नवी मुंबई महानगरपालिका सार्वत्रिक निवडणूक 2020 करीता 2538 हरकती / सूचना प्राप्त
मा. राज्य निवडणूक आयोग, महाराष्ट्र यांच्या निर्देशानुसार दि. 31 जानेवारी 2020 हा मतदार यादी ग्राह्य धरण्याचा दिनांक असून 09 मार्च 2020 रोजी प्रभागनिहाय प्रारुप मतदार यादी प्रसिध्द करण्यात आली आहे. या प्रारुप मतदार यादीवर हरकती व सूचना दाखल करण्यासाठी दि. 09 मार्च ते 16 मार्च 2020 हा कालावधी जाहीर करण्यात आला होता. याबाबत महापालिका आयुक्त तथा निवडणूक अधिकारी श्री. अण्णासाहेब मिसाळ यांच्या मार्गदर्शनाखाली व्यापक प्रसिध्दी करण्यात आल्याने जागरूक नागरिकांनी मोठ्या प्रमाणावर सर्च इंजीनव्दारे स्वत:चे ऑनलाईन नाव शोधले.
त्या अनुषंगाने 16 मार्च 2020 या अखेरच्या दिनांकापर्यंत प्रारुप मतदार यादी संदर्भात नागरिकांकडून 2538 हरकती / सूचना प्राप्त झाल्या. या हरकतींमध्ये नागरिकांकडून एकाच प्रकारच्या हरकतीचे दोन वा तीन अर्ज देणा-या नागरिकांची संख्या जास्त आहे. यामध्ये दिघा विभागात 124, ऐरोली विभागात 222, घणसोली विभागात 367, कोपरखैरणे विभागात 302, वाशी विभागात 209, तुर्भे विभागात 761, नेरुळ विभागात 434 व बेलापूर विभागात 119 अशा प्रकारे एकूण 2538 हरकती / सूचना प्राप्त झाल्या आहेत.
या हरकती / सूचनांची पडताळणी करण्यासाठी महापालिका आयुक्त श्री. अण्णासाहेब मिसाळ यांनी दि. 3 मार्च 2020 रोजीच्या आदेशानुसार आठही विभागांकरीता विभाग कार्यालयनिहाय आठ समित्या गठीत केल्या आहेत. महानगरपालिकेचे विभागप्रमुख हे या समितीचे अध्यक्ष असून संबंधित विभागाचे कार्यकारी अभियंता हे सदस्य आहेत. ही समिती हरकती / सूचनांच्या अनुषंगाने प्रत्यक्ष पाहणी व शहानिशा करणार असून प्राप्त झालेल्या हरकती / सूचनांवर निर्णय घेणार आहे. तद्नंतर दि. 23 मार्च 2020 रोजी प्रभागनिहाय अंतिम मतदार यादी प्रसिध्द करण्यात येणार आहे.
नवी मुंबई महानगरपालिकेची सार्वत्रिक निवडणूक 2020 सुनियोजित पध्दतीने पार पडण्यासाठी महापालिका आयुक्त तथा निवडणूक अधिकारी श्री. अण्णासाहेब मिसाळ यांच्या मार्गदर्शनानुसार निवडणूक विषयक प्रत्येक बाबीची कार्यवाही व्यापक प्रचार, प्रसार करीत पारदर्शकपणे राबविण्यात येत आहे.
Published on : 16-03-2020 15:45:50,Posted by : Navi Mumbai ,Category : News and update