लॉकडाऊन नियमांचे उल्लंघन करणा-या नागरिक / दुकानदारांकडून एका दिवसात 1.5 लाखाहून अधिक दंड वसुल
3 जुलै पासून कोरोनाचा वाढता प्रसार रोखण्यासाठी संपूर्ण नवी मुंबई महानगरपालिका क्षेत्रात लॉकडाऊन जाहीर करण्यात आला असून महानगरपालिका व पोलीस यांच्यामार्फत नागरिकांनी घरातच थांबून लॉकडाऊनच्या नियमांचे पालन करावे असे आवाहन विविध माध्यमांतून करण्यात येत आहे. तरीही काही नागरिकांकडून लॉकडाऊनच्या नियमांचे उल्लंघन होत असल्याचे निदर्शनास येत असून त्यांच्या विरोधात कायदेशीर कारवाई करण्यात येत आहे. अशाचप्रकारे मास्क न वापरणे, सोशल डिस्टन्सींग न पाळणे, सार्वजनिक ठिकाणी थुंकणे अशा सामाजिक आरोग्याच्या दृष्टीने अतिशय महत्वाच्या गोष्टींचे उल्लंघन करणाऱ्या नागरिक व दुकानदार यांच्याकडून 7 जुलै रोजी एका दिवसात 1 लाख 54 हजार 340 इतकी दंडात्मक रक्कम वसूल करण्यात आलेली आहे.
यामध्ये - बेलापूर विभाग कार्यालय क्षेत्रात रु. 70 हजार 700
नेरुळ विभाग कार्यालय क्षेत्रात रु. 11 हजार 500
वाशी विभाग कार्यालय क्षेत्रात रु. 15 हजार
तुर्भे विभाग कार्यालय क्षेत्रात रु. 17 हजार 500
कोपरखैरणे विभाग कार्यालय क्षेत्रात रु. 6 हजार 540
घणसोली विभाग कार्यालय क्षेत्रात रु. 18 हजार 300
ऐरोली विभाग कार्यालय क्षेत्रात रु. 13 हजार 600
दिघा विभाग कार्यालय क्षेत्रात रु. 1 हजार 200
अशाप्रकारे एकूण रु. 1 लाख 54 हजार 340 इतकी दंडात्मक रक्कम आठ विभाग कार्यालय क्षेत्रात 7 जुलै रोजी वसूल करण्यात आलेली आहे.
13 जुलै रोजी मध्यरात्री 12 वाजेपर्यंत जाहीर कऱण्यात आलेला लॉकडाऊन हा कोरोनाची साखळी खंडीत करून नागरिकांचे आरोग्य जपणूकीसाठी आहे याची दखल घेऊन प्रत्येक नागरिकाने स्वत:च्या व इतरांच्या आरोग्य रक्षणासाठी संसर्गातून पसरणा-या कोरोनाचा प्रसार रोखण्यासाठी घरातच थांबून सहकार्य करावे असे आवाहन महापालिका आयुक्त श्री. अण्णासाहेब मिसाळ यांच्या वतीने करण्यात येत आहे.
Published on : 09-07-2020 15:15:18,Posted by : Navi Mumbai ,Category : News and update