कोव्हीड पॉझिटिव्ह दिव्यांगांकरीता न्युरोजेनचे महाराष्ट्रातील पहिले स्पेशल कोव्हीड हॉस्पिटल
कोव्हीड 19 चा प्रसार रोखण्यासाठी विविध पातळ्यांवर प्रयत्न केले जात असताना कोव्हीड 19 बाधीतांवर त्यांच्या लक्षणांची तीव्रता लक्षात घेऊन सीसीसी, डीसीएससी व डीसीएच अशा तीन स्तरांवर उपचार सुविधा उपलब्ध करून देण्यात आल्या आहेत. यामध्ये सामाजिक बांधिलकी जपत समाजातील विशेष घटकांचा विचार करण्यात येत आहे.
अशाचप्रकारे शारीरिक कमतरता असणा-या दिव्यांग व्यक्तींना कोव्हीड 19 ची लागण झाल्यास अशा पॉझिटिव्ह दिव्यांग व्यक्तींना विशेष उपचार सुविधा मिळाव्यात या भूमिकेतून महापालिका आयुक्त श्री. अण्णासाहेब मिसाळ यांच्या सूचनेनुसार सीवूड नेरुळ येथील न्युरोजन ब्रेन ॲण्ड स्पाईन इन्स्टिट्युट यांनी आपल्या रुग्णालयातील 75 बेड्स पैकी 25 बेड्स कोरोना बाधीत दिव्यांग व्यक्तींच्या उपचारासाठी उपलब्ध करून दिले आहेत. नवी मुंबई महानगरपालिकेच्या सहयोगाने न्युरोजनच्या वतीने खास दिव्यांगांसाठीचे हे महाराष्ट्रातील पहिले स्पेशल कोव्हीड हॉस्पिटल कार्यान्वित होत आहे.
याठिकाणी दिव्यांगांच्या सर्व अडचणींचा साकल्याने विचार करून त्यांना हालचाल करणे सुलभ जावे अशाप्रकारे विशेष रुम्सची निर्मिती करण्यात आलेली आहे. त्याचप्रमाणे व्हिलचेअर, दिव्यांगांना वापरण्यास सोयीची अशी स्वच्छतागृहे अशाप्रकारे दिव्यांग व्यक्तींचा विचार करून विशेष रचना करण्यात आलेली आहे. याठिकाणी ऑटिझम, सेरिब्रल पाल्सी सारखे आजार तसेच इंटेक्चुअल डिसॅबिलीटीचा विचार करून व्यवस्था करण्यात आलेली आहे. या रुग्णालयामध्ये ऑक्सिजन सपोर्ट, व्हेन्टीलेटर तसेच इंटेसिव्ह केअर सुविधा उपलब्ध करून देण्यात आलेल्या आहेत. त्याचप्रमाणे कोव्हीड 19 बाधीत दिव्यांगांवरील उपचाराचा विचार करून वैद्यकीय क्षेत्रातील अद्ययावत शोधांवर आधारीत उपचार पध्दतीचा वापर करण्यात येणार आहे.
एकाच छताखाली विविध प्रकारच्या दिव्यांगांना शिक्षण, प्रशिक्षण व सेवासुविधा उपलब्ध करून देणा-या इटीसी केंद्राव्दारे नवी मुंबई महानगरपालिकेचा नावलौकीक राष्ट्रीय व आंतरराष्ट्रीय पातळीवर होत असताना दिव्यांगांचा विशेष विचार करून अशाप्रकारे कोव्हीड 19 बाधीत दिव्यांगांकरीता न्युरोजन ब्रेन ॲण्ड स्पाईन इन्स्टिट्युटच्या माध्यमातून दिव्यांग स्पेशल कोव्हीड हॉस्पिटल सुरु करण्यात आल्याने नवी मुंबई शहराच्या सामाजिक बांधीलकी जपणा-या प्रतिमेत लक्षणीय भर पडलेली आहे.
नवी मुंबई महानगरपालिकेच्या सूचनेनुसार न्युरोजन समुहाने या दिव्यांगांकरीता स्पेशल कोव्हीड 19 हॉस्पिटलची सुविधा तत्परतेने उपलब्ध करून दिल्यामुळे महापालिका आयुक्त श्री. अण्णासाहेब मिसाळ यांनी न्युरोजन समुहाची विशेष प्रशंसा केलेली आहे.
Published on : 02-06-2020 14:47:35,Posted by : Navi Mumbai ,Category : News and update