बाहेरच्या शहरांत ये - जा न करता नवी मुंबई महानगरपालिका क्षेत्रातच राहण्याचे नागरिकांना आवाहन
कोरोना विषाणूचा प्रसार संसर्गातून होत असल्याने माणसांचा परस्पर संपर्क टाळण्यासाठी 19 मार्चपासून 14 एप्रिलपर्यंत देशव्यापी लॉकडाऊन जाहीर करण्यात आला व परिस्थितीचे अवलोकन करून त्याची मुदत 3 मे पर्यंत वाढविण्यात आली आहे. याबाबत भारत सरकार आणि महाराष्ट्र शासन यांचेमार्फत वेळोवेळी देण्यात येणा-या मार्गदर्शक सूचनांची अंमलबजावणी नवी मुंबई महानगरपालिकेच्या वतीने करण्यात येत असून कोरोनाचा प्रसार रोखण्यासाठी विविध उपाययोजना करण्याप्रमाणेच लॉकडाऊनच्या काळात जीवनावश्यक गोष्टींबाबत नागरिकांची गैरसोय होऊ नये याकरिता विशेष काळजी घेण्यात येत आहे.
तथापि मागील काही दिवसांतील कोरोना बाधितांच्या तपशीलाचा आढावा घेतला असता नवी मुंबई बाहेरील क्षेत्रातून, विशेषत्वाने मुंबई शहरातून ये-जा करणा-या व्यक्तींमुळे कोरोनाचा प्रसार नवी मुंबई महानगरपालिका क्षेत्रात मोठ्या प्रमाणात होत असल्याचे निदर्शनास येत आहे. यामध्ये, मुंबईतील विविध रूग्णालयात सेवा देणारे डॉक्टर्स, नर्सेस, पॅरामेडिकल स्टाफ, ॲम्बुलन्स ड्रायव्हर या वैद्यकीय अधिकारी, कर्मचारी यांचेसह बँकींग व इतर अत्यावश्यक कामकाजासाठी ये-जा करणा-या व्यक्ती कोरोना बाधित झाल्याचे व नवी मुंबई महानगरपालिका क्षेत्रात त्यांचा निवास असल्याने त्यांच्यामुळे त्यांचे कुटूंबिय व त्यांचे निकटवर्तीय कोरोना बाधित झाल्याचे निदर्शनास येत आहे. मुंबईतून नवी मुंबईत लागण झालेल्या कोरोना बाधितांचे प्रमाण एकूण बाधितांच्या 63 टक्के इतके लक्षणीय आहे.
उपरोक्त बाबींचा विचार करता, नवी मुंबईतून मुंबई व इतर शहरात अत्यावश्यक सेवा देणा-या व त्यासाठी दररोज प्रवास करणा-या नवी मुंबईकर नागरिकांना याव्दारे सूचित करण्यात येत आहे की, त्यांनी आपल्या कुटुंबियांच्या व निकटवर्तीयांच्या आरोग्य हिताच्या दृष्टीने नवी मुंबई महानगरपालिका क्षेत्रातून बाहेर मुंबई व इतर ठिकाणी शक्यतो जाण्याचे टाळावे आणि जाणे अत्यंत आवश्यक असल्यास त्याच शहरात आपल्या निवा-याची लॉकडाऊनपर्यंत व्यवस्था करण्यास, ज्या आस्थापनेत सेवा बजावतात त्या आस्थापनांना सूचित करावे. नवी मुंबई शहराचे सामाजिक आरोग्य जपण्यासाठी कर्तव्य भावनेने सहकार्य करण्याचे सर्व नागरिकांना आवाहन आहे.
Published on : 28-04-2020 16:36:08,Posted by : Navi Mumbai ,Category : News and update