नवी मुंबईकर नागरिकांच्या आरोग्याची काळजी घेण्यासाठी 27 ठिकाणी "फ्ल्यू क्लिनिक"

कोरोना विषाणूच्या वाढत्या प्रसाराच्या पार्श्वभूमीवर लोकांच्या मनात कोरोना विषयीच्या भितीने घर केले असून सर्दी, खोकला, ताप असल्याचे जाणवल्यास नागरिकांच्या मनात कोरोना बाधीत असल्याचा संशय निर्माण होत आहे.
याकरिता नवी मुंबई महानगरपालिकेने आयुक्त श्री. अण्णासाहेब मिसाळ यांच्या मार्गदर्शनाखाली सुरुवातीपासूनच उपाययोजना करण्याचे ठरवित नागरिकांनी ताप, घसा खवखवणे, सर्दी किंवा श्वास घेण्यास त्रास अशी लक्षणे आढळल्यास 022-27567269 या हेल्पलाईन क्रमांकावर संपर्क साधून थेट तज्ज्ञ डॉक्टरांशी संवाद साधावा व आपले शंका समाधान करून घ्यावे असे आवाहन करण्यात आले. तसेच टेलिफोनिक संवादाव्दारे आणि वेबलिंकव्दारे नागरिकांच्या प्रकृतीची सद्यस्थिती सात प्रश्नांच्या आधारे जाणून घेण्यास सुरूवात केली. त्यामध्ये ताप, सर्दी, घशात खवखव, श्वास घेण्यास त्रास अशी लक्षणे जाणवत असल्याचे नोंदविणा-या नागरिकांशी तज्ज्ञ डॉक्टरांचे पथक संवाद साधत असून त्यांना मार्गदर्शन करीत आहे. याशिवाय दररोज 400 हून अधिक नागरिक हेल्पलाईनवर संपर्क साधून तज्ज्ञ डॉक्टरांचा सल्ला घेत आहेत. यामध्ये डॉक्टरांना कोरोना सदृष्य लक्षणे आढळल्यास त्या नागरिकाची तातडीने स्वॅब सँपल टेस्ट करून घेण्यात येत आहे.
या प्रमाणेच नागरिकांना ताप, सर्दी, घशात खवखव अशी लक्षणे असल्यास त्यांना घरापासून जवळच तपासणी करता यावी याकरिता महापालिका आयुक्त श्री. अण्णासाहेब मिसाळ यांनी नियोजन करीत महानगरपालिकेची 23 नागरी आरोग्य केंद्रे तसेच बेलापूर, नेरुळ, ऐरोली, तुर्भे ही रुग्णालये अशा 27 ठिकाणी फ्ल्यू क्लिनिक सुरु केली आहेत. याठिकाणी सकाळी 9 ते दुपारी 1 या कालावधीत डॉक्टरांचे पथक वैद्यकीय सेवा पुरवित असून यामुळे नागरिकांना मोठ्या प्रमाणावर दिलासा मिळाला आहे.
फ्ल्यू क्लिनिक मध्ये येणा-या प्रत्येक नागरिकाचे थर्मल स्कॅनीग केले जात असून डॉक्टरांकडून त्यांना ताप, घशात खवखव / खोकला, सर्दी, श्वसनास त्रास अशाप्रकारची लक्षणे आहेत काय याबाबतची माहिती घेण्यात येत आहे. प्रत्येक नागरिकाची तपासणी करून त्यास योग्य औषधोपचार सूचविले जात आहेत. हे औषधोपचार घेतल्यानंतर 2 दिवसांनी पुन्हा त्यांच्या प्रकृतीचा आढावा घेतला जात असून त्यांच्यामध्ये कोरोना सदृष्य लक्षणे आढळल्यास स्वॅब कलेक्शन घेतले जात आहेत.
अशाचप्रकारे आशियातील मोठ्या प्रमाणावर आवक जावक असणा-या ए.पी.एम.सी. च्या पाच मार्केट्समध्ये कोरोना नियंत्रक वैद्यकीय तपासणी कक्ष सुरु केले आहेत.
ताप, सर्दी, खोकला झाल्यास आपल्याला कोरोनाची लागण झाल्याची भिती सध्या नागरिकांच्या मनात आहे. कोरोना प्रतिबंधासाठी देशव्यापी लॉकडाऊन मधून खाजगी दवाखाने, पॅथॉलॉजी लॅब, मेडीकल स्टोअर्स यांना वगळलेले असले तरी काही ठिकाणी दवाखान्यांची जागा लहान असल्यामुळे, सोशल डिस्टन्सिंग पाळता येणे शक्य नसल्याने खाजगी दवाखाने बंद ठेवण्यात आलेले आहेत. त्यामुळे नागरिकांची गैरसोय होऊ नये ही बाब लक्षात घेऊन महापालिका आयुक्त श्री. अण्णासाहेब मिसाळ यांनी तातडीने निर्णय घेत विभागवार फ्ल्यू क्लिनिक सुरू करून नागरिकांची आरोग्य तपासणीची अडचण दूर केलेली आहे.
महाराष्ट्र राज्यात लागू करण्यात आलेल्या साथरोग प्रतिबंधात्मक कायदा 1897 नुसार कोव्हिड - 19 बाबत उपाययोजना करण्यासाठी महापालिका आयुक्तांना सक्षम प्राधिकारी म्हणून अधिकार प्रदान करण्यात आलेले आहेत. त्यास अनुसरून महापालिका आयुक्त श्री. अण्णासाहेब मिसाळ यांनी ताप, सर्दी, घशात खवखव, श्वास घेण्यास अडचण असणा-या व्यक्तींवर उपचार करण्यासाठी अधिक पर्याय उपलब्ध व्हावेत व ते नागरिकांच्या सोयीचे असावेत याकरिता सर्व विभागांमध्ये फ्ल्यू क्लिनिक सुरु केले आहेत. याव्दारे नागरिकांना आरोग्य विषयक आधार मिळत असल्याच्या प्रतिक्रिया अनेक नागरिकांकडून फ्ल्यू क्लिनिकला भेट दिल्यानंतर तसेच सोशल मिडियावरून व्यक्त केल्या जात आहेत.
तरी नागरिकांनी घाबरून न जाता कोरोना विरोधातील या लढ्यात आपल्या घरातच थांबून महानगरपालिका प्रशासनास सहकार्य करावे. विशेषत्वाने नागरिकांनी कोरोना सदृष्य लक्षणे असल्यास लपवून न ठेवता नजिकच्या महानगरपालिकेच्या नागरी आरोग्य केंद्राशी अथवा रुग्णालयाशी संपर्क साधावा किंवा 022-27567269 या हेल्पलाईन क्रमांकावर संपर्क साधून तज्ज्ञ डॉक्टरांशी संवाद साधावा आणि स्वत:च्या, कुटुंबियांच्या व इतरांच्या आरोग्याची जपणूक करावी असे आवाहन महापौर श्री. जयवंत सुतार व महापालिका आयुक्त श्री. अण्णासाहेब मिसाळ यांच्या वतीने करण्यात येत आहे.
Published on : 21-04-2020 11:20:20,Posted by : Navi Mumbai ,Category : News and update