नवी मुंबई महानगरपालिकेच्या स्वॅब तपासणीसाठी आणखी 3 प्रयोगशाळांची शासनाकडून उपलब्धता मेट्रोपोलीस लॅब करणार मोफत 15 हजार कोरोना स्वॅब टेस्ट
कोरोना संसर्ग प्रतिबंधात्मक उपाययोजनांच्या दृष्टीने कोरोना सदृष्य लक्षणे आढळणा-या व्यक्तीची स्वॅब चाचणी लवकरात लवकर होणे गरजेचे असते. यादृष्टीने नवी मुंबई महानगरपालिका सुरूवातीपासूनच सतर्कतेने काम करीत असून कोरोनाची लक्षणे असलेल्या व्यक्तीची स्वॅब टेस्ट घेतल्यापासूनच त्याच्यावर योग्य उपचार सुरू करण्यात येतात.
सध्या नवी मुंबई महानगरपालिका क्षेत्रातील नागरिकांच्या स्वॅब तपासणीसाठी हाफकीन आणि एनआयव्ही या दोन प्रयोगशाळा उपलब्ध असल्याने व त्यांच्यावर इतर महानगरपालिकांच्या तपासण्यांचाही भार असल्याने तपासणी अहवाल प्राप्त होण्यास 4 ते 5 दिवस लागत होते. त्यामुळे याविषयी महापालिका आयुक्त श्री. अण्णासाहेब मिसाळ यांनी पुढाकार घेऊन नवी मुंबई महानगरपालिकेच्या स्वॅब टेस्टींगसाठी अतिरिक्त प्रयोगशाळांची मागणी राज्य शासनाकडे केली होती. या मागणीस सकारात्मक प्रतिसाद देत शासनाने जे.जे., आय.एन.एच.एस.अश्विनी आणि टाटा ॲक्ट्रॅक लॅब अशा आणखी 3 प्रयोगशाळा नवी मुंबई महानगरपालिकेस उपलब्ध करून दिलेल्या आहेत. आयुक्त श्री. अण्णासाहेब मिसाळ यांच्या मागणीनुसार आता नवी मुंबई महानगरपालिकेस स्बॅब तपासणीसाठी 3 नवीन अशा एकूण 5 प्रयोगशाळा उपलब्ध झाल्याने तपासणी अहवाल लवकर प्राप्त होणार आहेत.
याशिवाय मेट्रोपोलीस या खाजगी लॅबमार्फत सिटी बॅंक आणि सिपला फाऊंडेशन यांच्या सहकार्याने त्यांच्या सीएसआर निधीतून नवी मुंबई महानगरपालिकेच्या 15 हजार स्वॅब टेस्ट मोफत करून देण्याच्या प्रस्तावास आयुक्त श्री. अण्णासाहेब मिसाळ यांनी त्वरीत मान्यता दिली असून नवी मुंबई महानगरपालिका क्षेत्रातील नागरिकांच्या स्वॅब टेस्टींगसाठी ही अत्यंत लाभदायक बाब आहे. मेट्रोपोलीस लॅबने दिलेल्या प्रस्तावानुसार त्यांचेकडे स्वॅब पाठविल्यानंतर एका दिवसात ते त्याचे तपासणी अहवाल देणार असून वाशी येथील डेडिकेटेड कोव्हिड रूग्णालयातून स्वॅब कलेक्शन केले जाणार आहे. मेट्रोपोलीस लॅब ही केंद्र शासनाच्या आयसीएमआर या सर्वोच्च संस्थेमार्फत कोव्हीड 19 विषयक तपासणी करण्यासाठी मान्यताप्राप्त लॅब असून त्यांस सिटीबँक व सिपला फाऊंडेशन यांचे सहकार्य लाभले आहे. नवी मुंबई महानगरपालिकेस 15 हजार चाचण्या मोफत उपलब्ध करून देत असल्याबद्दल महापालिका आयुक्त श्री. अण्णासाहेब मिसाळ यांनी या तिन्ही संस्थांचे आभार व्यक्त केले आहेत.
Published on : 31-05-2020 12:16:39,Posted by : Navi Mumbai ,Category : News and update