पावसाळा कालावधीत साथरोग टाळण्यासाठी काळजी घेण्याचे आवाहन
सध्या कोव्हीड 19 विषाणूमुळे होणा-या आजाराशी सारे जग लढत असताना पावसाळी कालावधी लक्षात घेऊन होणारे हिवताप व डेंग्यू आजार तसेच इतर जलजन्य आजार होण्याची शक्यता लक्षात घेऊन नवी मुंबई महानगरपालिका आरोग्य विभागाच्या वतीने प्रतिबंधात्मक उपाययोजना व मोहिमा हाती घेण्यात आल्या आहेत.
यामध्ये डास उत्पत्ती स्थानांचा शोध घेऊन दूषीत स्थाने नष्ट करण्यावर भर देण्यात येत आहे. त्याचप्रमाणे सायंकालीन डास सर्वेक्षण हाती घेण्यात आले असून ज्या भागात मोठ्या प्रमाणात डास घनता आहे अशा ठिकाणच्या बंद गटारांमध्ये रासायनीक धूरिकरण करून नंतर बंद गटारांच्या लाद्या उघडून डास अळीनाशक फवारणी करण्यात येत आहे. या कार्यक्षेत्रामध्ये आवश्यकतेनुसार आठवड्यातून दोनदा डास अळीनाशक फवारणी करण्यात येत आहे.
यासोबतच राष्ट्रीय किटकजन्य रोग नियंत्रण कार्यक्रमांतर्गत हिवताप, डेंग्यू या आजारांबाबत नागरिकांमध्ये जनजागृती होण्यासाठी हस्तपत्रके, पोस्टर्स, बॅनर्स, होर्डींग्ज याव्दारे जनजागृतीपर माहिती प्रसारित करण्यात येत आहे. तसेच माहिती शिक्षण व संपर्क कार्यक्रम राबविण्यात येत आहे.
नवी मुंबई महानगरपालिका कार्यक्षेत्रात जून महिना 'हिवताप प्रतिरोध महिना' म्हणून साजरा करण्यात येत आहे. त्या अनुषंगाने महानगरपालिकेच्या वतीने सध्याच्या कोरोना परिस्थितीत योग्य सामाजिक अंतर राखून ठिकठिकाणी हिवताप / डेंग्यू जनजागृतीपर शिबीरे घेण्यात येत आहेत. यामध्ये, हिवताप, डेंग्यू इ. आजारांबाबतची लक्षणे, उपाययोजना, उपचारपध्दती तसेच नागरिकांनी घरांतर्गत डास उत्पत्ती स्थाने नष्ट करण्याबाबत सहकार्य करण्याबाबत जनजागृती करण्यात येत आहे.
पावसाळा कालावधीत डासांची प्रादुर्भाव होणार नाही व हिवतापाचे संक्रमण होणार नाही याकरिता नागरिकांनी,
* घर व सभोवतालचा परिसर जास्तीत जास्त स्वच्छ ठेवावा,
* आपल्या इमारतीमधील पाण्याची टाकी स्वच्छ करून घ्यावी,
* पाईप लाईनमध्ये गळती होत असल्यास त्वरित पाणीपुरवठा विभागाशी संपर्क साधावा,
* पिण्याचे पाणी उकळून व गाळून प्यावे,
* शिळे व उघड्यावरचे अन्न खाऊ नये,
* अतिसार झाल्यास क्षार संजिवनी मिश्रणाचा (ओ.आर.एस.) वापर करावा व अन्न सेवन सुरू ठेवावे,
* गच्चीवरील व घराच्या परिसरातील भंगार साहित्य,
* रिकाम्या बाटल्या, करवंट्या, रंगाचे डबे, उघड्यावरील टायर्स नष्ट करावे,
* फुलदाण्या ट्रे, फेंगशुई यामध्ये साचलेले पाणी आठवड्यातून एकदा बदलावे,
* घरामधील व घराबाहेरील पाणी साठविण्याच्या टाक्या / ड्रम / भांडी आठवड्यातून एकदा त्यामधील संपूर्ण पाणी काढून पूर्णपणे कोरडे करावे,
* शक्य झाल्यास डास प्रतिबंधात्मक मच्छरदाणीचा वापर करावा,
* आपले घर कार्यालय व परिसरात पाणी साचू न देण्याची काळजी घ्यावी
- असे सूचित करण्यात येत आहे.
नवी मुंबई महानगरपालिकेच्या वतीने सर्व रूग्णालयांमध्ये तसेच नागरी आरोग्य केंद्रांमध्ये तापाच्या रूग्णाची मोफत रक्त तपासणी करण्यात येत असून आरोग्य कर्मचारी यांचेमार्फत घरी जाऊनही रक्त तपासणी केली जाते. तरी सध्याच्या कोव्हीड विषाणू प्रसाराच्या काळात नागरिकांनी आपल्या प्रकृतीबाबत दक्ष रहावे व हिवताप / डेंग्यु आजाराचा रूग्ण असल्यास त्वरित नजिकच्या महापालिका रूग्णालयास कळवावे असे आवाहन महापालिका आयुक्त श्री.अण्णासाहेब मिसाळ यांच्या वतीने करण्यात येत आहे.
Published on : 28-06-2020 16:36:12,Posted by : Navi Mumbai ,Category : News and update