कोरोनाचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी व्यापक जनजागृतीवर महानगरपालिकेचा भर 22 मार्चला 'जनता संचारबंदी' मध्ये कर्तव्य भावनेने सहभागी होण्याचे आवाहन
कोरोना विषाणूचा प्रसार रोखण्यासाठी सुरूवातीपासून नवी मुंबई महानगरपालिका आयुक्त श्री. अण्णासाहेब मिसाळ यांच्या मार्गदर्शनानुसार विविध माध्यमांतून जनजागृती केली जात असून नागरिकांनी घ्यावयाची काळजी तसेच गर्दी करणे टाळण्याचे आवाहन सातत्याने केले जात आहे.
या अनुषंगाने नागरिक जनजागृतीसाठी करोना विषाणू प्रतिबंधासाठी घ्यावयाच्या काळजी विषयी माहिती देणारी 3 लाख हस्तपत्रके (पॅम्प्लेट) घरोघरी वितरित करण्यात आलेली आहेत. त्याचप्रमाणे 1 लाख पोस्टर्स सोसायटी, वसाहती तसेच सार्वजनिक ठिकाणी प्रदर्शित करण्यात आलेली आहेत. त्या सोबतीनेच रेल्वे स्टेशन्स, डेपो, महत्वाचे चौक अशा ठिकाणी 50 मोठी होर्डींग प्रदर्शित करण्यात आली असून महामार्गावरील 2 गॅन्ट्रीवर करोना प्रतिबंधाविषयी फलकांव्दारे जनजागृती करण्यात आलेली आहे. याशिवाय शहरात 70 ठिकाणी लाकडी चौकटींची होर्डींग प्रदर्शित करण्यात आलेली असून 40 बसस्टॉप आणि 60 एन.एम.एम.टी. बसेसवर जनजागृतीपर फलक प्रदर्शित करण्यात आले आहेत.
महानगरपालिकेच्या सर्व कचरा गाड्यांवर जनजागृतीपर ऑडिओ क्लिप वाजविण्यात येत असून तशा प्रकारे विभागवार रिक्षांव्दारेही प्रचार, प्रसार करण्यात येत आहे. सध्याची सोशल मिडिया लोकप्रियता लक्षात घेऊन फेसबुक, ट्विटर, व्हॉट्स ॲप माध्यमांचा प्रभावी वापर करूनही कोरोना विषाणी पासून बचावाविषयी जनजागृती करण्यात येत आहे.
जनजागृतीप्रमाणेच विशेष दक्षता घेत महानगरपालिकेच्या वाशी येथील सार्वजनिक रुग्णालयात 38 बेड्स व आवश्यक व्हेंटिलेटर्सची सुविधा असणारा विलगीकरण (ISOLATION) कक्ष स्थापित करण्यात आला आहे. त्याचप्रमाणे परदेशातून भारतात आलेल्या नवी मुंबईतील प्रवाशांना 14 दिवस अलगीकरण (QUARANTINE) कक्षात ठेवण्याची सुविधा वाशी सेक्टर 14 येथील बहुउद्देशीय इमारतीत करण्यात आलेली आहे. सद्यस्थितीत नवी मुंबई महानगरपालिकेच्या वाशी येथील अलगीकरण कक्षात 32 परदेशी प्रवास करून आलेल्या नागरिकांना दाखल करण्यात आले असून त्याठिकाणी त्यांची जेवणासह सर्व आवश्यक व्यवस्था करण्यात आली आहे व डॉक्टर्ससह वैद्यकीय सुविधा उपलब्ध करून देण्यात आलेली आहे. 152 नागरिक त्यांच्या निवासस्थानी अलगीकरण (HOME QUARANTINE) करून रहात आहेत. त्यांच्याशी दिवसातून किमान 3 वेळा स्थानिक नागरी आरोग्य केंद्राच्या वैद्यकीय अधिकारी यांच्या नियंत्रणाखाली शीघ्र प्रतिसाद पथकाकडून संपर्क साधला जात असून त्यांच्या आरोग्याची काळजी घेण्यात येत आहे. या अनुषंगाने परदेशी प्रवास करून नवी मुंबईत आलेल्या प्रवाशांची माहिती नवी मुंबई महानगरपालिकेकडे देण्यासाठी प्रवाशांनी, त्यांच्या कुटुंबियांनी व नागरिकांनी नवी मुंबई महानगरपालिकेचा टोल फ्री क्रमांक 1800222309 / 2310 याचा वापर करावा असे आवाहन आहे.
यापुढील काळ हा कोरोना विषाणूच्या प्रसारासाठी अत्यंत जोखमीचा असल्याने नागरिकांनी कोणत्याही प्रकारे हलगर्जीपणा न करता आवश्यक असेल तरच घराबाहेर पडावे तसेच गर्दी करू नये व गर्दीच्या ठिकाणी जाणे टाळावे असे सूचित करीत मा.पंतप्रधान श्री. नरेंद्र मोदी यांनी केलेल्या राष्ट्रव्यापी आवाहनास अनुसरून रविवार, दि. 22 मार्च 2020 रोजी, सकाळी 7 ते रात्री 9 या वेळेत, नवी मुंबईकर नागरिकांनी स्वत:हून घरात थांबून कोरोना विषाणूविरूध्दच्या लढ्यात 'जनता संचारबंदी' व्दारे एकात्मतेचे दर्शन घडवावे असे आवाहन नवी मुंबईचे महापौर श्री. जयवंत सुतार आणि महापालिका आयुक्त श्री. अण्णासाहेब मिसाळ यांच्या वतीने करण्यात येत आहे.
Published on : 23-03-2020 07:32:49,Posted by : Navi Mumbai ,Category : News and update