वाशीच्या सेंटरवन मॉलमधील सेंट्रल दुकानासासह इतर विभागांत 6 दुकानदारांवर लॉकडाऊन उल्लंघनाचे गुन्हे दाखल --------------------------------------------- डी मार्ट, रिलायन्स फ्रेश अशा सर्व डिपार्टमेंटल स्टोअर्सना जीवनावश्यक वस्तूंची केवळ होम डिलिव्हरी करता येणार --------------------------------------------- 3 दिवसांत 2 लाख 22 हजार 800 इतकी दंडात्मक रक्कम वसूल
कोरोनाचा वाढता प्रादुर्भाव रोखण्यासाठी महापालिका आयुक्त् श्री. अण्णासाहेब मिसाळ यांनी दि. 3 जुलै, मध्यरात्री 12 वाजल्यापासून, 13 जुलै, मध्यरात्री 12.00 वाजेपर्यंत 10 दिवसांचा लॉकडाऊन जाहीर केला आहे. यामध्ये नागरिकांनी घरातच थांबून कोरोनाची संसर्ग साखळी खंडित करावी असे आवाहन करण्यात आले आहे.
तथापि अनेक नागरिक अत्यावश्यक वस्तू खरेदीच्या बहाण्याने घराबाहेर पडत असल्याचे निदर्शनास येत आहे. त्यामुळे महापालिका व पोलीस प्रशासन यावर नाहक ताण येत असल्याचे निदर्शनास येत आहे. त्यामुळे महापालिका आयुक्तांनी विभागनिहाय नियुक्त केलेल्या विभागप्रमुख दर्जाच्या समन्वय अधिकाऱ्यांना संबंधित विभागातील पोलीस यंत्रणेसह लॉकडाऊनच्या प्रभावी अंमलबजावणीकडे दररोज नियमित विशेष लक्ष देण्याचे निर्देश दिले. त्यास अनुसरुन सर्व समन्वय अधिकाऱ्यांनी आपापल्या विभागीय क्षेत्रात पोलीस अधिकाऱ्यांसह प्रत्यक्ष फेरी मारुन लॉकडाऊनची काटेकोर अंमलबजावणी केली जाईल यादृष्टीने अधिक प्रभावी उपाययोजना हाती घेतल्या आहेत.
यामध्ये विभागीय क्षेत्रात ध्वनीक्षेपक यंत्रणा लावलेली गाडी फिरवून नागरिकांना लॉकडाऊनच्या नियमांचे पालन करण्याच्या सूचना करण्यात आल्या. याशिवाय लॉकडाऊनच्या जाहीर नियमांचे उल्लंघन करणाऱ्या व्यक्ती, दुकाने, आस्थापना यांच्यावर दंडात्मक कारवाई करण्यात आली तसेच काही विभागांमध्ये रितसर गुन्हेही दाखल करण्यात आले.
वाशीच्या सेंटरवन मॉलमधील सेंट्रल दुकानासासह इतर विभागांत 6 दुकानदारांवर लॉकडाऊन उल्लंघनाचे गुन्हे दाखल
लॉकडाऊनच्या नियमांचे उल्लंघन करण्याच्या अनुषंगाने वाशी येथील सेंटरवन मॉल मधील वाशी सेंट्रल दुकानात अत्यावश्यक वस्तुंखेरीज छुप्या पध्दतीने इतर वस्तूंची विक्री होत असल्याचे निदर्शनास आल्याने त्या विरोधात वाशी पोलीस ठाण्यामध्ये भारतीय दंडसंहितेच्या कलम 188 अन्वये एफआयआर दाखल करण्यात आला. या ठिकाणी अत्यावश्यक मालाखेरीज इतर मालाची विक्री झाल्याचे 4 जुलै रोजीचे देयक हाती लागल्याने या पुराव्याच्या आधारे महापालिका आयुक्त श्री. अण्णासाहेब मिसाळ यांच्या आदेशानुसार महानगरपालिकेच्या वाशी विभाग कार्यालयामार्फत ही धडक कारवाई करण्यात आली.
अशाचप्रकारे कोपरखैरणे विभाग कार्यालय क्षेत्रात भारतीय दंडसंहिता, कलम 188 अन्वये 4 दुकानदारांवर लॉकडाऊनच्या काळात दुकाने सुरु ठेवून लॉकडाऊनच्या नियमांचे उल्लंघन केल्याने कायदेशीर गुन्हा नोंद करण्यात आली. त्याचप्रमाणे तुर्भे विभाग कार्यालय क्षेत्रातही 2 दुकानदारांवर लॉकडाऊनच्या नियमांचे उल्लंघन करुन दुकाने सुरु ठेवल्याने गुन्हे नोंद करण्यात आली.
मास्क वापर, सोशल डिस्टन्सींगचे उल्लंघन करणा-यांकडून 3 दिवसात 2 लाख 22 हजार 800 दंड वसूल
याशिवाय मास्क न वापरणे, सोशल डिस्टन्सींग न पाळणे, सार्वजनिक ठिकाणी थुंकणे अशा अत्यंत महत्वाच्या गोष्टींचे पालन न करणाऱ्या नागरिक / दुकानदार यांच्याकडून 4 ते 6 जुलै दरम्यान 2 लाख 22 हजार 800 इतकी दंडात्मक रक्कम वसूल करण्यात आलेली आहे.
यामध्ये - बेलापूर विभाग कार्यालय क्षेत्रात रु. 44 हजार,
नेरुळ विभाग कार्यालय क्षेत्रात रु. 25 हजार 200,
वाशी विभाग कार्यालय क्षेत्रात रु. 25 हजार,
तुर्भे विभाग कार्यालय क्षेत्रात रु. 32 हजार 500,
कोपरखैरणे विभाग कार्यालय क्षेत्रात रु. 44 हजार 400,
घणसोली विभाग कार्यालय क्षेत्रात रु. 13 हजार 800
ऐरोली विभाग कार्यालय क्षेत्रात रु. 18 हजार 200,
दिघा विभाग कार्यालय क्षेत्रात रु. 19 हजार 700
अशाप्रकारे एकूण रु. 2 लाख 22 हजार 800 इतकी दंडात्मक रक्कम आठ विभाग कार्यालय क्षेत्रात तीन दिवसांत वसूल करण्यात आलेली आहे.
नवी मुंबई महानगरपालिका क्षेत्रात जाहीर करण्यात आलेल्या लॉकडाऊन कालावधीत नागरिकांनी घरातच थांबावे तसेच अगदी गरजेचे असेल तरच जीवनावश्यक बाबीसाठी घरातल्या एखादयाच व्यक्तीने बाहेर यावे व आपले काम झाल्यावर लगेच घरी परतावे. मास्कचा वापर करावा व सोशल डिस्टन्सींगचे पालन करावे असे आवाहन करतानाच महापालिका आयुक्त् श्री. अण्णासाहेब मिसाळ यांनी हा लॉकडाऊन कालावधी कोरोनाची साखळी खंडीत करण्यासाठी अत्यंत महत्वाचा असून सर्वांच्याच आरोग्य हिताच्या दृष्टीने गरजेचा आहे हे लक्षात घेऊन नागरिकांनी संपूर्ण सहकार्य करावे व लॉकडाऊनच्या नियमांचे उल्लंघन करुन कायदेशीर कारवाईची वेळ येऊ देऊ नये असे आवाहन केले आहे.
Published on : 07-07-2020 13:08:04,Posted by : Navi Mumbai ,Category : News and update