कन्टेनमेंट झोनच्या प्रभावी अंमलबजावणीकडे काटेकोर लक्ष देण्याचे आयुक्त श्री. अभिजीत बांगर यांचे निर्देश
'मिशन ब्रेक द चेन' प्रभावीपणे राबविण्यासाठी कोरोना बाधितांचा लवकरात लवकर शोध घेणे अत्यंत महत्वाचे असून त्यादृष्टीने स्क्रिनींग योग्य प्रकारे करणे तसेच कन्टेनमेंट झोनचे सुयोग्य व्यवस्थापन अत्यंत महत्वाचे असल्याचे सांगत महापालिका आयुक्त श्री. अभिजीत बांगर यांनी मृत्यूदर कमी करणे हे आपले प्रमुख लक्ष्य आहे, त्यादृष्टीने नियोजन करून कार्यपध्दती ठरवावी असे स्पष्ट केले.
ऐरोली विभाग कार्यक्षेत्रातील कोव्हीड 19 स्थितीचा सविस्तर आढावा घेताना आयुक्तांनी विभाग अधिकारी, वैद्यकीय अधिकारी आणि पोलीस अधिकारी यांनी परस्पर विचारविनीमयातून तसेच स्थानिक स्थितीचा विचार करून कोव्हीड 19 नियंत्रणाविषयी नियोजन करावे असे निर्देश दिले. याप्रसंगी अतिरिक्त आयुक्त श्री. संजय काकडे, परिमंडळ उपआयुक्त श्री. अमरिश पटनिगेरे, घनकचरा व्यवस्थआपन विभागाचे उपआयुक्त डॉ. बाबासाहेब राजळे उपस्थित होते.
प्रत्येक भागातील परिस्थिती वेगवेगळी असते, त्यामुळे तेथील स्थानिक भौगोलिक परिस्थितीचा व प्रशासकीय व्यवस्थेचा विचार करून कन्टेनमेंट झोनची रचना करावी असे स्पष्ट करताना कन्टेनमेन्ट झोन जाहीर केल्यानंतर मात्र त्याची काटेकोर अंमलबजावणी कशा रितीने होईल याकडे पूर्ण लक्ष द्यावे असे आयुक्तांनी स्पष्ट केले.
एकच रूग्ण असतो अशा पहिल्या व दुस-या प्रकारच्या कन्टेनमेंट झोनमध्ये महापालिका विभाग कार्यालयातील अधिकारी, कर्मचारी यांच्याकडे तेथील अंमलबजावणीकडे लक्ष देण्याची जबाबदारी सोपवावी आणि जवळपासच्या भागात 5 पेक्षा अधिक रूग्ण सापडलेल्या तिस-या प्रकारच्या कन्टेनमेंट झोनमध्ये पोलीसांनी 24 तास प्रवेश प्रतिबंधाच्या काटेकोर अंमलबजावणीकडे बारकाईने लक्ष द्यावे असे आयुक्तांनी निर्देशित केले. कन्टेनमेट झोनमधील नागरिकांना जीवनावश्यक वस्तुंचा पुरवठा कशा पध्दतीने करता येईल याचे विभाग कार्यालयामार्फत नियोजन करण्याचे त्यांनी सूचित केले. व कन्टेनमेंट झोनच्या अंमलबजावणीसाठी स्थानिक लोकप्रतिनिधी तसेच सोसायटी, वसाहतींचे पदाधिकारी यांचे सहकार्य घेण्याच्या सूचना त्यांनी दिल्या.
कन्टेनमेंट झोनमध्ये प्रभावीपणे रूग्णशोध मोहीम राबवावी व लक्षणे आढळणा-या प्रत्येक व्यक्तीची अँटीजेन टेस्ट करावी असे आयुक्तांनी स्पष्ट निर्देश दिले. विशेषत्वाने इतर आजार असणा-या व्यक्ती आणि ज्येष्ठ नागरिकांची काळजी घेण्याची गरज अधोरेखीत करीत त्यांची विशेष काळजी घेण्यास त्यांनी सांगितले.
कन्टेनमेट झोन म्हणजे कोरोनाचा संसर्ग पसरू नये म्हणून नागरिकांचा परस्पर संपर्क येऊ न देण्यासाठी व त्यातून कोरोनाची साखळी खंडीत करण्यासाठी केलेली उपाययोजना आहे. ती नागरिकांच्याच आरोग्य हिताकरिता आहे हे त्यांना वारंवार पटवून देऊन लॉकडाऊनचे नियम पाळण्यासाठी सतत प्रबोधन करीत राहणे गरजेचे असून महापालिका प्रशासन ते सातत्याने करीत आहे. नागरिकांनीही स्वत:चे आणि आपल्या प्रियजनांचे कोरानाची लागण होण्यापासून संरक्षण करण्यासाठी आपल्या सवयी बदलाव्यात आणि कोरोनाचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी मास्कचा नियमित वापर, एकमेकांपासून सुरक्षित अंतर ठेवणे, साबणाने वेळोवेळी हात धुणे या सवयींचा अंगिकार करून आपले नवी मुंबई शहर कोरोनामुक्त करण्यासाठी संपूर्ण सहकार्य करावे असे आवाहन महापालिका आयुक्त श्री. अभिजीत बांगर यांच्या वतीने करण्यात येत आहे.
Published on : 30-07-2020 11:33:53,Posted by : Navi Mumbai ,Category : News and update