विशेष प्रतिबंधित क्षेत्रांची आयुक्त श्री. अण्णासाहेब मिसाळ यांनी केली पाहणी

लॉकडाऊन मध्ये काहीशी सवलत दिली गेल्यानंतर विशेषत्वाने दाट लोकवस्तीच्या ठिकाणी कोरोनाबाधितांच्या संख्येत वाढ झालेली दिसून आली. यामध्ये कोरोनाचा संसर्ग होऊ नये म्हणून नागरिक म्हणावी इतकी काळजी घेताना दिसत नाहीत, सोशल डिस्टन्सींगचे पालन करताना दिसत नाहीत. हे लक्षात घेऊन मागील 15 दिवसांत ज्या भागांमध्ये मोठया संख्येने कोरोना बाधित सापडले आहेत अशा 12 दाट लोकवस्तीच्या भागांमध्ये 7 दिवसांचा लॉकडाऊन घेतला जात आहे असे सांगत नवी मुंबई महापालिका आयुक्त श्री. अण्णासाहेब मिसाळ यांनी येथील कोरोनाची साखळी खंडित करण्यासाठी या भागांमध्ये घरोघरी जाऊन प्रत्येक माणसाची आरोग्य तपासणी केली जाणार असल्याचे स्पष्ट केले.
नवी मुंबई महानगरपालिकेच्या वतीने 29 जून ते 5 जुलै या काळात 10 (दिवाळेगाव, करावेगाव, तुर्भे स्टोअर, सेक्टर 21 तुर्भे, सेक्टर 22 तुर्भेगाव, सेक्टर 11 जुहूगाव वाशी, सेक्टर 12 खैरणे-बोनकोडेगांव, सेक्टर 19 कोपरखैरणेगांव, राबाडेगांव, चिंचपाडा ऐरोली) आणि 30 जून ते 6 जुलै या काळात 2 (सेक्टर 1 ते 9 सीबीडी बेलापूर व वाशीगांव) अशा एकूण 12 मोठया लोकवस्तीच्या भागात विशेष प्रतिबंधित क्षेत्रे (Special Containment Zone) घोषित करण्यात आली आहेत.
महापालिका आयुक्त श्री. अण्णासाहेब मिसाळ यांनी यामधील तुर्भे स्टोअर व कोपरखैरणे गाव येथील प्रतिबंधित क्षेत्रांना भेट देऊन पाहणी केली. याप्रसंगी अतिरिक्त आयुक्त श्रीम. सुजाता ढोले, उपायुक्त श्री. अमोल यादव, श्री. दादासाहेब चाबुकस्वार व डॉ. अमरिश पटनिगीरे, वैदयकीय आरोग्य अधिकारी डॉ. बाळासाहेब सोनावणे आणि इतर अधिकारी उपस्थित होते.
घरोघरी जाऊन प्रत्येक नागरिकाचे मास स्क्रिनींग
कोरोना बाधितांपैकी 65% हून अधिक व्यक्तींमध्ये कोरोनाची लक्षणे आढळून येत नाहीत. तथापि त्यांच्यामुळे इतरांना लागण होऊन कोरोनाचे संक्रमण वाढू शकते. हे लक्षात घेऊन या 12 झोनमध्ये प्रत्येक नागरिकाचे घरोघरी जाऊन स्क्रिनिंग करण्यात येत आहे.
कोरोना मुक्तीचा "तुर्भे पॅटर्न"
यापूर्वी केंद्र सरकारच्या सूचीमध्ये तुर्भे हा कोरोनाचा हॉटस्पॉट होता. त्यामुळे या भागाकडे मागील 20-25 दिवसांपासून जास्त लक्ष केंद्रीत करीत येथील कोरोना बाधितांच्या संपर्कातील व्यक्ती शोध मोहिम (Contact Tracing) वाढविण्यावर भर दिला. एका रुग्णाच्या संपर्कातील 26 व्यक्ती शोधण्यापर्यंत अतिशय बारकाईने हे काम करण्यात आले. त्याचे फलित म्हणून मागील 10 दिवसांत या भागात कोरोना बाधित आढळलेला नसून कोरोना मुक्तीचा हा "तुर्भे पॅटर्न" यशस्वी होताना दिसतो आहे.
याच धर्तीवर या 12 विशेष प्रतिबंधित क्षेत्रात (Special Containment Zone) घरोघरी जाऊन मास स्क्रिनींग हाती घेण्यात आले आहे. कोरोना बाधितांच्या संपर्कातील व्यक्ती शोधाचे (Contact Tracing) प्रमाण महापालिका क्षेत्रात सध्या 10 इतके असून ते 20 पर्यंत नेण्याचे निर्देश सर्व आरोग्य केंद्रांच्या वैद्यकीय अधिकारी यांना दिल्याचे आयुक्त श्री. अण्णासाहेब मिसाळ यांनी सांगितले.
