नवी मुंबई महानगरपालिकेच्या स्वत:च्या कोव्हीड -19 लॅबमध्ये आरटी-पीसीआर चाचण्या करण्यास प्रारंभ

नवी मुंबई महानगरपालिकेच्या नेरूळ येथील माँसाहेब मीनाताई ठाकरे रुग्णालयात महापालिका आयुक्त श्री. अभिजीत बांगर यांच्या सातत्यपूर्ण पाठपुराव्यातून 15 दिवसांच्या आत उभारण्यात आलेल्या कोव्हीड - 19 चाचणी व निदान (Rt-PCR Fully Automatic Lab) अत्याधुनिक प्रयोगशाळेमध्ये आरटी-पीसीआर चाचण्या करण्यास आज प्रत्यक्ष सुरूवात करण्यात आली आहे.
31 जुलै रोजी ठाणे जिल्ह्याचे पालकमंत्री ना.श्री.एकनाथ शिंदे यांनी, खासदार श्री. राजन विचारे यांचे समवेत प्रयोगशाळेच्या अंतिम टप्प्यातील कामाची पाहणी करून समाधान व्यक्त केले होते. सदर प्रयोगशाळा सुरू करण्यास आयसीएमआर (इंड़ियन कौन्सिल ऑफ मेडिकल रिसर्च )च्या अधिकृत मान्यतेचे पत्र महानगरपालिकेस प्राप्त झाल्यानंतर आयुक्तांच्या निर्देशानुसार याठिकाणी लगेचच आरटी - पीसीआर चाचण्या करण्यास सुरूवात करण्यात आली आहे.
नवी मुंबई महानगरपालिकेची स्वत:ची लॅब नसल्यामुळे कोव्हीड 19 च्या तपासण्यांसाठी महानगरपालिकेस शासकीय अथवा खाजगी लॅबवर अवलंबून रहावे लागत होते. त्यात तपासणी अहवाल प्राप्त होण्यास विलंब होत असल्याने कोव्हीड 19 उपाययोजनांच्या अंमलबजवणीत अडथळा येत होता. या बाबीकडे पहिल्या दिवसापासून विशेष लक्ष देत पहिल्याच पत्रकार परिषदेत प्रसारमाध्यमांमार्फत नागरिकांना संबोधित करताना आयुक्त श्री. अभिजीत बांगर यांनी पॉझिटिव्ह व्यक्तींचा लवकरात लवकर शोध घेऊन त्यांचे विलगीकरण करण्यासाठी चाचण्यांच्या संख्या वाढीवर भर देणार असल्याचे स्पष्ट केले होते.
त्या अनुषंगाने महापालिका आयुक्तपदाचा कार्यभार स्विकारल्यानंतर केवळ दोनच दिवसात 16 जुलैपासून अँटिजेन टेस्ट करण्यास सुरूवात करण्यात आली व दिवसागणिक टेस्टींग सेटर वाढीवर भर देण्यात आला. सध्या 22 अँटिजेन टेस्टींग सेटरमधून दिवसाला 2500 अँटिजेन टेस्ट होत आहेत. त्यामध्ये आता एका दिवसात 1000 आरटी-पीसीआर चाचण्या करण्याची क्षमता असणा-या महानगरपालिकेच्या स्वत:च्या अत्याधुनिक संपूर्ण ऑटोमॅटिक लॅबची भर पडलेली असून यामुळे नवी मुंबईतील कोव्हीड 19 तपासणी वेगाने होणार आहे.
प्रतिदिन 1000 आरटी-पीसीआर चाचण्यांची क्षमता असणारी ही लॅब सध्या कोव्हीड़ 19 च्या काळात कोव्हीड 19 च्या तपासण्यांसाठी वापरली जाणार असली तरी भविष्यात हिपॅटायटिस, स्वाईन फ्ल्यू, लेप्टोस्पायरॅसीस, एचआयव्ही व इतर मॉलिक्युलर टेस्टसाठी या लॅबचा उपयोग होणार आहे. त्यामुळे ही संपूर्ण ॲटोमॅटिक लॅब नवी मुंबई महानगरपालिकेसाठी एक कायमस्वरूपी महत्वाची उपलब्धी आहे व आरोग्य विभागाचे स्वयंपूर्ण सक्षमीकरण करणारी आहे.
अँटिजेन टेस्ट आणि त्या जोडीला प्रतिदिन 1000 आरटी-पीसीआर चाचण्या क्षमतेची महानगरपालिकेची हक्काची अत्याधुनिक संपूर्ण ऑटोमॅटिक आर.टी.-पी.सी.आर. लॅब कोव्हीड 19 विरोधातील लढ्याला बळ देणारी असून नवी मुंबईकर नागरिकांनी कोरोनाचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी महानगरपालिका करीत असलेल्या उपाययोजनांमध्ये स्वयंशिस्त पाळून सहकार्य करावे असे आवाहन महापालिका आयुक्त श्री. अभिजीत बांगर यांनी केले आहे.
Published on : 04-08-2020 16:30:40,Posted by : Navi Mumbai ,Category : News and update