तुर्भे, खैरणे, ऐरोली विभागांमध्ये 2400 हून अधिक नागरिकांचे कोव्हीड 19 मास स्क्रिनींग

कोरोनाचा वाढता प्रसार रोखण्यासाठी विविध उपाययोजना करताना ज्या भागात अधिक प्रमाणात कोरोना पॉझिटिव्ह रुग्ण आढळलेले आहेत अशा कंन्टेनमेंट झोनमध्ये महापालिका आयुक्त श्री. अण्णासाहेब मिसाळ यांच्या मार्गदर्शनाखाली कोव्हीड 19 विषयक तपासणी शिबिरे राबविण्यात येत असून आज 4 ठिकाणी झालेल्या मास स्क्रिनींगमध्ये 2414 नागरिकांची तपासणी करण्यात आली.
या कॅम्पमध्ये नागरिकांचे थर्मल स्कॅनींग करण्यात येऊन त्यांच्याशी डॉक्टर संवाद साधत प्रकृतीविषयी माहिती घेत आहेत व वैद्यकीय तपासणी करून त्यांना योग्य औषधोपचार देण्यात येत आहेत. एखाद्या नागरिकामध्ये तापाची लक्षणे आढळून आल्यास पल्स ऑक्सिमिटरने त्याच्या शरीराची ऑक्सिजन पातळी तपासण्यात येत असून एखाद्या नागरिकामध्ये कोरोना सदृष्य लक्षणे आढळल्यास स्वॅब टेस्टींग करण्यात येत आहे.
खैरणे भागातील मास स्क्रिनींगमध्ये महानगरपालिकेच्या नागरी आऱोग्य केंद्रासह डॉ. डी.वाय.पाटील रुग्णालयाच्या वैद्यकीय समुहाने 425 नागरिकांची कोव्हीड 19 च्या अनुषंगाने तपासणी केली. त्याचप्रमाणे सेक्टर 2 ऐरोली येथेही ऐरोली नागरी आरोग्य केंद्रासह डॉ. डी.वाय.पाटील रुग्णालयाच्या वैद्यकीय समुहाने 174 नागरिकांची कोव्हीड 19 तपासणी केली.
चिंचपाडा ऐरोली येथे आयोजित करण्यात आलेल्या मास स्क्रिनींग शिबीरात 344 नागरिकांची तपासणी करण्यात आली. याठिकाणी चिंचपाडा नागरी आरोग्य केंद्रासह नेरुळ येथील तेरणा रुग्णालयाचा वैद्यकीय समुह सहभागी होता.
अशा प्रकारे हनुमान नगर तुर्भे भागातही मास स्क्रिनींग कॅम्प आयोजित करण्यात आला होता. त्यामध्ये इंदिरानगर नागरी आरोग्य केंद्रासह अमृत प्रेरणा सेवाभावी संस्थेच्या वैद्यकीय समुहाने 1471 नागरिकांची मास स्क्रिनींग तपासणी केली.
अशाचप्रकारे उद्या दि. 09 जून रोजीही सेक्टर 20 तुर्भे, हनुमान नगर तुर्भे, सेक्टर 26 तुर्भे, सेक्टर 1 ऐरोली व चिंचपाडा ऐरोली अशा 5 ठिकाणी मास स्क्रिनींग कॅम्प राबविण्यात येत आहे.
या मास स्क्रिनींग कॅम्पमधून नागरिकांची कोव्हीड 19 विषयक तपासणी व्हावी व कोरोना सदृष्य लक्षणे आढळणा-या व्यक्तींचे स्वॅब कलेक्शन करून त्यांच्यावर त्वरीत उपचार सुरु करता यावेत व यामधून कोरोनाची साखळी खंडीत करावी ही भूमिका असून प्रत्येक नागरिकाने मास्कचा वापर करावाच तसेच सोशल डिस्टन्सींगचेही काटेकोर पालन करावे असे आवाहन महापालिका आयुक्त श्री.अण्णासाहेब मिसाळ यांच्या वतीने करण्यात येत आहे.
Published on : 08-06-2020 15:49:12,Posted by : Navi Mumbai ,Category : News and update