या मास स्क्रिनींगमध्ये जे संशयित सापडतील त्यांचे लगेच स्वॅब टेस्टिंग करुन संस्थात्मक विलगीकरण (Isolation) करण्यात येणार असल्याची माहिती आयुक्तांनी दिली. अशा दाट लोकवस्तीच्या ठिकाणी घरात विलगीकरण करणे शक्य नसते त्यामुळे महानगरपालिका स्थापित संस्थात्मक विलगीकरण करून कोरोनाची साखळी खंडित होईल असा विश्वास त्यांनी व्यक्त केला.
इतर दीर्घकालीन आजार असलेल्या व ज्येष्ठ नागरिकांकडे विशेष लक्ष्ा
कोरोना बाधितांमध्ये मधुमेह, उच्च रक्तदाब, हायपरटेंन्शन, कर्करोग, किडनीचे विकार अशा प्रकारे इतर दीर्घकालीन आजार असणाऱ्या तसेच ज्येष्ठ नागरिक व्यक्तींकडे विशेष लक्ष देण्याची गरज असल्याचे नमूद करीत या मास स्क्रिनींगमध्ये अशा प्रकारच्या व्यक्तींच्या तपशीलाची वेगळी नोंद घेण्याचे निर्देश दिल्याची माहिती आयुक्तांनी दिली. नवी मुंबई महानगरपालिका क्षेत्रातील मृत्यू होणाऱ्या व्यक्तींचा तपशील तपासला असता त्यामध्ये इतर दीर्घकालीन आजार असणाऱ्या व ज्येष्ठ नागरिकांचे प्रमाण 80% हून अधिक आहे. त्यामुळे अशा व्यक्तींना कोरोनाची लागण झाल्यास अगदी सुरुवातीच्या टप्प्यावर योग्य उपचार करता आले तर जीव वाचवता येईल असा विश्वास व्यक्त करीत आयुक्त श्री. अण्णासाहेब मिसाळ यांनी याकरिता योग्य क्लिनिकल मॅनेजमेंट करण्याच्या सूचना रुग्णालयांना दिले असल्याचे सांगितले. तसेच टेलि मेडिसिन बाबतही काम सुरु असल्याची माहिती त्यांनी दिली.
दोन दिवसात स्वॅब रिपोर्ट मिळण्याचे नियोजन
स्वॅब टेस्टिंगचे रिपोर्ट येण्यास होणारा विलंब टाळण्यासाठी खाजगी लॅबशी करार करण्यात येत असून एक ते दोन दिवसात रिपोर्ट मिळेल अशा प्रकारे व्यवस्था करण्यात येत असल्याची माहिती आयुक्तांनी दिली. तसेच वाशी येथील सार्वजनिक रुग्णालयात आरटीई-पीसीआर लॅब सुरु करण्याबाबत तातडीने कार्यवाही करण्यात येत असल्याचेही त्यांनी सांगितले.
परिसर निर्जंतुकीकरण व डासनाशक फवारणी
या 12 विशेष प्रतिबंधित क्षेत्रात संपूर्ण निर्जंतुकीकरण करण्यात येत आहे. त्याचप्रमाणे सध्याचा पावसाळी कालावधी लक्षात घेऊन मलेरिया, डेंग्यू व इतर साथरोग वाढू नयेत अशाप्रकारे सर्व ठिकाणी फॉगिंगही करण्यात येत आहे.
पोलीस विभाग व संस्था, स्वयंसेवकांचे सहकार्य
ही सर्व प्रतिबंधित क्षेत्रे पोलीस आयुक्त यांच्याशी चर्चा करुनच निश्चित करण्यात आली असून या लॉकडाऊनच्या अंमलबजावणीत पोलीस विभागासह स्थानिक स्वयंसेवी संस्था, सामाजिक कार्यकर्ते व स्वयंसेवकांचे मोठे योगदान आहे असेही आयुक्तांनी नमूद केले.
कोरोना योध्दयांच्या सुरक्षेची काळजी
घरोघरी जाऊन नागरिकांची आरोग्य तपासणी करणाऱ्या डॉक्टर व कर्मचाऱ्यांना सुरक्षा साधने पुरवली गेली असल्याची खात्री आयुक्तांनी करुन घेतली व काम करताना स्वत:चीही काळजी घेऊन काम करा अशा आपुलकीच्या सूचनाही दिल्या.
कोरोना साखळी खंडित करण्यासाठी सहकार्याचे आवाहन
या 12 विशेष प्रतिबंधित क्षेत्रांमध्ये (Special Containment Zone) लॉकडाऊन जाहीर करण्यात आला असून हा लॉकडाऊन आपल्याच आरोग्य हितासाठी आहे हे लक्षात घेऊन नागरिेकांनी लॉकडाऊनचे पालन करुन कोरोनाची साखळी खंडित करावी असे आवाहन महापालिका आयुक्त श्री. अण्णासाहेब मिसाळ यांनी केले आहे.
Published on : 30-06-2020 15:04:44,Posted by : Navi Mumbai ,Category : News and update