चाचण्यांची संख्यावाढ, कोरोना बाधितांचे त्वरित विलगीकरण आणि कोमॉर्बिड व्यक्तींवर विशेष लक्ष यामधून मृत्यूदर शून्यावर आणण्याचा आयु्क्त श्री. अभिजीत बांगर यांचा निर्धार
कोरोनाचा वाढता प्रसार रोखण्यासाठी नियोजनबध्द पावले उचलत महापालिका आयुक्त श्री. अभिजीत बांगर यांनी 'मिशन ब्रेक द चेन' हाती घेतले असून यामध्ये शहरातील कोरोनामुळे होणा-या मृत्यूचे प्रमाण शून्यावर आणण्याचे उद्दिष्ट ठेवण्यात आलेले आहे. याकरिता कोरोना बाधितांचा लवकरात लवकर शोध घेऊन त्याचे लगेच विलगीकरण करण्याकडे लक्ष केंद्रीत करण्यात आले असून याव्दारे या कोरोना बाधितामुळे पसरणारा संसर्ग रोखला जाणार आहे.
याकरिता आयुक्तपदाचा कार्यभार स्विकारल्यानंतर दोनच दिवसात तातडीने अँटिजेन टेस्ट सुरू करण्यावर त्यांनी भर दिला आणि दिवसागणिक अँटिजेन टेस्टींगची केंद्रे वाढविली. एपीएमसी मार्केटमध्येही अँटिजेन टेस्टींग केंद्र सुरू करण्यात आले असून त्याठिकाणी दररोज 500 हून अधिक व्यक्तींच्या टेस्ट केल्या जात आहेत. केवळ अर्ध्या तासाच्या अवधीत अँटिजेन टेस्टचा अहवाल मिळत असल्याने रूग्णशोधाला गती लाभली आहे. 15 दिवसांपूर्वी साधारणत: प्रतिदिन 400 चाचण्या केल्या जात होत्या, त्यांचे प्रमाण आता प्रतिदिन 3 हजार इतके वाढले आहे.
चाचण्यांचे प्रमाण वाढल्यामुळे रूग्णांच्या संख्येत काहीशी वाढ होताना दिसत असली तरी चाचण्यांच्या वाढलेल्या संख्येमुळे कोरोनाची साखळी तोडली जाईल आणि रूग्ण प्रमाणात घट होईल अशी खात्री कोव्हीड 19 च्या प्रतिबंधासाठी नियोजनबध्द पावले टाकताना आयुक्तांना आहे. याशिवाय नेरूळ येथील महापालिका रूग्णालयात दररोज 1000 आर.टी.-पी.सी.आर. चाचण्या करता येतील अशाप्रकारची संपूर्ण ॲटोमॅटिक अद्ययावत लॅब उभारण्यात आली असून आय.सी.एम.आर.ची अंतिम टप्प्यात असलेली परवानगी प्राप्त झाल्यानंतर लगेच पूर्ण क्षमतेने ही लॅब सुरू होईल आणि चाचण्यांना आणखी वेग येईल.
मार्चपासून दि. 15 जुलै 2020 पर्यंत कोव्हीड 19 विषयक एकूण 27249 चाचण्या करण्यात आल्या होत्या. त्यामध्ये 16 जुलैपासून अँटिजेन टेस्टची भर पडली असून 31 जुलैपर्यंत 16320 अँटिजेन टेस्ट करण्यात आल्या आहेत. म्हणजेच अँटिजेन व पी.सी.आर. अशा मिळून एकूण 50418 कोव्हीड 19 चाचण्या करण्यात आलेल्या आहेत. 15 जुलै ते 31 जुलै या 15 दिवसात 23169 चाचण्या करण्यात आलेल्या आहेत. त्यामधील 5112 व्यक्तींच्या चाचण्यांचा अहवाल पॉझिटिव्ह प्राप्त झालेला आहे. म्हणजेच 15 जुलै रोजी 55 टक्के इतके जास्त असणारे पॉझिटिव्हिटीचे प्रमाण आता 22.06 इतके कमी झालेले दिसून येत आहे.
यामध्ये सर्वात महत्वाचा भाग म्हणजे रूग्णाचा वेळीच शोध घेऊन त्याचे लगेच विलगीकरण करणे. त्यासोबतच त्याच्या निकटच्या संपर्कातील व्यक्तींचा शोध घेऊन त्यांचीही तपासणी करण्यात येत असून संपर्क शोधाचे (Contact Tracing) प्रमाणही एका रूग्णामागे 22 ते 24 इतके वाढविण्यात आलेले आहे.
रूग्णशोध मोहीम प्रभावीपणे राबविण्यासाठी ज्या भागात आसपासची घरे, इमारती यामध्ये जास्त संख्येने कोरोना बाधित सापडले आहेत अशा 46 प्रतिबंधित क्षेत्रांकडे बारकाईने लक्ष देत त्याठिकाणी लॉकडाऊन जाहीर करण्यात आलेला आहे. या क्षेत्रात घरोघरी जाऊन रूग्णशोध मोहीम प्रभावीपणे राबविली जात आहे.
यामध्ये मधुमेह, उच्च रक्तदाब, हृदयरोग, किडनीचे विकार असे आधीपासूनच आजार असणा-या जोखमीच्या व्यक्तींचा शोध घेतला जात असून त्यांची वेगळी नोंद ठेवून अँटिजेन टेस्ट करण्यात येत आहे व विशेष काळजी घेतली जात आहे. कोरोनामुळे कोणाचाही मृत्यू होऊ नये याकरिता आवश्यक ती सर्व खबरदारी घेण्याचे व उपाययोजना करण्याचे स्पष्ट निर्देश सर्व वैद्यकीय अधिकारी यांना आयुक्तांमार्फत देण्यात आलेले आहेत.
त्यामुळे नागरिकांनी आपल्याला जाणवणारी सर्दी, खोकला आणि महत्वाचे म्हणजे ताप अशी लक्षणे लपवून न ठेवता तसेच श्वास घेण्यास त्रास होऊ लागेपर्यंत वाट न बघता लगेच आपल्या जवळच्या महापालिका नागरी आरोग्य केंद्राशी संपर्क साधून आपली अँटिजेन टेस्ट करून घ्यावी व आपल्या आणि प्रियजनांच्या आरोग्याची जपणूक करावी असे महापालिका आयुक्त श्री. अभिजीत बांगर यांनी आवाहन केले आहे.
Published on : 02-08-2020 16:49:55,Posted by : Navi Mumbai ,Category : News and update