आयुक्त श्री.अण्णासाहेब मिसाळ यांनी जारी केले करोना विषाणू प्रतिबंधासाठी उपाययोजनांचे आदेश
महाराष्ट्र शासनामार्फत कोरोना विषाणूचा (कोव्हिड 19) प्रादूर्भाव रोखण्यासाठी महाराष्ट्र राज्यात साथरोग प्रतिबंधात्मक अधिनियम, 1897 ची अंमलबजावणी 13 मार्चच्या अधिसूचनेनुसार सुरु करण्यात आलेली आहे. त्यामध्ये करोना विषाणूमुळे उद्भवणा-या संसर्गजन्य रोगांचा प्रतिबंध व नियंत्रण करण्यासाठी महापालिका आयुक्त हे सक्षम प्राधिकारी म्हणून महापालिका कार्यक्षेत्रासाठी घोषित करण्यात आलेले आहेत.
करोना विषाणू प्रतिबंधासाठी तातडीने उपाययोजना करण्याच्या दृष्टीने आयुक्त श्री. अण्णासाहेब मिसाळ यांनी आज रविवारी सकाळी महापालिका मुख्यालयात तातडीने विभागप्रमुखांची बैठक घेऊन सविस्तर चर्चा केली.
त्या अनुषंगाने नवी मुंबई महापालिका आयुक्त श्री. अण्णासाहेब मिसाळ यांनी सक्षम प्राधिकारी म्हणून महापालिका कार्यक्षेत्रात कोव्हिड 19 वर नियंत्रण आणण्यासाठी व त्याचा प्रादूर्भाव रोखण्यासाठी प्रतिबंधात्मक उपाययोजना करण्याच्या दृष्टीने आदेश जारी केलेला आहे. या आदेशान्वये -
(1) करोना विषाणूचा प्रसार होऊ नये याकरिता खबरदारीची उपाययोजना म्हणून नागरिकांची एका ठिकाणी होणारी गर्दी टाळण्यासाठी महानगरपालिका कार्यक्षेत्रातील सामाजिक, सांस्कृतिक, राजकीय, धार्मिक, शैक्षणिक, क्रीडा विषयक कार्यक्रमांना पुढील आदेशापर्यंत परवानगी नाकारण्यात आली आहे. तसेच यापूर्वी परवानगी देण्यात आली असल्यास सदर परवानगी रद्द करण्यात आली आहे.
(2) करोना विषाणूचा प्रादूर्भाव रोखण्यासाठी महानगरपालिका कार्यक्षेत्रातील अंगणवाडी, बालवाडी, सर्व सरकारी व खाजगी शाळा, महाविदयालये, कोचिंग क्लासेस, ग्रंथालये / अभ्यासिका, सिनेमागृहे, नाटयगृहे, सर्व गृहनिर्माण संस्था, हॉटेल व सार्वजनिक ठिकाणी असलेले जलतरण तलाव आणि व्यायामशाळा / जीम, मॉल्स, महापालिका बहुउद्देशीय इमारतीमधील सभागृहे तसेच खाजगी मंगल कार्यालये व सभागृहे, हॉटेल्समधील बॅक्वेंट हॉल्स, सर्व क्रीडा संकुले, ज्येष्ठ नागरिक विरंगुळा केंद्रे पुढील आदेश होईपर्यंत बंद राहतील.
(3) तथापि 10 वी व 12 वी च्या परीक्षा तसेच विश्व विदयालयाच्या परीक्षा शासन आदेशानुसार निश्चित वेळेत विहित वेळापत्रकानुसार घेण्यात येणार आहेत. त्याचप्रमाणे आजारी विदयार्थी हे इतर विदयार्थ्यांच्या संपर्कात येणार नाहीत याबाबत शिक्षण संस्था व व्यवस्थापनाने आवश्यक दक्षता व खबरदारी घ्यावयाची असल्याचे स्पष्ट करण्यात आले आहे.
(4) महापालिका कार्यक्षेत्रातील सर्व उदयाने, पार्क, गार्डन ही क्षेत्रे प्रतिबंधीत करण्यात आली आहेत.
(5) मैदाने / मोकळया जागा या ठिकाणी नियोजित कोणत्याही प्रकारचे सामाजिक / सांस्कृतिक कार्यक्रम, उपक्रम व महोत्सव यांच्या आयोजनास प्रतिबंध करण्यात आला आहे.
याशिवाय महत्वाचे म्हणजे करोना बाधित प्रदेशातून प्रवास करुन आलेल्या प्रवाशाने 14 दिवसांच्या कालावधीकरिता आरोग्य विभागाच्या सुचनांनुसार स्वत:च्या घरात अलगीकरण (Home Quarantine) करुन राहणे बंधनकारक असणार आहे. केंद्र शासनामार्फत अलगीकरण संबधीच्या सूचनांचे काटकोरपणे पालन करणे गरजेचे असून तसे न केल्यास अशा प्रवाशांना राज्य शासनाने कार्यान्वीत केलेल्या अलगीकरण कक्षात दाखल करण्यात येईल याची नोंद घ्यावयाची असल्याचे स्पष्टपणे नमूद करण्यात आले आहे.
नवी मुंबई महापालिका कार्यक्षेत्रातील कोणतीही व्यक्ती, संस्था तसेच संघटना यांनी या नियमांचे पालन करणे अनिवार्य असणार आहे. या नियमांचे उल्लंघन केल्यास ते भारतीय दंडसंहिता (1860 चे 45) च्या कलम 188 नुसार दंडनीय / कायदेशीर कारवाईस पात्र राहतील व या नियमावलीनुसार प्राधिकृत अधिकारी उपरोक्त नुसार व वेळोवेळी शासनाने या नियमानुसार दिलेल्या सूचनांचे उल्लंघन करणा-याविरुध्द दंडनीय कारवाई करण्यास सक्षम असणार आहे. हे आदेश तात्काळ अंमलात येत असून पुढील आदेश होईपर्यंत अस्तित्वात राहतील असे नमूद करण्यात आले आहे.
करोना विषाणूचा प्रसार रोखण्यासाठी सार्वजनिक आरोग्य हिताच्या दृष्टीने या सर्व प्रतिबंधात्मक उपाययोजना करण्यात येत असून नागरिकांनी त्यासाठी संपूर्ण सहकार्य करावे असे आवाहन करतानाच महापालिका आयुक्त श्री. अण्णासाहेब मिसाळ यांनी नागरिकांनी घाबरून न जाता सावध राहून नियमितपणे साबण व पाणी वापरून आपले हात स्वच्छ धुवावेत, डोळे नाक व तोंडाला स्पर्श करणे टाळावे, खोकताना व शिंकताना स्वच्छ हातरूमालाचा वापर करावा, करोनाग्रस्त रूग्णाच्या संपर्कात असेल तरच एन 95 या विशिष्ट मास्कचा वापर करावा असेही आवाहन केले आहे.
Published on : 16-03-2020 05:32:27,Posted by : Navi Mumbai ,Category : News and update