त्वरित अहवाल मिळणा-या अँटिजेन चाचणीला वाशीतील डेडिकेटेड कोव्हिड रूग्णालयात प्रारंभ
नवी मुंबई महानगरपालिकेच्या आयुक्तपदाचा कार्यभार स्विकारल्यानंतर महापालिका आयुक्त श्री. अभिजीत बांगर यांनी कोरोना रूग्णांची साखळी खंडीत करण्याच्या दृष्टीने आवश्यक अशा सर्व उपाययोजना तातडीने करणे आणि मृत्यूदर कमी करणे ही प्रमुख उद्दिष्टे नजरेसमोर ठेवून कामाला गती दिली जाईल असे पत्रकारांशी संवाद साधताना स्पष्ट केले होते.
त्यामध्ये कोव्हिडच्या जलद तपासणीच्या दृष्टीने 30 मिनिटात तपासणी अहवाल मिळणारी प्रतिजन चाचणी (अँटिजेन टेस्ट) तत्परतेने सुरू करण्यात येईल असे आयुक्त श्री. अभिजीत बांगर यांनी सूचित केले होते. तशा प्रकारचे निर्देश त्यांनी आरोग्य विभागास दिल्यानंतर अँटिजेन चाचणी सुविधा तात्काळ सुरू करण्यात आली असून आज महानगरपालिकेच्या वाशी येथील डेडिकेटेड कोव्हीड रूग्णा लयात अँटिजेन चाचणी करण्यास प्रारंभ झाला आहे.
अँटिजेन चाचणी करण्यासाठी नवी मुंबई महानगरपालिकेच्या वाशी रूग्णालयाप्रमाणेच नेरूळ व ऐरोली रूग्णालयात 'कोव्हीड 19 अँटिजेन टेस्टिंग सेंटर' सुरू करण्यात आले असून याव्दारे अर्ध्या तासात तपासणी अहवाल मिळणार असल्याने महानगरपालिकेच्या कोव्हीड रूग्ण शोध मोहिमेला गती लाभणार आहे. तसेच रूग्णाची माहिती लवकर प्राप्त होऊन त्याचे लगेच विलगीकरण करण्यात येऊन त्याच्यावर उपचार सुरू करणे शक्य होणार आहे. कमी कालावधीत अहवाल प्राप्त होऊन लगेच उपचार सुरू करता येणारी ही अँटिजेन चाचणी सुविधा नवी मुंबईतील कोरोना प्रसारावर प्रतिबंध आणण्यासाठी अत्यंत उपयुक्त ठरणार आहे.
कोव्हीड सदृष्य लक्षणे असणा-या व्यक्ती तसेच कोव्हिड 19 पॉझिटिव्ह व्यक्तीच्या निकटच्या संपर्कातील अतिजोखमीच्या व्यक्ती (High Risk Contact) यांची महानगरपालिकेमार्फत प्राधान्याने अँटिजेन टेस्ट विनामूल्य करण्यात येणार आहे. सध्या महानगरपालिकेच्या वाशी, नेरूळ, ऐरोली या 3 रूग्णालयांठिकाणी 'कोव्हीड 19 अँटिजेन टेस्टिंग सेंटर' सुरू करण्यात येत असून नागरिकांना घरापासून जवळ ही सुविधा उपलब्ध व्हावी यादृष्टीने 23 नागरी आरोग्य केंद्रांच्या ठिकाणी देखील अँटिजेन टेस्टिंग सेंटर सुरू करणेबाबत आयुक्तांमार्फत आरोग्य विभागास निर्देश देण्यात आलेले आहेत.
नवी मुंबई महानगरपालिकेकडे सध्या 40 हजार अँटिजेन टेस्ट किट्स उपलब्ध असून आणखी 60 हजार किट्स मागविल्या जाणार आहेत. शासनाकडेही 1 लाख किट्सची मागणी करण्यात आलेली आहे. त्याचप्रमाणे कोव्हिड 19 तपासणीचा वेग वाढविण्यासाठी शासकीय तसेच खाजगी लॅबमधील तपासण्यांची संख्याही वाढविली जाणार असून त्यादृष्टीने आयुक्तांच्या मार्गदर्शनानुसार कार्यवाहीस जलद प्रारंभ करण्यात आलेला आहे.
नवी मुंबई महानगरपालिका कोव्हिड 19 चा प्रसार रोखण्यासाठी सर्वोतोपरी प्रयत्न करीत असताना यामध्ये नागरिकांचे सहकार्य सर्वात महत्वाचे आहे. त्यामुळे नागरिकांनीही अत्यावश्यक कामाशिवाय घराबाहेर पडू नये, महत्वाच्या कामासाठी घराबाहेर पडल्यास काम झाल्यावर लगेच घरी परतणे, मास्कचा नियमित वापर करणे, सार्वजनिक ठिकाणी सोशल डिस्टन्सींगचे पालन करणे तसेच वेळोवेळी हात धुणे या कोरोनापासून बचाव करणा-या गोष्टींची दैनंदिन जीवनात सवय लावून घ्यावी असे आवाहन महापालिका आयुक्त श्री. अभिजीत बांगर यांच्या वतीने करण्यात येत आहे.
Published on : 16-07-2020 13:54:36,Posted by : Navi Mumbai ,Category : News and update