श्री.शंकर महादेवन यांचा 'दुनिया सारी आभारी' म्हणत प्रेरणागीतातून कोव्हीड योध्द्यांना सलाम
संपूर्ण जग कोरोना विरोधातील लढाई लढत असताना यामध्ये महत्वाची भूमिका बजाविणारे डॉक्टर्स, नर्सेस, पॅरामेडीकल स्टाफ, पोलीस, अग्निशमन व सुरक्षाकर्मी, स्वच्छता कर्मचारी अशा सगळ्या कोव्हीड योध्द्यांना सलाम करण्यासाठी सुप्रसिध्द संगीतकार, गायक पद्मश्री श्री. शंकर महादेवन यांनी "दुनिया सारी आभारी" हे प्रेरणा गीत साकारले असून महापालिका आयुक्त श्री. अण्णासाहेब मिसाळ व संगीतकार श्री. शंकर महादेवन यांनी या गीताच्या व्हिडीओ चित्रफितीचे ऑनलाईन प्रकाशन केले. यावेळी अतिरिक्त आयुक्त श्री. संजय काकडे उपस्थित होते.
महापालिका आयुक्त श्री. अण्णासाहेब मिसाळ यांच्या संकल्पनेतून श्री. शंकर महादेवन यांनी साकारलेले हे 'कोव्हीड 19 प्रेरणा गीत' मराठी व हिंदी भाषेत असून सर्व कोव्हीड योध्द्यांना समर्पीत करण्यात आलेले आहे.
नवी मुंबईचा नागरिक म्हणून माझे या शहराशी अत्यंत जिव्हाळ्याचे नाते असून आपल्या जीवाची पर्वा न करता शहरातील नागरिकांच्या आरोग्याची काळजी घेणा-या कोरोना योध्द्यांसाठी मला हे संगीतमय योगदान देता आले याबद्दल मी स्वत:ला भाग्यवान समजतो अशा शब्दात श्री. शंकर महादेवन यांनी आपल्या भावना व्यक्त केल्या.
नवी मुंबई महानगरपालिकेच्या कोणत्याही उपक्रमात नेहमीच सक्रीय योगदान देणा-या व शहराच्या नावलौकीकात आपल्या कलाक्षेत्रातील कामगिरीने भर घालणा-या सुप्रसिध्द संगीतकार, गायक श्री. शंकर महादेवन यांनी कोव्हीड योध्द्यांबद्दल आदर दाखवित साकारलेल्या अत्यंत उत्तम गीतामुळे कोव्हीड योध्द्यांना अधिक उमेदीने काम करण्याची प्रेरणा मिळेल असा विश्वास महापालिका आयुक्त श्री. अण्णासाहेब मिसाळ यांनी यावेळी व्यक्त केला.
उपकार हे चुकणे नाही,
जरी केले आम्ही काही,
पाठिशी तुमच्या राहू,
या संकटकाळी,
दुनिया सारी आभारी,
मिटवूया ही महामारी,
दुनिया सारी आभारी
अशा शब्दात मराठी भाषेत, तसेच -
खतरे में अपनी जानें
और गैरों को ये बचाये
जगमें है उतरे ये जो सारे
उनसे हम कहें
दुनिया सारी आभारी
लडने की है ये बारी
दुनिया सारी आभारी
अशा शब्दात हिंदी भाषेत कोरोना योध्द्यांबद्दल श्री. शंकर महादेवन यांनी अतिशय सुरेलपणे या कोव्हीड 19 प्रेरणा गीतांमधून व्यक्त केलेल्या भावना ही प्रत्येकाच्या मनातील भावना आहे व या प्रेरणा गीतामुळे कोव्हीड योध्द्यांमध्ये अधिक जोमाने काम करण्याचा उत्साह निर्माण होईल असे महापालिका आयुक्त श्री. अण्णासाहेब मिसाळ यांनी म्हटले आहे.
Published on : 23-06-2020 15:50:55,Posted by : Navi Mumbai ,Category : News and update