"स्वच्छ रेडिओ नवी मुंबई" आता गुगल ॲपवर उपलब्ध
कोव्हिड – 19 बाबत नागरिकांमध्ये जनजागृती करण्यासाठी विविध माध्यमांप्रमाणेच इंटरनेट रेडिओ सारख्या प्रभावी माध्यमाचा उपयोग करणारी नवी मुंबई ही देशातील पहिली महानगरपालिका ठरली असून आता "स्वच्छ रेडिओ नवी मुंबई (Swachh Radio Navi Mumbai)" ॲपवरही उपलब्ध झाला असून नागरिक आता गुगल प्ले स्टोअर वरून हे ॲप सहजपणे डाऊनलोड करून घेऊ शकतात.
जगभर कोरोना विषाणूने थैमान घातलेले असताना रेडिओसारख्या प्रभावी माध्यमातून नागरिकांना महानगरपालिका करीत असलेल्या उपाययोजनांविषयी माहिती मिळावी तसेच महानगरपालिकेमार्फत केली जाणारी विविध आवाहने नागरिकांपर्यंत पोहचविण्याच्या दृष्टीने इंटरनेट रेडिओ हे देखील एक प्रभावी माध्यम ठरत आहे.
सध्या कोरोना विषयी विविध माध्यमांतून कोसळणा-या बातम्यांमध्ये नागरिकांनी आपले मानसिक बळ कसे ढळू द्यायचे नाही याविषयी केईएम रूग्णालयाच्या सेवानिवृत्त डीन आणि ख्यातनाम मानसोपचारतज्ज्ञ डॉ. शुभांगी पारकर ह्या 'महामारीच्या काळातील मानसिक आरोग्य' या विषयावर श्रोत्यांशी दररोज संवाद साधत असून त्या आरोग्य आपत्तीच्या परिस्थितीत मानसिक आरोग्य कायम राखण्याबाबत देत असलेल्या महत्वाच्या टिप्सबाबत रेडिओच्या श्रोत्यांकडून पसंती कळविण्यात येत आहे.
6 एप्रिल 2020 रोजी पहिल्या प्रसारणातून नवी मुंबईचे महापौर श्री. जयवंत सुतार व महापालिका आयुक्त श्री. अण्णासाहेब मिसाळ यांनी नागरिकांना कोव्हिड – 19 विरोधातील लढ्यासाठी घरातच थांबून सज्जतेचे आवाहन केले. सध्या दिवसातून दोन वेळा दुपारी 12 ते 12.30 आणि संध्याकाळी 6 ते 6.30 वाजेपर्यंत 'स्वच्छ रेडिओ नवी मुंबई' प्रसारित केला जात असून तो नवी मुंबईकर नागरिकांसाठी समर्पित आहे.
आत्तापर्यंत 'स्वच्छ रेडिओ नवी मुंबई' ची लिंक www.swachhradionavimumbai.com या संकेत स्थळावर उपलब्ध होती. त्याव्दारे रेडिओ ऐकता येत होता मात्र आता गुगल प्ले स्टोअर वर जाऊन "स्वच्छ रेडिओ नवी मुंबई (Swachh Radio Navi Mumbai)" हे ॲप डाऊनलोड केल्यास नागरिक अगदी कुठेही या इंटरनेट रेडिओ सेवेचा लाभ घेऊ शकतात.
|