सार्वजनिक ठिकाणी गर्दी न करण्याचे तसेच यावर्षी होळी न खेळण्याचे आवाहन केले आहे.
नवी मुंबईचे महापैार श्री. जयवंत सुतार व महापालिका आयुक्त श्री अण्णासाहेब मिसाळ यांनी याबाबत आवाहन करीत नागरिकांनी संपूर्ण सहकार्य करावे तसेच सावध राहून स्वत:ची काळजी घ्यावी असे आवाहन केले आहे. प्रतिबंधात्मक उपाय म्हणून नागरिकांनी साबणाने हात वारंवार स्वच्छ धुणे, स्वच्छ व पूर्ण शिजवलेले ताजे अन्न खाणे, शिंकताना व खोकताना आपल्या नाकावर व तोंडावर रुमाल धरणे तसेच सर्दी किंवा फ्ल्यू सदृष्य लक्षणे असलेल्या लोकांशी नजिकचा संपर्क टाळणे अशाप्रकारची काळजी घेण्याचे आवाहन केले आहे.
Published on : 12-03-2020 13:27:30,Posted by : Navi Mumbai ,Category : News and update