नेरुळ विभागात कोव्हीड-19 मास स्क्रिनींग तपासणी

कोरोना बाधितांचा शोध वेळेत घेऊन त्यांच्यावर तत्परतेने उपचार व्हावेत व कोरोनाची साखळी खंडीत व्हावी याकडे नवी मुंबई महानगरपालिकेमार्फत सुरुवातीपासून लक्ष देण्यात येत असून कोरोनाचे रुग्ण ज्या विभागात मोठ्या प्रमाणावर सापडले आहेत अशा भागांमध्ये महापालिका आयुक्त श्री. अण्णासाहेब मिसाळ यांच्या मार्गदर्शनाखाली कोव्हीड 19 मास स्क्रिनींग शिबीरे आयोजित करण्यात येत आहेत.
आज सेक्टर 6 सारसोळेगांव नेरुळ भागामध्ये महापालिका नागरी आरोग्य केंद्राच्या माध्यमातून तेरणा रूग्णालयाच्या वैद्यकीय समुहासह आयोजित मास स्क्रिनींग शिबीरात 118 नागरिकांची कोव्हीड 19 विषयक तपासणी करण्यात आली. त्याचप्रमाणे सेक्टर 16 ए नेरुळ येथेही 83 नागरिकांची तपासणी करण्यात आली.
अशाच प्रकारे सेक्टर 2 नेरुळ येथे शिरवणे नागरी आरोग्य केंद्राच्या माध्यमातून डॉ. डि.वाय.पाटील वैद्यकीय समुहाने 214 नागरिकांची कोव्हीड 19 विषयक तपासणी केली.
या मास स्क्रिनींग कॅम्पमधून कोरोना सदृष्य लक्षणे आढळणा-या व्यक्तींची तपासणी करून त्यांच्यावर त्वरीत उपचार सुरु करण्यात येत आहेत. तरी नवी मुंबईकर नागरिकांनी कोरोना बाधीत होणे टाळण्यासाठी मास्कचा नियमित वापर करावा तसेच सोशल डिस्टन्सींग राखावे असे आवाहन महापालिका आयुक्त श्री. अण्णासाहेब मिसाळ यांच्या वतीने करण्यात येत आहे.
Published on : 22-06-2020 13:15:45,Posted by : Navi Mumbai ,Category : News and update