कोरोना प्रतिबंधासाठी नवी मुंबई महानगरपालिकेचे 'मिशन ब्रेक द चेन'- आयुक्त श्री.अभिजीत बांगर
कोव्हीड 19 प्रतिबंधासाठी नवी मुंबई महानगरपालिकेमार्फत विविध उपाययोजना केल्या जात आहेत. त्याची अंमलबजावणी करण्यासाठी नवी मुंबई महानगरपालिकेचे कर्मचारी समर्पित भावनेने काम करीत आहेत. यामध्ये दररोज वाढणा-या रूग्णसंख्येवर प्रभावीरित्या नियंत्रण आणण्यासाठी आता महापालिका आयुक्त श्री. अभिजीत बांगर यांच्या संकल्पनेतून नियोजनबध्द पावले उचलत 'मिशन ब्रेक द चेन' राबविसी जात आहे.
या अनुषंगाने आयुक्तांनी अतिरिक्त आयुक्त यांच्यासह सर्व विभागांचे समन्वय अधिकारी, विभागप्रमुख, विभाग अधिकारी तथा सहा. आयुक्त यांच्या समवेत विशेष बैठक घेऊन तसेच सर्व नागरी आरोग्य केंद्रांचे वैद्यकीय अधिकारी यांच्याशी ऑनलाईन संवाद साधत त्यांना 'मिशन ब्रेक द चेन' या संकल्पनेमागील भूमिका समजाविली, त्याच्या अंमलबजावणीच्या कार्यपध्दतीची माहिती दिली तसेच प्रभावी अंमलबजावणी करण्यासाठी प्रोत्साहित केले.
42 हॉटस्पॉट क्षेत्रात प्रभावीरित्या कोव्हीड 19 शोध व स्क्रिनींग
या 'मिशन ब्रेक द चेन' मोहीमेमध्ये प्रामुख्याने कोरोनाबाधित व त्यांच्या संपर्कातील व्यक्तींचा शोध तसेच स्क्रिनींग यावर विशेष लक्ष दिले जाणार असून सध्या 31 जुलैपर्यंत घोषित करण्यात आलेल्या 42 हॉटस्पॉट क्षेत्रात जास्तीत जास्त लोकांच्या तपासण्या आणि स्क्रिनींग यावर भर दिला जात आहे. ज्या भागात मागील काही दिवसात अधिक संख्येने कोरोना बाधित रूग्ण सापडले आहेत अशीच 42 क्षेत्रे हॉटस्पॉट म्हणून घोषित करण्यात आलेली असल्याने येथील कोरोना बाधितांच्या निकटच्या संपर्कातील अतिजोखमीच्या व्यक्ती तसेच ज्यांची तपासणी होणे आवश्यक आहे अशा व्यक्तींच्या कोव्हीड 19 तपासणीवर प्राधान्याने लक्ष दिले जाणार आहे.
कोरोनाची साखळी खंडीत करण्यासाठी त्वरित अहवाल मिळणा-या अँटीजेन टेस्टचा उपयोग
नवी मुंबई महानगरपालिकेने आता अर्ध्या तासात तपासणी अहवाल मिळणा-या रॅपीड अँटीजेन तपासणीला सुरूवात केली असून तपासण्यांचे प्रमाण वाढविले आहे. या अँटीजेन तपासणीचा अहवाल त्वरित प्राप्त होत असल्याने पॉझिटिव्ह व्यक्तीचे लगेच विलगीकरण करण्यात येऊन याव्दारे कोरोनाची साखळी खंडीत करण्याची कार्यवाही गतीमानतेने होत आहे.
सर्व विभागांचे सहा. आयुक्त तथा विभाग अधिकारी यांना हॉटस्पॉट क्षेत्रांकडे विशेष लक्ष देण्याचे निर्देशित करण्यात आले असून पोलीस विभागाच्या सहकार्याने लॉकडाऊनची अंमलबजावणी प्रभावीपणे करण्याचे सूचित करण्यात आलेले आहे. त्यासोबतच रूग्णवाहिकांची सर्व क्षेत्रात उपलब्धता राहील याच्याकडेही काटेकोर लक्ष देण्याचे निर्देश वैद्यकीय अधिकारी यांना देण्यात आलेले आहेत.
'मिशन ब्रेक द चेन' यशस्वी करण्यासाठी नागरिकांचे सहकार्य महत्वाचे - नागरिकांना आवाहन
कोरोनाचा वाढता प्रभाव रोखण्यासाठी 'मिशन ब्रेक द चेन' च्या पहिल्या टप्प्प्यात जास्त संख्येने कोरोनाबाधित सापडलेले आहेत, अशा 42 हॉटस्पॉट क्षेत्रात 31 जुलैपर्यंत लॉकडाऊन जाहीर करण्यात आला असून या कालावधीत याठिकाणी घरोघरी जाऊन स्क्रिनींग करण्यात येत आहे. त्या पुढील काळातही इतर भागात स्क्रिनींगव्दारे कोरोनाची साखळी खंडीत करण्याकडे विशेष लक्ष दिले जाणार आहे.
कोरोना विरोधातील ही लढाई लढत असताना नवी मुंबई महानगरपालिका संपूर्ण क्षमतेने प्रयत्न करीत असून प्रत्येक नवी मुंबईकर नागरिकाने मास्कचा अनिवार्य वापर, सोशल डिस्टन्सींगचे पालन, नियमित हात धुणे अशा छोट्या छोट्या पण महत्वाच्या गोष्टींचे पालन करून संपूर्ण सहकार्य करावे असे आवाहन करतानानाच नागरिकांचे यामध्ये संपूर्ण सहकार्य मिळेल असा विश्वास महापालिका आयुक्त श्री. अभिजीत बांगर यांनी व्यक्त केला आहे.
Published on : 22-07-2020 16:04:59,Posted by : Navi Mumbai ,Category : News and update