कोव्हीड-19 चा संसर्गातून होणारा प्रसार रोखण्यासाठी महापालिका आयुक्त श्री. अण्णासाहेब मिसाळ यांच्या मार्गदर्शानानुसार विविध उपाययोजना केल्या जात असून त्यासोबतच आगामी पावसाळी कालावधी लक्षात घेऊन पावसाळापूर्व कामे देखील सुरू करण्यात आली आहेत. यामध्ये सर्वच विभागांत पावसाळापूर्व गटारे सफाई कामांना सुरूवात करण्यात आलेली आहे.
सध्या कोरोनाच्या पार्श्वभूमीवर गटारे सफाई केली जात असताना त्या कामगांराच्या सुरक्षेची पूर्णत: खबरदारी घेण्याचे निर्देश महापालिका आयुक्तांनी दिलेले असून त्यानुसार हँडग्लोव्हज्, मास्क अशी सुरक्षा साधने तसेच सॅनिटायझर, हात धुण्यासाठी साबण असे साहित्य सफाई करणा-या कामगारांना देण्यात आलेले आहे व त्याचा वापर करण्याचे सूचित करण्यात आलेले आहे. ही गटारे सफाई करताना सोशल डिस्टन्सींगचे पालन करण्याच्याही सूचना या कामगारांना देण्यात आल्या असून त्यांच्या सुरक्षेकडे लक्ष देण्यात येत आहे. घनकचरा व्यवस्थापन विभागाचे उपआयुक्त श्री. तुषार पवार यांनी आज ठिकठिकाणी प्रत्यक्ष भेटी देत या कामांची पाहणी केली व दिलेली सुरक्षा साधने वापरून स्वत:ची काळजी घेण्यास कामगारांना सांगितले.
अशाच प्रकारे नियमितपणे दैनंदिन साफसफाई करणा-या कामगारांच्याही सुरक्षेची काळजी घेत त्यांना मास्क, सॅनिटायझर, हँडग्लोव्हज आदी सुरक्षा साधने कंत्राटदारामार्फत देण्यात आलेली असून महानगरपालिकेमार्फतही अधिकचे सुरक्षा साहित्य या सफाई कामगारांना देण्यात आलेले आहे व त्यांचा वापर करण्याच्या सूचना केलेल्या आहेत. त्यांच्यामार्फत दिलेली सुरक्षा साधने नियमित वापरली जात आहेत याकडे विशेष लक्ष देण्यात येत आहे.
कोरोनाचा प्रसार रोखण्यासाठी संपूर्ण जग झुंजत असताना नवी मुंबई शहरात दैनंदिन स्वच्छता राखून सामाजिक आरोग्य अबाधित ठेवणा-या या कोरोनाच्या लढाईतील योध्दे असणा-या सफाई कामगारांची काळजी नवी मुंबई महानगरपालिका घेत असून त्यांच्या सुरक्षेबाबत चुकीची माहिती प्रसारित करण्यात येऊ नये असे आवाहन करण्यात येत आहे.