कामगार,मजूर,बेघरांची गैरसोय टाळण्यासाठी आयुक्त श्री.अण्णासाहेब मिसाळ यांच्या अध्यक्षतेखाली सनियंत्रण समिती
कोरोना विषाणूचा (कोव्हिड-19) प्रादुर्भाव रोखण्यासाठी करण्यात आलेल्या लॉकडाऊन आदेशामुळे बंद झालेल्या उदयोग व व्यवसायातील प्रभावित कामगार, परराज्यातील विस्थापित कामगार व बेघर व्यक्ती यांच्यासाठी निवारागृह व तेथे अन्न, पाणी, वैदयकीय देखभाल या सुविधा स्वयंसेवी संस्थांच्या सहाय्याने केंद्रीय किचन व्यवस्थेच्या माध्यमातून शिजविलेले अथवा तयार अन्नाचा पुरवठा करावयाचा शासन आदेश आहे.
याकरिता शहरी भागामध्ये लॉकडाऊनच्या कालावधीत अडकलेल्या मजूर, विस्थापित व बेघर व्यक्तींना आवश्यकतेनुसार निवारागृह, अन्न, पाणी व वैद्यकीय देखभाल सुविधा उपलब्ध करुन देण्यासाठी नवी मुंबई महानगरपालिकेच्या वतीने महापालिका आयुक्त श्री. अण्णासाहेब मिसाळ यांच्या अध्यक्षतेखाली “महानगरपालिका स्तरीय सनियंत्रण समिती” गठीत करण्यात आली आहे. यामध्ये अतिरिक्त आयुक्त 1 व 2 तसेच उपआयुक्त शिक्षण, उपआयुक्त परिमंडळ 1 व 2 आणि परिवहन व्यवस्थापक हे सदस्य असणार आहेत. त्याचप्रमाणे संचालक इटीसी अपंग शिक्षण प्रशिक्षण केंद्र हे सदस्य तथा नोडल अधिकारी म्हणून कार्यरत असणार आहेत.
या महानगरपालिका सनियंत्रण समितीमार्फत, महापालिका क्षेत्रातील विविध भागामध्ये जीवनावश्यक सुविधा उपलब्ध न झालेले विविध घटकातील मजूर, विस्थापित व बेघर व्यक्ती यांची निश्चिती करणे, या गरजू व्यक्तींची विभागनिहाय यादी तयार करणे, या यादीच्या आधारावर विभागनिहाय लागणारी अन्नधान्याची आवश्यकता व उपलब्धता निश्चित करणे, ही कामे पार पाडण्यासाठी क्षेत्रीय स्तरावर काम करणा-या स्वंयसेवी संस्था, खाजगी संस्था, धर्मादाय संस्था, सहकारी संस्था तसेच सीएसआर मधून मदत उपलब्ध करुन देणा-या संस्था, दानशूर व्यक्ती यांची यादी तयार करणे, संस्थांना अन्नधान्य व निधी स्वरुपात मदत करण्याबाबत जाहीर आवाहन करणे, शिजविलेले / तयार असलेले अन्न वितरीत करण्यासाठी यंत्रणा कार्यान्वित करणे, स्थानिक पातळीवर अन्नधान्य स्वरुपात मिळालेली मदत, मागणीप्रमाणे किती लोकांसाठी पुरेशी असेल याची निश्चिती करणे, एकुण मागणीपैकी सर्व मागणी स्वयंसेवी संस्थामार्फत मिळणा-या मदतीमधून पूर्ण होत नसल्यास शासनाकडून मिळालेल्या निधीतून ही मागणी कशी पूर्ण करता येईल याचे नियोजन करणे, महापालिका क्षेत्रासाठी महापालिका स्तरावर कामकाज पार पाडण्यासाठी आवश्यकतेनुसार एक किंवा अधिक नोडल अधिकारी यांची नेमणूक करणे व या नोडल अधिकारी यांनी सेवाभावी संस्था व दानशूर व्यक्ती यांच्याशी समन्वय साधून अन्नधान्य स्वरुपात मदत प्राप्त करून घेणे, कोरोनो विषाणुचा प्रादुर्भाव होऊ नये यासाठी सोशल डिस्टन्सींग प्रोटोकॉल पाळणे आवश्यक असल्यामुळे अनावश्यक गर्दी टाळण्यासाठी महापालिका क्षेत्रात कामकाजाचे सनियंत्रण करण्याकरिता वॉर्ड स्तरावर एक किंवा एकापेक्षा अधिक नोडल अधिकारी यांची नेमणूक करणे आणि नोडल अधिकारी यांची माहिती शासनास उपलब्ध करुन देणे, या यंत्रणेमध्ये काम करणा-या सर्व व्यक्तींना स्वच्छता व करोना विषाणू प्रतिबंधाबाबतच्या सूचना व निर्देश देणे, स्थापित केलेल्या महापालिका स्तरीय नियंत्रण कक्षाचे दूरध्वनी क्रमांक 1800222309 / 1800222310 तातडीने प्रसिध्द करणे, कम्युनिटी किचनची सुविधा उपलब्ध करुन देणे, महानगरपालिका क्षेत्रामध्ये या सर्व बाबींचे नियोजन वॉर्डनिहाय सहाय्यक आयुक्त यांचेमार्फत पार पाडणे आणि नोडल अधिकारी यांनी निवारागृह / कम्युनिटी किचन याबाबतचा दैनंदिन अहवाल शासनास सादर करणे अषा प्रकारे कार्यप्रणाली निश्चित करण्यात आलेली आहे.
लॉकडाऊनमुळे बंद झालेल्या उद्योग, व्यवसायातील प्रभावित कामगार, परराज्यातील विस्थापित कामगार व बेघर व्यक्ती यांना जगण्यासाठी मदतीचा हात देण्याचे काम नवी मुंबई महानगरपालिकेच्या माध्यमातून केले जात असून त्यास पूरक असे सनियंत्रण या समितीने करावयाचे असल्याबाबतचे निर्देश महापालिका आयुक्त तथा या समितीचे अध्यक्ष श्री.अण्णासाहेब मिसाळ यांनी दिलेले आहेत.
तरी ज्या संस्था, व्यक्ती अशा प्रकारची अन्नधान्य मदत करू इच्छितात त्यांनी कोव्हीड - 19 नियंत्रण कक्षाशी 1800222309 / 2310 या टोल फ्री क्रमांकावर संपर्क साधावा किंवा सनियंत्रण समितीच्या नोडल अधिकारी श्रीम. वर्षा भगत यांचेशी मोबाईल क्रमांक 9167979199 यावर किंवा समिती सदस्य श्री. नितीन काळे यांच्याशी 8007009001 या क्रमांकावर संपर्क साधावा असे आवाहन करण्यात येत आहे.
Published on : 01-04-2020 08:31:39,Posted by : Navi Mumbai ,Category : News and update