"सुट्टी न घेता नवी मुंबई महानगरपालिका लढणार कोरोनाची लढाई" -आयुक्त श्री. अभिजीत बांगर
कोव्हीड 19 च्या प्रतिबंधासाठी विविध उपाययोजना करताना नवी मुंबई महानगरपालिकेच्या वतीने कोव्हीड नियंत्रणात्मक कामाची तातडीने अधिक प्रभावी अंमलबजावणी करण्याच्या दृष्टीने महापालिका आयुक्त श्री. अभिजीत बांगर यांनी महानगरपालिकेच्या आस्थापनेवर कोव्हिड 19 व्यवस्थापनाशी संबंधित कार्यरत वर्ग 1 व 2 च्या सर्व अधिकारी / कर्मचारी यांनी कोव्हीड 19 चा प्रादुर्भाव संपेपर्यंत सार्वजनिक सुट्ट्यांसह आठवड्यातील सातही दिवस कामावर उपस्थित राहण्याचे आदेश परिपत्रकाव्दारे निर्गमित केले आहेत.
त्याचप्रमाणे, संबंधित विभागप्रमुख / कार्यालयप्रमुख यांनी त्यांच्या विभागातील वर्ग 3 व 4 मधील कर्मचा-यांना कामाची निकड लक्षात घेऊन कार्यालयात उपस्थित राहणेबाबत आदेशित करावे असे परिपत्रकात स्पष्टपणे नमूद करण्यात आलेले आहे.
कोरोना विरोधातील लढाई लढत असताना नवी मुंबई महानगरपालिका प्रशासनामार्फत नागरिकांना आवश्यक सेवा नियोजनबध्द रितीने, विहित वेळेत उपलब्ध व्हाव्यात अशी महापालिका आयुक्त श्री. अभिजीत बांगर यांची भूमिका असून त्यानुसार महापालिकेचे अधिकारी, कर्मचारी सांघिक भावनेने कोरोनाचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी यापुढील काळातही अधिक प्रभावीरित्या अथक कार्यरत राहतील.
त्यामध्ये नवी मुंबई महानगरपालिका क्षेत्रातील नागरिकांनीही कोरोनाचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी अत्यावश्यक कामाशिवाय घराबाहेर न पडणे, मास्कचा नियमित वापर करणे, सोशल डिस्टन्सीगचे प्रत्येक ठिकाणी काटेकोर पालन करणे तसेच नियमित हात धुणे या सवयी अंगिकारून नवी मुंबईतील कोरोनाची साखळी खंडीत करण्यासाठी संपूर्ण सहकार्य करावे असे आवाहन महापालिका आयुक्त श्री. अभिजीत बांगर यांच्या वतीने करण्यात येत आहे.
Published on : 18-07-2020 17:05:43,Posted by : Navi Mumbai ,Category : News and update