कोरोना विषाणू प्रतिबंधासाठी नवी मुंबई महापालिका क्षेत्रातील आय.टी.पार्क मधील उपस्थितीवर निर्बंध आयु्क्त श्री. अण्णासाहेब मिसाळ यांनी केली प्रत्यक्ष पाहणी

"साथरोग प्रतिबंधात्मक अधिनियम 1897" अंमलबजावणीच्या अनुषंगाने कोरोना विषाणूचा प्रसार रोखण्यासाठी महापालिका आयुक्त श्री. अण्णासाहेब मिसाळ हे महापालिका क्षेत्रासाठी सक्षम प्राधिकारी असून यादृष्टीने नवी मुंबई महानगरपालिका क्षेत्रातील आय.टी. कंपन्यांकरिता 17 मार्च 2020 रोजी आदेश जारी करण्यात आला आहे.
या आदेशान्वये आय.टी. कंपन्यांच्या व्यवस्थापनांना केवळ अत्यावश्यक अधिकारी, कर्मचारी यांनाच कार्यालयात उपस्थित राहण्यास सांगावे असे निर्देशित करण्यात आले असून इतर अधिकारी, कर्मचारी यांना त्यांच्या निवासस्थानाहून काम करण्याची मुभा द्यावी असे सूचित करण्यात आले आहे.
याशिवाय कार्यालयांमध्ये अधिकारी व कर्मचारी यांच्याकरीता हॅँड सॅनिटायझर आणि मास्क पुरविण्याच्या सूचना देण्यात आलेल्या आहेत. तसेच कार्यालय परिसराचे दररोज निर्जुंतुकीकरण करुन घ्यावे असेही सूचित करण्यात आले आहे.
या अनुषंगाने महापालिका आयुक्त श्री. अण्णासाहेब मिसाळ यांनी परिमंडळ 2 चे उपआयुक्त डॉ. अमरिश पटनिगिरे यांचेसोबत माईंड स्पेस आय टी पार्कला भेट देत त्याठिकाणी पाहणी केली व अत्यावश्यक स्वरुपाचे काम असणा-या अधिकारी, कर्मचा-यांनाच कामावर उपस्थित राहण्यास सांगावे व उर्वरित कर्मचा-यांना त्यांच्या घरून काम करण्याची मुभा द्यावी असे स्पष्ट केले. यावेळी व्यवस्थापनाने अशाप्रकारे कार्यवाही करण्याचे निर्देश संबंधित आय.टी. संस्थांना देऊन काटेकोर अंमलबजावणी करू असे आश्वस्त केले.
कोरोना विषाणू संसर्गातून पसरत असल्याने सर्वांनीच काळजी घेणे गरजेचे असल्याचे स्पष्ट करीत आय.टी. पार्कमध्ये हजारोंच्या संख्येने विशेषत्वाने युवा कर्मचारी कार्यरत असल्याने आय.टी. कंपन्यांच्या व्यवस्थापनांनी अधिक दक्षता घ्यावी अशा स्पष्ट सूचना महापालिका आयुक्त श्री. अण्णासाहेब मिसाळ यांनी केल्या.
Published on : 19-03-2020 16:15:14,Posted by : Navi Mumbai ,Category : News and update