एन.एन.एम.टी. बसेसमध्येही कोरोना विषाणू प्रतिबंधात्मक उपाय योजना
जगभरात कोरोना विषाणूचा (COVID-19) धोका दिवसेंदिवस वाढत असल्याने भारतातही काळजी घेतली जात आहे. नागरिकांमध्ये याबाबत जनजागृती करण्याचे प्रयत्न सर्व स्तरावर केले जात आहेत. देशात तसेच महाराष्ट्र राज्यात विविध शहरांमध्ये कोरोनाग्रस्त रुग्ण आढळून आल्याने प्रत्येक विभागाद्वारे कोरोना विषाणुविषयी जनजागृती व प्रतिबंधात्मक उपाय योजना करण्यात येत आहेत.
तद्अनुषंगाने नवी मुंबई महानगरपालिका परिवहन उपक्रमाकडून सर्व कर्मचारी व प्रवाशांना विषाणूची लागण होवू नये म्हणून सावधानता बाळगण्याबाबत सूचना व प्रशिक्षण देण्यात आले आहे. तसेच सर्व कार्यालय, कार्यशाळा, नियंत्रण कक्ष, प्रसाधन गृह व बस स्थानक परिसराची जंतू नाशकाचा वापर करून नियमित स्वच्छ राहतील याची दक्षता घेण्यात येत आहे सर्व आगाराच्या प्रवेशद्वारावर आणि नियंत्रण कक्षावर तसेच प्रसाधनगृह व वॉश बेसीनजवळ उच्च दर्जाचे सेनिटायझर व हँडवॉश ठेवण्यात आले आहेत.
प्रवाशांच्या सुरक्षतेच्या दृष्टीने सर्व बसेसची दैनंदिन स्वच्छता व बसेसमध्ये जंतूनाशक फवारणी करूनच बसेस परावर्तीत करण्यात येत आहेत. आगारात येणाऱ्या सर्व बसेसमध्ये आगाराच्या प्रवशेद्वारावच निरजंतूकीकरणाची फवारणी करण्यात येत आहे. वातानुकूलित बसेसची दिवसातून तीन वेळा फवारणी केली जाते. प्रवाशांसाठी उभारण्यात आलेले सर्व बस शेल्टर यांची दररोज निर्जंतुक करण्यात येत आहेत. आगारे व बस टर्मिनस व आजूबाजूच्या परिसराची नियमित स्वच्छता व निर्जंतुकीकरण करण्यात येत आहेत.
सध्या दि.14 मार्च 2020 पासून सर्व बसेसचे प्रवर्तन व फेऱ्या यामध्ये 30% इतकी कपात केली असून आवश्यकतेनुसार यामध्ये वाढ किंवा घट करण्यात येईल. दैनंदिन प्रवाशांमध्ये सध्या मोठया प्रमाणात घट झालेली आहे. तसेच बसेसमध्ये उभे राहून प्रवास करण्यास मनाई करण्यात आलेली असून ज्या मार्गावर यामुळे गर्दी होण्याची शक्यता दिसल्यास त्या मार्गावरील बसेसमध्ये वाढ करण्यात येईल.
प्रवाशी सेवा देत असताना जनतेच्या थेट संपर्कात येणाऱ्या सर्व वाहक, वाहतुक नियंत्रक, सहा. वाहतुक निरीक्षक इ. पर्यवेक्षकीय कर्मचाऱ्यांना, स्वच्छता कर्मचारी व सुरक्षा रक्षक यांना मास्क वितरित करण्यात आले आहेत. महापालिकेच्या आरोग्य विभागाने कोरोना विषाणू (COVID-19) बाबत जनजागृती करण्यासाठी तयार केलेली पोस्टर बसेसमध्ये लावण्यात येणार आहेत. तसेच याबाबत महापालिका आयुक्त यांचेकडून आलेल्या सूचनांची तात्काळ अंमलबजावणी करण्यात येत आहे.
Published on : 19-03-2020 16:15:52,Posted by : Navi Mumbai ,Category : News and update